बहुजन नायक कांशीराम - बापू राऊत
सामाजीक, राजकीय व धार्मिक चळवळीला विचाराने पुढे नेण्याचे कार्य हे विचारवंताकडून होत असते. हिंदुत्ववादी विचारवंताकडून प्रस्थापीत सनातनी ब्राम्हणी समाजव्यवस्था कायम राखण्याचे आटोकाट प्रयत्न करण्यात येत आहे. त्या साठी ते विविध प्रसारमाध्यमांचा वापर करुन घेत आहेत. परंतू या सनातनी व्यवस्थेला कलाटणी देण्याचे कार्य ज्यांना करावयाचे आहे तेच जर लालसेपोटी सनातन्याना शरण जाणार असतील तर आंबेडकरी परिवर्तनवादी चळवळीला सनातनवादी चळवळीचा वैचारीकदृष्टया मुकाबला कसा करता येईल ?.
आदी शंकराचार्याच्या काळात शंकराचार्यानी उपस्थित केलेल्या मुद्द्याना खोडून काढण्याचे सामर्थ्य बुध्दवादी विद्वानात नव्हते त्यामुळे शंकराचार्याच्या तत्वाचा भारतभर प्रसार झाला व बुध्द तत्वज्ञान मागे पडून भारतवासी बहजन समाजाच्या मुखात व मनात बुध्दाऐवजी शंकराचार्याने निवास केला. आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळीचे भविष्य अशाच वळणावर येऊन ठेपले आहे.
मा. कांशीराम यांची शिष्या कु. मायावती हिने मोठ्या चातर्याने उत्तर प्रदेश या आर्यावर्ताच्या राज्यात स्वबळावर राजकीय सत्ता हस्तगत केली.राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी अनेक राजकीय पक्ष वेगवेगळ्या कुटनितीचा वापर करीत असतात. ते धर्माधर्मात व जाती जाती मध्ये भांडणे लावतात.कोणी हिंदुत्ववादाच्या नावावर तर कोणी गरीबी हटविण्यासारख्या लालुसदारी नाऱ्याने सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करतात.मायावतीने ही एक डाव खेळला.हा डाव धर्माधर्मात - जातीजाती मध्ये भांडणे लाऊन राजकीय सत्ता हस्तगत करण्याचा नव्हता तर तो होता जाती तोडो समाज जोडो याचा. डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी समाज जोडण्याचे कार्य केले तर त्याचा शिष्य वर्ग तो तोडण्याचा प्रयत्न कसा करेल ?
बहुजनवादी महापुरुषाच्या विचारधारेचा जन माणसामध्ये प्रचार व प्रसार होऊ नये म्हणुन तथाकथीत बुध्दीवादी, चॅनेल्स व प्रिंट मिडीयानी उत्तर प्रदेशातील विजयाला सोशल इंजिनिअरींग सारखे नाव दिले.ब्राम्हणवादी मिडीयाचा हा अपप्रचार आपण समजू शकतो पण खुद्द आंबेडकरवादी याला फले आंबेडकरी विचारधारेचा विजय न मानता सोशल इंजिनिअरींग चा विजय मानतात हे मात्र धक्कादायक आहे. मायावती ह्या एकहाती लढाई लढत आहेत.दलित समाजातील काही विचारवंताचा त्याना पाठिंबा असला तरी अधिकाधिक विचारवंत हे मायावतीला विरोध करण्यासाठीच पुढे सरसावलेले दिसतात.मायावतीवर टिका करण्यासाठी त्यांच्या लेखण्या पुढे आलेल्या दिसतात. परंतु हेच विचारवंत राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यपध्दतीचा एकत्रीत पणे कसा मुकाबला करावा?. यावर कधीच मंथन करताना दिसत नाही.कांग्रेस व भाजपांच्या बहुजन विरोधी नीतीमुल्याना ते कधीच विरोध करीत नाही.उलट काॅंग्रेस व असतात. कॉंग्रेस प्रायोजीत भोपाळ जाहिरनामा सारखे पंचतारांकीत चर्चासत्रे अशा आंबेडकवाद्यासाठी मनोरंजनाची मैदाने झाली आहेत.काॅंग्रेसनेही त्यांच्या मनोरंजनांची बलस्थाने ओळखत सुविधा पुरविण्याचा सपाटा सुरु करते.यामुळेच या खुशालचेंडु विद्वानांचा एककलमी कार्यक्रम हा फक्त कांशीराम - मायावती व बसपा विरोध असा असतो. अशा विकाऊ बुध्दीवंताचा डॉ. बाबासाहेबांच्या महाराष्ट्रातच अधिक सुळसुळाट झालेला दिसतो.समाजाचा दोरखंड बनण्याची धमक यांच्यातून नष्ट झाली आहे हे विकावू बुध्दीवंत स्वत:ला प्रती बाबासाहेब आंबेडकर समजत असतात. आज बसपाकडे सर्व समाज आकर्षित होत आहे. ब्राम्हण समाज ही आकृष्ठ होत आहे. काही जणांना ही ब्राम्हणांची फुले आंबेडकरी चळवळीत घुसखोरी आहे असे वाटते. त्यासाठी प्राचीन इतिहासाचे दाखले देण्यात येतात. या ऐतिहासीक वस्तुस्थितीला कोणीही नाकारु शकत नाही. परंतु आजचा फुले आंबेडकरवादी लेचापेचा नाही हे लक्षात ठेवुन ब्राम्हणांना वापरुन घेण्याची कला फुले आंबेडकरवाद्यानी शिकली पाहिजे.
कांशीराम व त्यांच्या बहुजन समाज पक्षाचा उदय हा महाराष्ट्रातील तथाकथित आंबेडकरवादी विचारवंताना आवडलेला दिसत नाही. ते नेहमी कांशीराम व त्यांच्या कार्यशैलीवर टीका करीत आलेले आहेत.या तथाकथित विचारवंताना स्वतंत्र विचाराचा एखादा दलित मुख्यमंत्री व पंतप्रधान होणे आवडत नाही असेच दिसते. या तथाकथित विचारवंताना माहीत आहे, महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट आहेत, दलित जनता बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष या नात्याने या पक्षाकडे भावूकपणे बघते. हीच भावुक दलित जनता रिपब्लिकन पक्षाच्या अनेक गटात विभागलेली आहे. रिपब्लिकन पक्षाचे गट कधीच एकत्र येणार नाहीत याची त्यांना शंभर टक्के खात्री आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात सत्तेत येऊ न शकणाऱ्या बसपाचे गुणगाण गावून काॅंग्रेसकडून मिळणाऱ्या मानाच्या पदावर पाणी का सोडावे ? याच विवंचनेत चळवळीतील हे संधिसाधु दिसतात. ते नेहमी काॅंग्रेसची री ओढताना दिसतात. ते नेहमी आंबेडकरवादाचा डांगोरा पिटताना दिसतात परंतु व्यव्हारात आंबेडकरवादाच्या विरोधात काम करतात व गांधीवादाला समर्थन देतात. महाराष्ट्रातील तथाकथित आंबेडकवादी विचारवंत नेहमी सत्तेसोबत राहिले आहेत.
आज डावे व लोहियावादी पक्ष कधी नव्हे एवढे कमकुवत झाले आहेत तरी काही दलित विचारवंताना दलितांचे नेतृत्व डाव्या पक्षानी करावे असे वाटते. दलितांचे नेतृत्व कांशीराम - मायावतीनी करण्याच्या प्रक्रियेला धोकादायक असे संबोधित असतात. कांग्रेसची वाहवा करणारे व डाव्या पक्षाची री ओढणारे विचारवंत आंबेडकरवादी कसे असू शकतात ? ते एकतर नेहरु गांधीवादी ठरतात किंवा मार्क्सवादी होऊ शकतात. जाती निर्मुलन व जाती मुक्तीच्या लढ्याचे कर्णधार पद ते ब्राम्हणी डाव्याना द्यायला तत्पर दिसतात. कुलदिप नायर या तथाकथित नामवंत पत्रकाराने उत्तर प्रदेशात मायावतीच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणे हे भारतीय संस्कृती व देशाच्या सामाजिक व्यवस्थेला धोकादायक आहे असे म्हटले आहे. कुलदीप नायरचे हे वाक्य काय दर्शविते ? मायावती बहुमताने सत्तेत आली तर देशाची सामाजिक व्यवस्था बदलेल याची धास्ती अनेकाना आहे. त्यामुळे ब्राम्हणी प्रसारमाध्यमे देशात अमेरिकेप्रमाणे द्विपक्षिय पध्दत असावी यासाठी राष्ट्रीय चर्चा घडवित आहेत. अमेरिकेप्रमाणे दोन मुख्य पक्षाच्या प्रधानमंत्री पदाच्या उमेदवाराना समोरासमोर वादविवाद घडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे फुले आंबेडकरवादी बहजनवादी नेते व पक्षाच्या हातात या देशाची शासन व्यवस्था जाण्याची भीती वाटत आहे. काहीही झाले तरी सत्ता आमच्याच हातात असावी याचा आटापिटा मनुवादी करीत आहेत. राजकीय, सामाजीक व आर्थिक दृष्ट्या दलित मजबूत झाले तर देशात विविध पातळ्यावर संघर्षाचा भडका उडेल असे भाष्य मनुवादी लोक करीत असतात. त्यांच्या सुरात सूर आमचे विद्वान मिळवीत असतात. असे असले तरी कांशीरामजींच्या चळवळीमागे काही आंबेडकरवादी विचारवंत भक्कमपणे उभी होती. अनेकांनी आपल्या साहित्यकृती लेखनाच्या माध्यमातुन कांशीरामजींच्या चळवळीला मजबुत करण्याचा प्रयत्न केला. त्यात मुख्यत: व्हि. टी. राजशेखर, चंद्रभान प्रसाद, अशोक गजभिए, एच. एल. दुसाध, डॉ. विवेककमार, एस. के. बिस्वास, मोहनदास नेमिशराम, कंवल भारती, बुध्दशरण हंस, डॉ. लक्ष्मण भारती, कामता प्रसाद मौर्या, मा. म. देशमुख, आनंद भगत, संदेश भालेकर व प्रस्तुत पुस्तकाचे लेखक बापू राऊत यांचा समावेश होतो.