Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

तरुण राजकीय कार्यकर्त्यांना पत्र - शहिद भगतसिंग

     ( आपल्या पक्षाच्या कार्यक्रमाविषयी भगतसिंगने  येथे मांडणी केलेली आहे. भगतसिंगला फाशी झाल्यानंतर ३ ऑक्टोबर १९३१ रोजी कलकत्यामध्ये अटक केलेल्या श्रीमती विमला प्रतिभादेवी यांच्या घराच्या झडतीत हे कागद सरकारला सापडले. त्यातला गांधी विरोधी काही भाग सरकारने प्रसिद्ध केला. पण बाकीचा सर्व दडपून ठेवला. भगतसिंगचे एक सहकारी श्री. शिव वर्मा यांच्याकडून या लेखाची इंग्रजी प्रत आम्हाला उपलब्‍ध झाली. भगतसिंग अगोदरपासूनच म्हणजे १९२७-२८ पासून समाजवादी विचारांकडे वळत होते; अखेरच्या दिवसांत त्याच्या विचारांमध्ये या दिशेने किती स्पष्‍टता व पक्केपणा आलेला होता याचे दर्शन या आवाहनावरून आपल्याला होते. )

     प्रिय साथींनो

     आपली चळवळ सध्या एका अत्यंत महत्वाच्या अवस्थेतून जात आहे. एका वर्षाच्या जोरदार लढ्यानंतर आता गोलमेज परिषदेने घटनात्मक सुधारणांविषयी काही ठराव मांडले आहेत आणि काँग्रेसच्या नेत्यांना त्याबद्दल (मते मांडण्यासाठी) आमंत्रित करण्यात आले आहे. या परिस्थितीत काँग्रेसच्या नेत्यांना त्यांचे आंदोलन मागे घेणे योग्य वाटत आहे. ते आंदोलन मागे घेतात की नाही याला आपल्या दृष्टीने फारसे महत्त्व नाही. सध्याचे आंदोलन कोणत्या ना कोणत्या प्रकारची तडजोड होऊन बंद होणे अटळ आहे. ही तडजोड आज ना उद्या होणारच आहे आणि आपण साधारणपणे विचार करतो त्याप्रमाणे तडजोड ही काही नेहमीच अपमानास्पद व निषेधार्ह गोष्ट नसते. जुलमी सत्ताधीशांविरुद्ध उभ्या राहणाऱ्या कोणत्याही राष्ट्राला सुरुवातीला अपयश येणारच आणि संघर्षाच्या मधल्या काळात तडजोडी करून काही आंशिक सुधारणा पदरात पाडून घेणे हे करावेच लागते आणि नंतर राष्ट्राच्या सर्व शक्तीची सर्व साधने पूर्णपणे संघटित झाल्यावरच, संघर्षाच्या फक्त शेवटच्या टप्प्यावरच, शेवटचा आघात करून सत्ताधाऱ्यांचे सरकार उखडून टाकणे शक्य होते. पण त्याहीवेळी अपयशी ठरून कोणत्यातरी प्रकारे तडजोड करणे कधीकधी अटळ होते. रशियाच्या उदाहरणावरून हे सर्वात चांगल्या पद्धतीने समजून घेता येते.

letters to young political activists - Shaheed Bhagat Singh     १९०५ साली रशियात एका क्रांतिकारक आंदोलनाला तोंड फुटले. परदेशात आश्रयाला गेलेला लेनिन रशियात परत आला होता तो या लढ्याचे नेतृत्व करत होता. लोक त्याला सांगायला आले की एक डझन जमीनदारांना ठार करून त्यांचे महाल जाळण्यात आले आहेत. लेनिनने त्यांना सांगितले परत जा आणि बाराशे जमीनदारांना ठार करा आणि त्यांचे महाल जाळून टाका ! त्याच्या मते जरी क्रांती अपयशी झाली तरी यामुळे बरेच साध्य झाले असते. नंतर ड्यूमाची सुरुवात झाली. (ड्यूमा हे त्यावेळी झारने स्थापन केलेले संसदगृह-अनुवादक.) त्याच लेनिनने ड्यूमामध्ये भाग घ्यायला पाहिजे असे प्रतिपादन केले. हे १९०७ मध्ये त्याने सांगितले. १९०६ मध्ये पहिल्या ड्यूमामध्ये भाग घेण्यास लेनिनचा विरोध होता व त्यावर बहिष्कार टाकावा असे त्याचे मत होते. खरे तर ह्या पहिल्या ड्यूमाने दुसऱ्या (१९०७ मधल्या) ड्यूमापेक्षाही जास्त प्रमाणात काम करायला मोकळीक दिली होती; दुसऱ्या ड्यूमाचे बरेचसे हक्क काढून घेण्यात आलेले होते. १९०७ च्या बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे हे घडले. प्रतिक्रांतिकारक शक्ती वरचढ बन्त होत्या व ड्यूमाच्या व्यासपीठाचा समाजवादी कल्पनांवर चर्चा घडवून आणण्याचे व्यासपीठ म्हणून उपयोग करण्याची लेनिनला गरज वाटत होती.

     पुन्हा १९१७ च्या क्रांतीनंतर बोल्शेविकांना ब्रेस्ट-लिटोव्हस्क तहावर सह्या करणे भाग पडले-लेनिन वगळता सर्वांचा याला विरोध होता. पण लेनिन म्हणाला, शांतता, शांतता आणि पुन्हा शांतता! कितीही किंमत देऊन शांतता! जर्मन लष्करशहांना रशियाचे अनेक प्रांत तोडून द्यावे लागले तरीही! जेव्हा हा तह केल्याबद्दल काही बोल्शेविक विरोधी लोकांनी लेनिनचा निषेध केला तेव्हा त्याने खुलेपणाने जाहीर केले की जर्मन चढईचा मुकाबला करणे बोल्शेविकांना शक्य नव्हते आणि बोल्शेविक सरकार पूर्णपणे नष्ट होण्यापेक्षा असा तह करणे जास्त चांगले असे त्यांनी ठरवले. 

     मला मुद्दा हा मांडायचा आहे की, तडजोड हे सुद्धा एक आवश्यक शस्त्र आहे व लढ्याच्या विकासात अनेकदा ते वापरावे लागते. पण जी गोष्ट आपण सतत स्वत:समोर ठेवली पाहिजे ती म्हणजे आंदोलनाचे ध्येय. आपण कोणते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लढत आहोत याविषयी स्पष्ट कल्पना आपल्यासमोर ठेवली पाहिजे. आपल्या चळवळीचे यशापयश जोखणे व पुढचे कार्यक्रम सहजतेने ठरवणे याकरता याची मदत होते. टिळकांचे ध्येय काय होते हे बाजूला ठेवा; पण त्यांचे धोरण, त्यांची व्यूहरचना उत्कृष्ट होती. तुमच्या शत्रूकडून सोळा आणे मिळवण्यासाठी तुम्ही झगडता आहात, पण तुम्हाला फक्त एकच आणा मिळतो आहे-तो खिशात घाला आणि उरलेल्यासाठी लढा. नेमस्तांच्या बाबतीत त्यांचे उद्दिष्ट काय होते हे नीट बघा. ते एक आणा मिळवण्यासाठीच सुरूवात करतात आणि त्यांना तोही मिळत नाहीक्रांतिकारकांनी हे सदैव लक्षात ठेवले पाहिजे की त्यांचा झगडा संपूर्ण क्रांतीसाठी आहे. सत्ता पूर्णपणे त्यांच्या हातात आली पाहिजे. या दृष्टीने तडजोडीचे भय असते ते तडजोडीनंतर, स्थितीवादी शक्ती क्रांतिकारक शक्तींना विस्कटून टाकण्याचा प्रयत्न करतात म्हणून. पण कसलेले व धैर्यशील क्रांतिकारक नेते अशा धोक्यापासून चळवळीला वाचवू शकतात. अशा प्रसंगामध्ये आपण अतिशय काळजीपूर्वक वागले पाहिजे व खरे प्रश्न काय आहेत, चळवळीचे ध्येय काय आहे, याबाबत गोंधळ उड़ देता कामा नये. ब्रिटिश कामगार नेत्यांनी (लेबर लीडर्स) खऱ्या संघर्षाचा विश्वासघात केलेला आहे व आज ते केवळ ढोंगी साम्राज्यवादी उरले आहेत. माझ्या मते आपल्या दृष्टीने कडवे जैसे थे वादी. या सफईदार साम्राज्यवादी लेबर लीडर्सपेक्षा जास्त चांगले. चळवळीची धोरणे व डावपेच याबद्दल प्रत्येकाने लेनिनचे जीवनकार्य अभ्यासले पाहिजे. तडजोडीविषयीची त्यांची निश्चित मते त्यांच्या लेफ्ट विंग कम्युनिझम' या पुस्तकामध्ये सापडतील.

     मी वर असे म्हटले आहे की सध्याचे आंदोलन, म्हणजे सध्याचा लढा हा एकतर कुठल्यातरी तडजोडीने संपेल नाहीतर पूर्णपणे पराभूत होईल. 

     मी हे म्हणण्याचे कारण माझ्या मते या वेळी खऱ्या क्रांतिकारक शक्ती लढाईच्या मैदानात उतरलेल्या नाहीत. हा लढा मध्यमवर्गीय दुकानदार व काही थोड़े भांडवलदार यांच्यावर आधारलेला आहे. हे दोघेजण आणि विशेषत: यातली दुसऱ्या प्रकारची मंडळी कधीही कोणत्याही लढ्यामध्ये स्वत:ची मालमत्ता वा संपत्ती धोक्यात घालायला धजणार नाहीत. खऱ्या क्रांतिकारक सैन्याच्या तुकड्या खेड्यापाड्यांमध्ये व कारखान्यांमध्ये आहेत. शेतकरी व कामगार आहेत. पण या शक्तींना हाताळणे आपल्या भांडवली नेत्यांना नको आहे. तसे धाडस त्यांना होणेच शक्य नाही. हा निद्रिस्त सिंह एकदा झोपेतून जागा झाला तर त्याला आवरणे शक्य होणार नाही. आपल्या नेत्यांना जे साधायचे आहे ते साध्य झाल्यानंतरसुद्धा तो थांबणार नाही. १९२० मध्ये अहमदाबादच्या कामगारांचा पहिला अनुभव घेतल्यानंतर महात्मा गांधीनी म्हटले. “कामगारांना आपण हात लावणे टाळायला हवे. कारखान्यातल्या कामगारवर्गाचा राजकीय वापर करणे धोकादायक आहे" (द टाइम्स, मे १९२९), त्या वेळेनंतर कामगारांकडे वळण्याचे धाडस या नेत्यांना कधीही झाले नाही. मग उरतो शेतकरी. जेव्हा महाकाय शेतकरी वर्ग केवळ एका परक्या राष्ट्राच्या सत्तेचेच नव्हे तर जमीनदार वर्गाचेही जोखड उलथून फेकून द्यायला निघालेला पाहिला तेव्हा या नेत्यांना जी धडकी भरली तिचे स्पष्ट प्रति बिंब १९२२ च्या बार्डोली ठरावामध्ये पहायला मिळते.



Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209