बहुजन नायक कांशीराम - बापू राऊत
आंबेडकरवाद हा सरळ सरळ दैववादावर हल्ला करतो.अंधश्रध्देला नेस्तनाबूत करण्याचे काम करुन तो विज्ञनवादाला कवटाळण्याचे आवाहन करतो. आज अनेक दलित चिंतक,साहित्यिक, राजकीय नेते स्वत:ला आंबेडकरवादी म्हणवून घेत असतात. परंतु आंबेडकरवादाच्या विरोधात दैववादावर विश्वास ठेवतात. रोज देवदेवतांची पुजाअर्चा करतात, अंधश्रध्दा पाळतात परंतु व्यासपीठावरुन भाषण करताना मात्र दैववादावर व अंधश्रध्देवर बेछूट हल्ला करतात व व्यव्हारात मात्र त्याच्या एकदम उलट वागतात. अशांना आंबेडकरवादी म्हणावे काय ? महाराष्ट्रातील अनेक दलित नेते व आंबेडकरवादी दैववादी आहेत. काही दलित नेते व साहित्यिक मंदिरात जातात व तेथील मुर्तीच्या पाया पडतात.काही जण घरात सत्यनारायणाच्या पुजा घालतात तर काही आपल्या मुलामुलींचा ब्राम्हणाकरवी मुंजा करतात व वरुन स्वत:ला आंबेडकरवादी बौध्द म्हणवून घेतात. तर दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला स्वाभिमानाने ताठ मान करुन जगण्याचे हक्क दिले. त्यामुळे आम्ही कोणाचेही मानसिक गुलाम नसून आम्ही आमच्या चळवळी स्वाभिमानाने चालवू अशा बाता करणारे आमचे भाषण बहाद्दर नेते व साहित्यिक विचारवंत प्रस्थापितांचे राजकीय व शैक्षणिक गुलाम म्हणून वावरतात.अनेकजन वर्षभर सामाजीक परीवर्तनाच्या करतात, प्रस्थापितावर, गांधीवाद्यावर व संघवादी विचारधारा राबविणाऱ्या भाजपा व शिवसेनेवर टिका करतात परंतु हेच लोक निवडणूकीच्या काळात कांग्रेस, भाजपा व राष्ट्रवादी पक्षाबरोबर ऊठबस करतात, त्या पक्षांचा प्रचार करीत मतांची भीक मागत फिरताना दिसतात. तर राजकारणासी आमचे काही देनेघेने नसून केवळ धर्म व समाजकारणात रुची आहे असे म्हणनारे महाभाग बुध्दविहार मतांच्या ( व्होट ) मोबदल्यात प्रस्थापित राजकीय पक्षाकडून मिळणाऱ्या भीकेतन उभी करीत असतात.
मा. कांशीरामजींनी दुसऱ्यांना खुष करण्यासाठी कधीच दैववादी वा नौटंकीपणाची भुमिका घेतली नाही.बहुजन समाजातील अनेक जातीना बहुजन समाज पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी त्या त्या जातीच्या मंदीरात वा पुजापाठात सामील होण्याचा भ्रामकपणा केला नाही.तर ज्या ज्या समाजात प्रस्थापीत मनुवादी व्यवस्थेला छेद देणारे महिला व पुरुष निर्माण झाले त्याना आदर्श पुरुषांचा दर्जा देवून त्यांचे विचार त्या त्या समाजात नेत त्यांची नाळ बामसेफ व पक्षासोबत जोडली. त्यांना पक्षाचे कॅडरबेस कार्यकर्ते बनविले. मा. कांशीरामजींच्या शिष्या कु. मायावतीनी नोव्हेंबर 2005 मध्ये मध्यप्रदेशात भाषण करताना बहुजन समाजाला देवी देवतांच्या फंदामध्ये ( चक्कर मध्ये ) न पडण्याचा सल्ला देत तोच पैसा पक्ष वाढविण्यासाठी देण्याचे लोकांना आवाहन केले होते. मायावती कधीच दैववादी राहिलेल्या दिसल्या नाही.ब्राम्हण, बनिया ठाकुर व यादव याना सोबत घेण्याच्या नशेत त्या असत्या तर मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी नंतर जय श्रीराम चा गजर करीत मंदिरात आशिर्वादासाठी गेली असती. परंतु मायावतीनी मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी नंतर सरळ लखनौच्या आंबेडकर पार्क मध्ये जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीला पुष्पाहार घातला व डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्कची देखभाल न करणाऱ्या अधिकाऱ्याला जागेवरच बडतर्फ केले. मायावती कार्यालयात जाण्यापूर्वी घरी ठेवलेल्या बुध्दाच्या मुर्तीला प्रथम नमन करतात. मा. कांशीराम व मायावतीनी इतर दलित नेत्यासारखा भ्रामकपणा जोपासला नाही. जो स्वत:ला आंबेडकरवादी म्हणवून घेतो त्याने बाबासाहेबांच्या विचार व तत्वाप्रमाणे चालले पाहिजे.त्याने बाबासाहेबांनी सांगितलेल्या गोष्टीचे पालन केले पाहिजे तरच तो आंबेडकरवादी व जे बाबासाहेबांच्या तत्वाला बाजूला सारुन व्यव्हार करतात ते खरे आंबेडकरवादी नसून मुखवटाधारी संधिसाधू असतात हे सामाण्य जनतेने लक्षात ठेवले पाहिजेत.