फुले - शाहू - आंबेडकर
बहुजन नायक कांशीराम - बापू राऊत
आज कांशीरामजीच्या अनुपस्थितीत सुध्दा बहुजन समाज पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचत आहे. सत्ताधारी व प्रस्थापित पक्षांना दलित नेतृत्वाचा बहुजन समाज पक्ष आव्हान देत आहे. 200 वर्षांची परंपरा लाभलेला कांग्रेस आज बसपामुळे भयभीत झाला आहे. जिथे बसपा बस्तान मांडते तिथे कांग्रेस भुईसपाट होते. हा आंबेडकरवादी राजकारणाचा विजय नव्हे काय ? बसपा जिथे जिथे जाते तिथे तिथे बाबासाहेबाचा हत्ती व निळा झेंडा पोहोचतो ही अभिमानाची बाब नव्हे काय ? कांशीरामजीनी आपल्या सामाजीक व राजकीय जीवनाची सुरुवात महाराष्ट्रातून केली.कांशीरामजीनी आक्रमक व तेवढ्याच संयमाने दलित व इतर मागास समाजाला जागे केले. अस्मितापूर्वक व स्वतंत्रपणे अव्वल राजकारणात भाग घ्यायला व सत्तेत वाटा मागायला उभे केले आहे.सत्तेचे वाहक व्हायची उत्तेजना त्यांनी दलित बहुजन समाजात निर्माण केली. एका अर्थाने बहुसंख्य समाजाच्या खालच्या जाती जमातीनी बनलेल्या व आजवर दडपून ठेवलेल्या जमीनीला त्यांनी नागरले. त्यांची समोरची पिढी त्यातून कसे पीक काढते यावर बहुजन समाजाचे भविष्य अवलंबून असेल ? मुलगामी समाजपरिवर्तनाचा व खऱ्याखुऱ्या सत्तांतराच्या संदर्भात दलित जनतेने देशाचे नेतत्व केले पाहिजे. दलित समाज देशाचे नेतृत्व तेव्हाच करु शकेल की जेव्हा संपूर्ण दलित समाज एकाच नेत्याच्या नेतृत्वाखाली एकत्र येईल. मग आपोआप बहुजनातीलच नव्हे तर उच्चभ्रू समाजातील जनताही दलितांचे नेतृत्व स्विकारेल.
उत्तर प्रदेश या आर्यावर्ताच्या राज्यात हे तर बघायला मिळतच आहे.अनेक ब्राम्हण नेते सुर्श्री मायावतीच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीच्या कार्यक्रमात दलित मायावतीच्या वाकन पाया पडताना साऱ्या देशाने बघितले आहे. ही एक सामाजीक क्रांतीच आहे. ब्राम्हण जयभीम म्हणायला लागला. घरी व कार्यालयात आंबेडकर, बध्द व कांशीराम यांचा फोटो लाऊ लागला. निळा झेंडा खांद्यावर घेऊ लागला. हा काळाने ब्राम्हाणावर घेतलेला सूड नव्हे काय ? उत्तर प्रदेशात तर गटार नाले साफ करण्यासाठी हजारो ब्राम्हण, राजपूत, ठाकूर व ओबीसी तरुणांचे अर्ज प्राप्त झाले हि भविष्यात येऊ घातलेल्या सामाजीक क्रांतीची चाहुल नव्हे काय ? उत्तर प्रदेशात बहुजन महापुरुषाच्या नावे विद्यापिठे, जिल्हे, तालुके, महाविद्यालये व स्मृती भवन बांधण्यात येत आहेत वा नामांतरण करण्यात येत आहे. त्यासाठी कोणाचाही विरोध नाही.सगळे सुरळीत होत आहे.उत्तरेत बौध्द संस्कृतीच्या पाऊलखुणा पाजळू लागल्या आहेत.
महाराष्ट्रात मराठावाडा विद्यापिठाचे नामांतर करण्यास हजारो दलितांना बलिदान द्यावे लागले.पोचीराम कांबळे ला आपले डोळे गमवावे लागले. हजारो दलितांच्या घराना आगी लावण्यात आल्या. असंख्य शिक्षित तरुणांचे करीअर नामांतर चळवळीमूळे नष्ट झाले. पुरोगामी विचाराचा टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्रात हे सारे घडत राहीले व आजही खैरलांजी सारखे प्रकार घडत आहेत. मात्र आर्यावर्ताच्या उत्तर प्रदेशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आमदार, खासदार तर बनतातच पण शासनकर्ते (सत्ताधारी) सुध्दा बनतात एवढेच नव्हे तर मायावती द्वारा बहुजन महापुरुषांच्या नावे सुरु केलेल्या कोणत्याही उपक्रमाला जनते द्वारे विरोध होत नाही. हि कांशीराम यांची विचारसरणी, कार्यक्रम, जिद्द व डावपेच यातून साकार झालेली सामाजिक क्रांती आहे. राहिला प्रश्न दलितांच्या विकासाचा व उत्थानाचा, त्यासाठी दलित विचारवंतानी, समाज कार्यकर्त्यांनी सत्तेचे फायदे दलितांच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचविले पाहिजेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हयातीत गांधीवादाला कमालीची टक्कर दिली. मार्क्सवादाच्या पाठीमागे न लागता बुध्दाच्या मार्गाने जाण्याचे आदेश आपल्या अनुयायांना दिले. कांशीरामजीनी सुध्दा तेच केल्याचे दिसते. त्यांनी काॅंग्रेसला नागनाथ व भाजपाला सापनाथ अशी संज्ञा देऊन आपले शत्रु कोण व आपल्याला कोणाविरुध्द लढायचे याचे संकेत दिले.एका शत्रूचा उपयोग करुन दसऱ्या शत्रचा नायनाट कसा करायचा याचा प्रयोग त्यांनी उत्तर प्रदेशात केला. कांशीरामजींनी डॉ. बाबासाहेबाप्रमाणेच मार्क्सवादी डाव्या पक्षांना महत्व दिले नाही. डाव्या पक्षांचा कार्यकर्ता हा दलित बहुजन तर नेता उच्चवर्णीय आहे.कांशीराम यांची नजर डाव्या पक्षातील दलित बहजन कार्यकर्त्यावर होती.हे कार्यकर्ते दलित नेतृत्व असलेल्या पक्षाकडे कालांतराने वळतील याची त्याना खात्री होती. इतर समाजगट व त्यांचे प्रभावशाली नेते बहुजन समाज पक्षात सामील होत आहेत. कांशीराम यांच्या अशा तिरप्या चालीने प्रस्थापित ब्राम्हणवादी पक्ष भयभीत झाले आहेत. त्यांच्या बापजाद्यांची आजपर्यंतची परंपरागत व्होट बँक बहुजन समाज पक्षामूळे दूर होत आहे. त्यांची सत्तास्थाने हिसकावली जाण्याच्या भीतीने ते पुरते धास्तावले आहेत.उत्तरेत व देशाच्या काही राज्यात बसपाचे कोणतेही कार्यक्रम जसे की सभा, संम्मेलने व व मेळावे हे प्रस्थापीत पक्षाच्या तुलनेत सक्षम असतात. पूर्वी मळकट कपडे व सायकल वर येणारा बहुजन समाज पक्षाचा कार्यकर्ता हा आता सुटबुटात व चार चाकांच्या गाडीत फिरतो हा लक्षणीय बदल आहे. कुलदीप नायर या मनुवादी पत्रकाराने तर केंद्रामध्ये मायावती सत्तेत आल्या तर भारतीय समाजव्यवस्था धोक्यात येईल अशी भीती व्यक्त करीत मायावती ह्या सवर्ण समाजासाठी धोक्याची घंटा आहे हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.म्हणून मायावती व बहुजन पक्षाला रोखण्यासाठी कांग्रेस व भाजपा या पक्षांची आतून यूती होत आहे.