मुक्ती कोन पथे ? लेखक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
धर्मांतराच्या विषयावर दोन दृष्टीने विचार केला पाहिजे; तसाच तात्विक दृष्टीने विचार केला पाहिजे. परंतु कोणत्याही दृष्टीने धर्मांतराचा विचार करू लागलो तरी प्रथमतः अस्पृश्यता हि काय बाब आहे, तिचे खरे स्वरूप काय, याचा पुरता समज करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय माझ्या धर्मांतराच्या घोषणेचा तुम्हाला कळणे शक्य होणार नाही. अस्पृश्यता हि काय बाब आहे, तिचे खरे स्वरूप काय, याचा तुम्हास आठवण करून देणे आवश्यक वाटते. सरकारी शाळेत मुले घालण्याचा हक्क सांगितल्यामुळे, विहिरीचे पाणी भरण्याचा हक्क सांगितल्यामुळे, वरात घोड्यावर नेण्याचा हक्क सांगितल्यामुळे स्पृश्य हिंदूंनी मारहाण केल्याची उदाहरणे नेहमीच घडत असल्यामुळे जी सर्वांच्या डोळ्यापुढे नेहमी असतात. परंतु मारहाण करण्याची दुसरी अशी अनेक कारणे आहेत कि ज्याचा उल्लेख केला असता हिंदुस्थानच्या बाहेरील लोकांना तरी त्याचा विस्मय वाटेल. उंची पोशाख घातल्यामुळे मारहाण केल्याचे उदाहरण देता येईल. पाणी आणण्या करिता तांब्या पितळेची भांडी वापरल्यामुळे केल्याचे उदाहरण देता येईल. जानवे घातल्यामुळे मारहाण केल्याचे उदाहरण देता येईल. मेलेली गुरे न ओढल्यामुळे व मेलेल्या गुरांचे मांस न खाल्ल्यामुळे मारहाण केल्याचे उदाहरण देता येईल. पायात बूट व मोजे घालून गावातून गेल्यामुळे, भेटलेल्या स्पृश्य हिंदुस जोहार न घातल्यामुळे, शौचास जाताना ताब्यात पाणी नेल्यामुळे छळ झाल्यामुळे उदाहरण देता येईल. पंचाच्या पंक्तीत चपाती वाटल्यामुळे मारहाण केल्याचे उदाहरण घडले आहे. वरील प्रकारचे जोरजुलूम झाल्याची व तुम्हाला अमानुष त-हेने वागविल्याची अनेक प्रकरणे ऐकिवात असतील, व तुमच्या पैकी काहींना तर त्याचा प्रत्येक्ष अनुभवही असेल, मारहाण करता येण्यासारखे नसेल तेथे बहिष्काराच्या शास्त्राचा तुमच्या विरुद्ध कसा उपयोग करण्यात येतो हेही तुम्हास अवगत आहेच. मोलमजुरी मिळू द्यायाचीची नाही; रानातून गुरांना जाऊ द्यायचे नाही, माणसाला गावात येऊ द्यायचे नाही वैगेरे सर्व प्रकारची बंदी करून स्पृश्य हिंदू लोकांनी तुमच्या लोकास जेरीस आणल्याची आठवण तुम्हा पैकी पुष्कळांना असेल. परंतु हे असे का घडते, याच्या मुळाशी काय आहे, हि गोष्ट माझ्या मते तुमच्या पैकी फारच थोड्या लोकांना कळत असेल. ती समजून घेणे माझ्या मते अत्यंत आवश्यक आहे.
वर जी कलहाची उदाहरणे दिली आहेत तिच्याशी व्यक्तीच्या गुणागुणाचा काही संबंध नाही. स्पृश्य आणि अस्पृश्य या दोन्ही समाजातील तो कलह आहे. एका माणसावर होत असलेल्या आगळीकीचा हा प्रश्न नव्हे, एका वर्गाने दुसऱ्या वर्गावर चालविलेल्या अन्यायाचा हा प्रश्न आहे. हा वर्ग कलह सामाजिक दर्जा संबंधीचा कलह आहे. या कलहाची जी वर उदाहरणे दिली आहेत त्यावरून जी एक बाब उघडपणे सिद्ध होत आहे ती हि कि तुम्ही वरच्या वर्गाशी वागताना बरोबरीच्या नात्याने वागण्याचा आग्रह धरता म्हणूनच हा कलह उपस्थित होतो. तसे जर नसेल तर चपतीचे जेवण घातल्यामुळे, जानवी घातल्यामुळे, तांब्या पितळेच्या भांड्यात पाणी आणल्यामुळे, घोड्यावरून वरात नेल्यामुळे तो वरच्या वर्गाचे कोणाचे नुकसान करीत नाही. आपल्याच पदराला खार लावतो. असे असता वरच्या वर्गाला त्याच्या करणीचा रोष का वाटावा? या रोषांचे कारण एकच आहे व ते हेच कि अशी समतेची वागवणूक त्यांच्या मानहाणीला कारणीभूत होते. तुम्ही खालचे आहात, अपवित्र आहात. खालच्या पायरीनेच तुम्ही राहिलेत तर ते तुम्हाला सुखाने राहू देतील पायरी सोडली तर कलहाला सुरुवात होते, ही गोष्ट निर्विवाद आहे. वरील उदाहरणांवरून आणखी एक गोष्ट सिद्ध हाते ती हि कि अस्पृश्यता हा नैमित्तिक नसून नित्याची आहे. हि गोष्ट स्पष्ट भाषेत सांगावयाची म्हणजे हा स्पृश्य अस्पृश्य यामधील कलह नित्याचा आहे व तो त्रिकालाबाधित असा राहणार आहे. कारण ज्या धर्मामुळे तुम्हाला खालची पायरी देण्यात आलेली आहे तो धर्म वरच्या वर्गाच्या म्हणण्या प्रमाणे सनातन आहे. त्याच्यात कोणत्याही प्रकारचा कालमानानुसार फेरबदल होऊ शकत नाही. तुम्ही आज जसे खालचे आहात तसे तुम्ही नेहमी खालचे राहिले पाहिजे, याचाच अर्थ असा का स्पृश्य व अस्पृश्य यांचे मधील हा कलह कायमचा राहणार आहे. या कलहातून तुमचा निभाव कसा लागणार हा मुख्य प्रश्न आहे व त्या प्रश्नाचा विचार केल्या शिवाय तुम्हाला गत्यंतर नाही असे माझे मत आहे. तुमच्या पैकी ज्यांना हिंदू लोक वागवतील त्याप्रमाणे वागावयाचे असेल, त्यांचा सेवा धर्म पत्करून जगावयाचे असेल, त्या लोकांना या प्रश्नाचा विचार करण्याचे काहीच प्रयोजन नाही. परंतु त्यांना स्वाभिमानाचे जिणे आवश्यक वाटते, त्यांना समतेचे जिणे आवश्यक वाटते, त्यांना या प्रश्नाचा विचार केल्या खेरीज गत्यंतर नाही. कोणत्या तन्हेने या कलहात आपला बचाव करता येईल याचा विचार करणे त्यांना आवश्यक आहे. या कलहातून आपला बचाव कसा होईल? या प्रश्नाचा विचार करणे मला तरी मोठेसे कठीण वाटत नाही, येथे जमलेल्या तुम्हा सर्व लोकांना एक गोष्ट कबूल करावी लागेल, व ती हि कि कोणत्याही कलहात ज्याच्या हाती सामर्थ्य असते त्यांच्याच हाती जय असतो. ज्याला सामर्थ्य नाही त्यात यशाची आशा बाळगावयास नको. हि गोष्ट सर्वाच्या अनुभवाने सिद्ध झालेली आहे. तिच्या समर्थनार्थ पुरावा देण्याचे कारण नाही.
याच्या पुढील प्रश्न जो तुम्ही विचारात घेणे आवश्यक आहे तो हा की या कलहातून सुटका करून घेण्यास तुमच्या पदरी पुरेसे सामर्थ्य आहे काय? मनुष्यमात्राला तीन प्रकारचे सामर्थ्य अवगत असते. एक मनुष्यबल, दुसरे द्रव्यबल आणि तिसरे मानसिक बल. या बलांपैकी कोणते बल तुम्हाला उपलब्ध आहे असे तुम्हाला वाटते? मनुष्य बलाच्या दृष्टीने तुम्ही अल्पसंख्यक आहात, हि गोष्ट तर उघडच आहे. मुंबई इलाख्यात अस्पृश्य वर्गाची लोकसंख्या एक अष्टमांश एवढाच आहे. ती ही संघटित नाही. आपसातील जातीभेदामुळे तिच्यात संघशक्तीचा पूर्ण अभाव आहे. संघटित नाही ती नाहीच; पण एकत्रित ही नाही. ती खेडोपाडी बिखुरली गेलेली आहे. अशा कारणामुळे असलेल्या अल्पसल्प संख्येचा देखील प्रसंग ग्रस्त झालेल्या अस्पृश्य वर्गाच्या वस्तीस कोणत्याही प्रकारचा उपयोग होऊ शकत नाही. द्रव्य बलाच्या दृष्टीने पाहिले तर तुमची तीच गत आहे. तुमचा जवळ थोड़े बहुत मनुष्यबल आहे असे म्हटले असता चालेल पण तुमच्या जवळ द्रव्य बळ मुळीच नाही हि गोष्ट निर्विवाद आहे. तुम्हाला व्यापार नाही उदीम नाही, नोकरी नाही आणि शतीही नाही. वरच्या वर्गाचे लोक जो घासकुटका देतील त्याच्यावर आज तुमची उपजीविका आहे. तुम्हाला अन्न नाही. तुम्हाला वस्त्र नाहीं तुमच्या जवळ द्रव्यबल ते काय असणार? अन्याय झाला तर कोर्टातून दाद मागण्या इतकी अवकाद आज तुमच्यात नाही. तुमच्यातील हजारो लोक कोर्टाचा खर्च सोसण्याची ऐपत नसल्यामुळे हिंदुकडून होणारा त्रास, विडंबना व जोरजुलूम अगदी मुकाट्यामे सोशीत आहेत. मानसिक बळाची तर याहीपेक्षा अधिक उणीव आहे. शेकडो वर्ष त्यांना केलेला विटंबना, छि - थू निमूटपणे सोसल्यामुळे उलट बोलण्याची सवय, प्रतिकाराची हिंमत नाहीशी झाली आहे. तुमच्यातील आत्मविश्वास, उत्साह व महत्वाकांक्षा यांचा बिमोड झाला आहे. तुमच्यात सर्व लोक हताश, दीनवाणे व निस्तेज झालेले आहेत. निराशेचे व नामद्रुमकींचे वातावरण सर्वत्र पसरले आहे. आपण काही करू शकू, अशा प्रकारचा विचार देखील कोणाच्या ध्यानी मना येऊ शकत नाही.