बहुजन नायक कांशीराम - बापू राऊत
मा. कांशीरामजींचे मसीहा मुख्यत्वाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते. डॉ. बाबासाहेबांच्या जीवनकार्यापासून त्यांनी प्रेरणा घेतली.सोबतच म. ज्योतिबा फुले, राजश्री शाहु महाराज, नारायण गुरु व रामासामी पेरीयार या महापुरुषांच्या विचारांचा मोठा प्रभाव कांशीरामजीवर होता. परंतु या महापुरुषांच्या विचाराना सोडून इतराप्रमाणे त्यांच्या प्रतिमांचे कधीही अंधानुकरण केले नाही.लोकांना भावनेत गुंतवून त्याचा उपयोग स्वार्थासाठी केला नाही, या महापुरुषांचे नाव घेऊन आपला पक्ष कोणाच्या दावणीला बांधला नाही तर महापुरुषांच्या विचाराचे मंथन करुन नव्या नव्या प्रयोगाना जन्म घातला.वेळोवेळी चालून आलेल्या संधींचा उपयोग समाज व पक्ष हितासाठी केला. अनेकांनी कांशीरामजींना अवसरवादी म्हटले परंतु त्यांनी कधी पर्वा केली नाही. ते म्हणत अगर मेरे समाज को आगे बढाने के लिए अगर मै किसी अवसरवाद का सहारा ले रहा ह तो मै अवसरवादी हु !
जो पर्यंत हिंदु धर्माचे अस्तित्व आहे तो पर्यंत या देशातन जातीय विषमता नष्ट होऊ शकत नाही या निर्णयापर्यंत ते आले होते. म्हणून त्यांनी विषमता निर्माण करणाऱ्यांचे हात छाटण्यासाठी मनुवाद्यानी निर्माण केलेल्या जातपातींचा उलटा वापर करण्याचे ठरविले. त्यांनी प्रत्येक जाती मध्ये चेतना निर्माण केली. प्रत्येक जातींचा महापुरुष शोधन काढला व त्या महापुरुषांचे विचार त्या त्या समाजापर्यंत पोहोचविले. त्यांच्यात राजकीय चेतना निर्माण करुन आपले हक्क कशात आहेत हे समजाऊन सांगितले. परीणामी संसद, विधानसभा, महापालिका यामधुन ब्राम्हणांची संख्या कमी झाली व बहुजन समाज मध्यवर्ती भुमिका वठवायला लागला. हा कांशीरामजीनी केलेला चमत्कार आहे.
आंबेडकरी समाजात जयभिम ह्या शब्दाला स्वाभिमानाचे प्रतिक मानले जाते. परंतु काही लोकांच्या स्वार्थीपणामुळे त्या शब्दाला व्यंगाचे स्वरुप आले असुन जयभिम बोलो और किधर भी चलो तसेच नाम बाबासाहाब का और काम गांधी का असे म्हटल्या जाते. आज प्रत्येक राजकीय पक्षांच्या रॅलीत बाबासाहेबांचा निळा झेंडा लागलेला दिसतो.कोणीही यावे व आपल्याशी लगट करुन निळा झंडा घेऊन जावे एवढे आपण आपल्या इभ्रतीला स्वस्त करुन ठेवले आहे. बाबासाहेबांच्या नावाला, त्यांच्या निळया झेंड्याला व मताच्या अधिकाराला आपण आई - बहिणी सारख्या इज्जतीचा दर्जा देणार आहोत की नाही ? बाबासाहेबांची शान आपल्याला कायम राखायची असेल तर बाबासाहेबांचे नाव घेऊन दुरुपयोग करणाऱ्याचा आपण समाचार घेतला पाहिजे व बाबासाहेबांच्या विचाराचे अंधानुकरण थांबविले पाहिजे.