सांस्कृतिक क्रांती हे सर्व क्रांतींचे मूळ आहे. त्यामुळे तुकारामांचा उपदेश ओबीसींनी यापुढे मनापासून अंमलात आणावा -
“आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने ।
शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू ।।
शब्दचि आमुच्या जीविचे जीवन ।
शब्द वाटू धन जनलोका ।।
तुका म्हणे शब्दचि हा देव ।
शब्देचि ईश्वर पूजा करू ।।"
गेल्या शतकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धप्रणित मानवमुक्तीचा मार्ग अस्पृश्यांना दाखवला. यामुळे तो समाज ज्ञानमार्गावरील प्रवासी बनला. इतिहासाचा अर्थ लावणे, आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडणे, पिढ्यान्पिढ्यांची वेदना शब्दबद्ध करणे यातून दलित साहित्य समृद्ध होत गेले. बाबुराव बागुल, वामनदादा कर्डक, राजा ढाले, नामदेव ढसाळ, यशवंत मनोहर यांच्या साहित्यातून प्रेरणा घेतलेल्यांनी दलित अस्मितेची चळवळ घडवली. त्या चळवळीची प्रेरणा व संविधानाने दिलेले हक्क यांच्या योगे आज दलित समाज बलवान व आत्मविश्वासपूर्ण बनून प्रगत बनलेला
आहे.
महात्मा फुले यांचे कार्य व साहित्य ही बाबासाहेबांची प्रेरणा होती; आणि तीच प्रेरणा समस्त ओबीसी जनांना मार्गदर्शक ठरणार आहे. ब्राह्मणी पद्धतीने लिहिलेल्या इतिहासाचा प्रतिवाद करणे व त्या जागी बहुजनांचा खरा इतिहास प्रस्थापित करणे ; कपिल, कणाद, बळी यांसारख्या बहुजन नायकांची चरित्रे लिहिणे, नवे उत्सव निर्माण करणे, अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य मिळविणे व जातीविहीन बहुजन समाजाच्या विकासाचे स्वप्न पाहणे ही महात्मा फुलेंच्या तत्त्वज्ञानाची वैशिष्ट्ये आहेत. त्यांना अनुसरून ओबीसी समाजातील विद्वान व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन अखिल भारतीय शास्त्र साहित्य परिषदेची निर्मिती करायला हवी.
अखिल भारतीय ओबीसी संमेलनाचा अध्यक्ष म्हणून या परिषदेची निर्मिती करण्याचा संकल्प मी जाहीर करतो. या परिषदेच्या वतीने बहुजन नायकांच्या चरित्रांचे प्रकाशन, ओबीसी जातींच्या इतिहासाचे संशोधन, कारागिरांच्या पारंपरिक तंत्रज्ञानाचे दस्ताऐवजीकरण आणि ओबीसींमधील लोकांनी सहन केलेल्या वेदनांचे चित्रीकरण करणाऱ्या पुस्तकांचे लेखन व प्रकाशन असे उपक्रम चालविण्यात येतील. ओबीसी समाज ज्ञानसन्मुख बनल्याशिवाय त्याची प्रगती होणार नाही, म्हणून प्रत्येक ओबीसी बांधवाच्या घरात एक वाचनालय असावे, यासाठी परिषदेच्या वतीने 'घर तेथे ग्रंथालय' अशी योजना राबविण्यात येईल.
शहरांमध्ये कारागिरांच्या तंत्रशाळा उभ्या केल्या पाहिजेत. शिकणाऱ्या मुलांसाठी वसतिगृहे व स्कॉलरशिपची व्यवस्था करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर श्रमप्रतिष्ठा आणि श्रमिकप्रतिष्ठा यांना महत्त्व देऊन संघटित होऊन संघर्ष आणि निर्माण या दोन पायांवर नवी चळवळ उभी करावी लागेल. या जमातींचा इतिहास एक तर नष्ट करण्यात आलेला आहे किंवा विकृत करण्यात आलेला आहे. म्हणून नव्या शालेय इतिहास संशोधन मंडळाची स्थापना करण्यात यावी. आपण प्रतिष्ठित झालो, म्हणून प्रस्थापित ब्राह्मण होऊन चालणार नाही. ज्यामुळे आपण प्रतिष्ठित झालो, त्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी जिथे असू तेथून, जसे असेल तसे आणि जेवढे जमेल तेवढे काम पुढे न्यायला हवे. आपण उरलेल्या समाजाचे काही देणे लागतो याचे भान ठेवायला हवे.
'प्यास उनके भी नसीब में लिखी होगी ।
उनके लिए भी थोडा दरिया छोडो ।।
साथ चलते रस्ते की पकड लो उंगली ।
पीछे हटती रस्ते का भरोसा छोडो।।'
(स्रोत- डॉ. राजेंद्र कुंभार, यांचे भाषण, दुसरे राज्यस्तरीय सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन, सोलापूर, ९-१० फेब्रुवारी २०१३)