बहुजन नायक कांशीराम - बापू राऊत
देशाच्या राष्ट्रीय राजकारणात दबदबा ठेवणारे राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश एके काळी काॅंग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र याच उत्तर प्रदेशात कांग्रेस आपला जनाधार हरवून बसली आहे.आपली दलित व्होटबँक परत मिळविण्यासाठी राहुल गांधी दलितांच्या घरी जाण्याचे, झोपण्याचे व खाण्याचे नाटक करीत सारखा फिरताना दिसतो. दलितासोबत राहण्याने व त्यांच्या सोबत जेवन केल्याने दलितांचे प्रश्न सुटनार आहेत काय ? आता दलित पुर्वी सारखे मुर्ख राहिलेले नाहीत. कांशीरामजीनी उत्तर प्रदेशातील प्रत्येक दलितांना मिशनरी (कॅडर) बनवीले आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावर देशाला वेठीस धरणाऱ्या भाजपाला उत्तरप्रदेशात उतरती कळा लागली आहे तर जयभिम चा नारा देत बहुजन समाज पक्षाने स्वबळावर सत्ता काबीज केली आहे. बसपाच्या आजपर्यंतच्या रेकार्ड वर नजर घातली तर असे दिसते कि दलितांच्या मतावर मैदानात उतरणाऱ्या बसपाने विधानसभेत 1989 मध्ये 13 जागा, 1991 ला 12, 1993 ला 67 तर 2008 मध्ये 206 जागावर कब्जा करुन भारतीय राजकारणात नवा इतिहास रचून आंबेडकरवाद्यांचा देशाच्या राजकारणात दबदबा निर्माण केला आहे.
उत्तर प्रदेशात मायावतीच्या नेतृत्वात बसपाला मिळालेला विजय हि अनपेक्षीत घटना नाही वा त्यामागे कोणतेही सोशल इंजिनियरींग नाही तर तो आंबेडकरी राजकीय विचारधारेचा विजय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी आखलेल्या राजकीय रणनीतीला त्याच्याच काळात विजय प्राप्त झाला होता.आपल्या रणनीतीला उच्चकोटीवर पोहोचविण्यासाठी बाबासाहेबांना वेळ मिळाला नाही. परंतू बाबासाहेबांच्या व्यव्हारीक राजकीय रणनीतीला पुढे नेण्याचे महतकार्य मा. कांशीरामजी यांनी केले तर कांशीरामजीकडून अपुरे राहिलेले कार्य पुर्ण करण्याचे काम मायावती करताना दिसत आहे.दिल्लीला जाण्याऱ्या मार्गाचा उगम त्या लौखनौच्या वाटेवरुन बघतात.
राजकीय शक्ती शिवाय दलितांचे सामाजिक सन्मान बघण्याचे स्वप्न साकार होणार नाही. स्वतंत्र मतदार संघाच्या मागणीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हेतू स्पष्ट होता आणी तो म्हणजे अस्पृशाचे खरे प्रतिनिधी स्वतंत्र मतदार संघातून निवडणुकी द्वारे ससंद व विधान सभेत जावेत. दुसऱ्या गोलमेज परिषदेत त्यानी (7/09/1931) अस्पृश्यासाठी स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली. त्यानूसार ब्रिटिशांनी जातीय निवाडा जाहीर करुन अस्पृश्यासाठी स्वतंत्र मतदार संघाची निर्मिती केली. स्वतंत्र मतदार संघाच्या निर्णयाविरुध्द म.गांधीजीनी आपल्या जिवाची बाजी लावली. म. गांधीजीच्या 21 दिवसाच्या उपवासामुळे बाबासाहेबांना दलितांचे हित सोडून गांधीजीच्या राखीव मतदार संघाच्या प्रस्तावाला मान्यता द्यावी लागली. बाबासाहेबांना तेव्हा जे अभिप्रेत होते ते साकार करण्याचे कार्य कांशीरामजींनी मोठ्या चातुर्याने सुरु केले.बसपाच्या दलित नेतृत्वाखाली बहुजन समाजासोबत ब्राम्हणही एकत्र येत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या सेनापतीने लखनौ काबीज केले. कांशीरामजींचे अनुयायी जेव्हा दिल्ली काबीज करतील तेव्हाच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय विचाराला विजयाचे वलय प्राप्त होईल.
समाजाची एक स्वतंत्र वैज्ञानिक मानसिकता असते.जी सदैव व्यक्तीच्या हातात नसते.दोन समान विचारधारा व एकच मख्य लक्ष असलेले दोन प्रतियोगी यांचे गठबंधन होताना दिसत नाही उलट ते एकमेकांना नेस्तनाबूत करण्याचा सदैव प्रयत्न करीत असतात. ( उदा. रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट कधी एकत्र येत नाहीत, बसपा व पासवानाची लोकजनशक्ती कधी एकत्र येऊ शकत नाही तसेच बसपा व रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट एकत्र येऊ शकत नाही किंवा सारे गटाधिपती राष्ट्रीय पक्षाच्या नेत्या मायावतीला आपला नेता मानावयास तयार होत नाही. ). मात्र कांग्रेसला पराभूत करण्यासाठी शिवसेना व भाजपा हे एकत्र निवडणूक लढवित असतात.
आज समाजाला हजार वर्षापूर्वीचा तोच तो विचार सांगणारा नेता, विचारवंत वा संघटनेची गरज नाही तर आज खरी गरज आहे ती क्रांती घडविणाऱ्या, नवा विचार देणाऱ्या नेत्याची, विचारवंताची व तशा संघटनेची. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सविंधानाच्या माध्यमातून मनुवादाला नष्ट करण्याचे बीज रोवले होते.त्यातून ब्राम्हणवाद कमकुवत झालाही परंतु बाबासाहेबांना जे अपेक्षित होते ते होऊ शकले नाही. दलित व ओबीसीचीही एकजुट होऊ शकली नाही उलट त्यांच्यात संघर्ष निर्माण झाला.हा संघर्ष राजकारणात तर झालाच परंतु खेडोपाडी दलित व ओबीसी मध्येच अधिक तीव्र झाल्याचे दिसते. या संघर्षामुळेच दलितांना ज्यांच्या विरुध्द लढायचे होते त्या ब्राम्हणाशीच मैत्री करावी लागली.उत्तर प्रदेश हे त्याचे उदाहरण आहे. दलिताना अस्पृश्य समजले जात असल्यामुळे सामाजीक, धार्मिक व राजकीय स्तरावर त्याना कोणी मित्र म्हणून सहभागी करुन घेत नाही तर दुसरीकडे ब्राम्हणही आपल्या पूर्वजांच्या ककनि राजकीयदृष्टया कमकवत झाले आहेत त्यामुळे ते दलितांना आपला राजकीय मित्र समजू लागले आहेत. दलीत - ब्राम्हण अशी राजकीय युती होऊ लागली आहे.यावर कोणाच्या तरी नियंत्रणाची गरज आहे.इतिहासाची पाने चाळली तर ब्राम्हण हे कधीच विश्वासू राहिले नाहीत. त्यानी आपल्या मालकांच्या पाठीत खंजीर खुपसण्यास कधीही मागेपुढे पाहिले नाही. उत्तरप्रदेशाच्या प्रयोगातून दलित ब्राम्हणांचा साधन म्हणून वापर करतील कि ब्राम्हण दलितांचा साधन म्हणून वापर करतील हे येणाऱ्या पाच वर्षात कळेल. आज कांशीरामजी सारखे कणखर व खंबीर मार्गदर्शक नाहीत म्हणून दलित बाम्हण युतीचे धोके वाटतात. कांशीरामजी हयात असते तर दलित ब्राम्हणांची युती होऊ शकली नसती. सुश्री. मायावती ह्या ब्राम्हणांना कशा प्रकारे हाताळतात यावर बसपाच्या पुढच्या राजकारणाचे भवितव्य अवलंबून राहील.
जगात बदल होत आहेत तसे दलितांना बदलावे लागेल.आपण दुसऱ्याचे वाहक न बनता दुसऱ्याचा वाहक म्हणून वापर करावा लागेल, याचीच आज गरज आहे. आज सामाजीक न्यायाचा मुद्दा मागे पडत आहे.कोणताच राजकीय पक्ष व सामाजीक संघटना सामाजीक न्यायाचा विचार व त्यावर चर्चा करताना दिसत नाही.अजुनही देशात दलितांना सामाजीक न्याय व धार्मिक स्वातंत्र्य मिळालेले नाही.असे असतानाही दलितांच्या विकासाचे मुद्दे कोणीही पुढे रेटताना दिसत नाही.ही गंभीर बाब आहे. म्हणून दलितांनी सदैव जागरुक राहीले पाहिजे. दलितामध्ये अनेक पांढरपेशे लोक निर्माण झाले आहे. दलित चळवळ केवळ झोपडपट्ट्यामध्ये जिवंत असल्यासारखी दिसते. हे चित्र बदलले पाहिजे. प्रत्येक आंबेडकरवाद्यानी आपल्या सामाजीक, धार्मीक, राजकीय व सांस्कृतीक न्याय हक्कासाठी एकत्रपणे लढले पाहिजेत. तत्व व व्यव्हाराच्या सर्व क्षेत्रात आपला जेव्हा विजय होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने आंबेडकरवादाचा विजय होईल.