बहुजन नायक कांशीराम - बापू राऊत
डॉ.बाबासाहेब यांच्या महापरिनिर्वाणानंतर निर्माण झालेल्या पोकळीचा कांग्रेस ने पुरेपुर फायदा करुन घेण्याचे ठरविले होते.आंबेडकरी आंदोलनाला नष्ट करण्यासाठी कांग्रेसने दोन स्तरावर कार्य केले.पहिल्या स्तरात जास्तीत जास्त लालची व गुलाम मनोवृत्तीच्या आंबेडकरी अनुयायाना आमिषे दाखवून कांग्रेस पक्षात ओढून घेतले.तर दुस-या स्तरात आंबेडकरी आंदोलनाला गटातटात विभागून ठेवून त्यांचा जास्तीत जास्त कसा वापर करता येईल ही कांग्रेसची पूढची रणनीती होती.
आमची माणसे कांग्रेस व भाजपा सारख्या पक्षाच्या दावणीला बांधल्या गेली.तिथे ते आमदार,खासदार व मंत्री झाले.त्यांच्या पक्षात राहण्याने समाजाचा किती फायदा झाला ? आपल्या समाजाच्या फायद्याचे कायदे करण्यासाठी व प्रतीकुल कायदे रद्द करण्यासाठी कांग्रेस,भाजपा व शिवसेना या पक्षातील दलित खासदार व आमदारांनी कधी संसदेत आवाज उठविला काय ? आरक्षणाचा कायदा सर्व क्षेत्रात लागू व्हावा,अंधश्रध्देचे समुळ नष्ट करण्यासाठी,जाती आधारीत सामाजिक - आर्थिक विषमता नष्ट व्हावी, दलितावर अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा व्हावी म्हणून यांनी विधान सभा व संसद डोक्यावर घेतली काय ? आमच्या या तथाकथित आमदार ,खासदार व मंत्र्यानी तसे काहीही केले नाही. का केले नाही ? याचे कारणही स्पष्ट आहे. पक्षाच्या धोरणानुसार त्या त्या पक्षातील आमदार,खासदार व मंत्र्याना वागावे लागते. पक्षाचे धोरण त्या त्या पक्षाचे प्रमुख ठरवित असतात. हे प्रमुख मनुवादी व मनुवाद्यांच्या नीतींचे बळी असतात. प्रस्थापित व्यवस्था तोडण्याची हिंमत त्यांच्यात नसते. त्यामूळे ते बहुजन समाजाच्या हिताच्या बाजुने कधीच धोरणाची आखणी करीत नसतात. पक्षाध्यक्षाच्या विरुध्द वागणारा व आवाज उठविणारा मंत्रीच काय साधा पंचायत समितीचा सदस्यही बनू शकत नाही.म्हणून दुस-या पक्षात असणारा आपल्या समाजाचा माणुस आमदार ,खासदार वा मंत्री बनला तरी त्याचा समाजाला काहीही फायदा होत नसतो.अशांच्या मुठभर कार्यकत्यांना कदाचित फायदा होत असेल व असेच कार्यकर्ते आपला माणूस आमदार,खासदार व मंत्री झाला म्हणून उड्या मारीत असतात व समाजाची दिशाभुल करीत असतात.खोट्या प्रतिष्ठेसाठी हपापलेले लोक समाजाचे फार मोठे नुकसान करीत असतात हे लक्षात ठेवले पाहीजेत. ते त्या त्या पक्षात समाजाच्या एकगठ्ठा मतासाठी दलालगिरी करीत असतात.
आंबेडकरी समाजात सत्ताधारी वर्गाचे चमचे निर्माण करण्याचे काम पणे कराराने केले आहे.बामसेफ च्या निर्मिती पासूनच कांशीरामजीनी पुणे कराराच्या माध्यमातून निर्माण झालेल्या संधीसाधूना चमचा व दलालांची उपमा देणे सुरु केले होते. या चमच्यांच्या संदर्भात कांशीरामजीनी चमचा युग हे पुस्तक लिहिलेले आहे. अशा चमच्यांची 1. जाती व समूदायवार चमचे 2. पार्टीवार चमचे 3. अज्ञानी चमचे 4. ज्ञानी चमचे 5.चमच्यांचे चमचे व 6. विदेशी चमचे असे वर्गीकरण केले आहे. अशा चमच्यापासुन समाजाचे फार मोठे नुकसान झाले.या चमच्यामुळे 1. आंबेडकरी आंदोलन दिशाहीन झाले 2. बुध्दिवादी वर्गात आंदोलनाबाबत अविश्वासहार्ता निर्माण झाली. 3. शोषित जनतेच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनाला निराशेच्या खाईत लोटण्यात आले. 4. नेतृत्वहीनता निर्माण झाली 5. विद्रोहाच्या चेतनेला नष्ट करण्यात आले. 6. समाजाला पर्यायाने देशाला निर्धन व गरीब बनविले.
पुणे कराराचा सुरुवातीपासून ते आजतागायत दलित जनता व काही विचारवंत व त्यांच्या संस्था विरोध करीत आहेत तरी समाजात चमचे निर्माण होण्याची प्रक्रिया थांबत नसून चमच्यांचे प्रमाण अधिक वाढताना दिसते. मा.कांशीराम यांनी चमचा युगावर मात करण्यासाठी अल्पकालिक व दिर्घकालिक उपाय सांगीतले आहेत.अल्पकालिक उपाययोजने अंतर्गत 1. चेतना निर्माण करण्यासाठी जागरुकता निर्माण करणे 2. दलित तथा शोषित समाजाला आत्मभानासाठी सक्रिय करणे 3. चळवळीत आक्रमकता निर्माण करणे. वरील तीन मुद्यांना कार्यप्रविण करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेळे ( महापुरुषांचे मेळे ) भरविणे 2. पुणे कराराचा धिक्कार करण्यासाठी चर्चासत्रे आयोजित करणे 3. जनसंसद भरविणे 4. शोषितांच्या दुचाकी साधनांचा वापर करणे 5. शोषिता मध्ये असलेली सामाजिक दुरी मिटविणे 6. सामाजिक कार्यवाहीसाठी संगठन निर्माण करणे. तर दिर्घकालिक उपायासाठी 1. स्वत:चा राजकीय पक्ष निर्माण करून राजकीय सत्ता हातात घेणे 2. नेतृत्व क्षमता निर्माण करणे 3. मागासवर्गीय व दलितामधील दुरी संपविण्यासाठी त्यांना एकाच धार्मिक संस्थेत आणण्याचा प्रयत्न करणे. 3. सांस्कृतिक बदल घडवून त्यावर नियंत्रण ठेवणे 4.जातीय संस्कृती नष्ट करणे. 5. ब्राम्हणी असमान संस्कृतीला विज्ञानवादी ( बुध्दवादी ) समान संस्कृतीचा पर्याय देणे. 6. मौर्य साम्राजाच्या पतनाच्या कारणाचा अभ्यास करून भविष्यासाठी त्यातुन बोध घेणे. 7. फुले आंबेडकरवाद्यांचा एक नेता - एक पक्ष असणे. 9. सांस्कृतिक, सामाजीक, राजकीय व आर्थिक बाबीवर नियंत्रनासाठी मातृसंस्थेची निर्मिती करणे.
वरील पर्यायावर आंबेडकरी सर्वसामान्य जनता व बुध्दिवादी वर्गाने चिंतन केल्यास चमचा युगाचा अस्त होऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील सम्राट अशोकाच्या साम्राज्याची पुनरावृत्ती करण्याकडे वाटचाल करता येईल.