आर्यपूर्व काळामध्ये मोहोंजोदडो, हडप्पा, लोथल, प्राग्जोतिषपूर इत्यादी ठिकाणांवरून भारतीयांचा व्यापार मेसोपोटेमिया, बाबिलोनिया, अॅबिसिनिया, सीरिया, मध्य अमेरिका (ब्राझिल), जावा, सुमात्रा, बोर्निया, ऑस्ट्रेलिया (आंध्रालय) यांच्याशी भूमार्गाने व समुद्रमार्गाने सुरू होता, याचे विपुल पुरावे भारतातील व इतर देशांतील उत्खननात सापडले आहेत. जोपर्यंत हा व्यापार सुरू होता, तोपर्यंत भांडी, कापड, रेशीम, हत्यारे, अवजारे, शिल्पे, कातडी वस्तू, गाड्या, जहाजे, बंदरे यांच्या निर्मितीसाठी कारागीर जातींची गरज लागत होती. अर्थातच या व्यापारामध्ये भरपूर नफा मिळत असल्याने कलाकार, कारागीर व व्यापारी यांना कनिष्ठ समजून गुलाम करणे कोणालाच शक्य नव्हते, म्हणजे जातीयता-बलुतेदारी अशाप्रकारची व्यवस्था त्या काळात असणे शक्य नव्हते. आर्यांच्या असंस्कृत व रानटी आक्रमणानंतर येथील नगरे उद्ध्वस्त झाली. सुसंस्कृत राज्ये लयाला गेली. नव्या रानटी आर्य टोळीप्रमुखांनी सर्वप्रथम समुद्रप्रवास निषिद्ध ठरवून त्यावर बंदी घातली. परिणामी, कारागिरांचे व्यवसाय बुडाले. देशांतर्गत वाहतूक करणारे लमाण व वंजारी देशोधडीला लागले, राजाला नियंत्रितपणे मांस पुरविणारे बेवारस झाले. जुन्या कृषिदेवता, स्त्रीदेवता व यातुदेवता विस्थापित झाल्या. त्यांचे पुजारी रानोमाळ भटकू लागले. आंतरराष्ट्रीय व्यापार असणारी नगरे लयाला गेल्याने चित्रकार, शिल्पकार, वास्तुतज्ज्ञ, रथकार यांचेही व्यवसाय बुडाले. म्हणूनच यजुर्वेदाच्या पहिल्या भागामध्ये यज्ञविधीसाठी लागणाऱ्या विटा अनार्यांच्या ओसाड व पडक्या गावातून आणाव्यात असे म्हटले आहे. हडप्पामधील विटांचा ५००० वर्षांनंतरही वापर होतो. त्या दर्जाच्या विटा अजूनही करता येत नाहीत. आर्यांच्या आक्रमणाने अत्यंत सुस्थिर विज्ञानवादी व बुद्धिमान समाजव्यवस्था छिन्न-भिन्न झाली. त्यातूनच आजचे ओबीसी, भटक्या जमाती व विमुक्त जमाती यांची निर्मिती झाली आहे. भारतामध्ये कारागिरांच्या मोठ्या वसाहती होत्या. जेथे चांगल्या दर्जाचा कच्चा माल विपुल आहे, तेथे तेथे एकजातीय गावे आजही दिसून येतात. उदा. कुंभारगाव, लोहारवाडी, लोहारा, धाऊडवाडा इ. जाती, वर्ण व बलुतेदारी पद्धतीत अशा प्रकारच्या एकजातीय गावांना स्थान असू शकत नाही, हे उघड आहे. आपले व्यवसाय गेल्याने देशोधडीला लागलेले लोक ब्राह्मणी समाजाने जवळ केले, पण गावाचे गुलाम म्हणून त्यांना वरकड उत्पादन करण्यास बंदी घालण्यात आली. संपत्ती राखण्यास बंदी घालण्यात आली. त्याने सर्व गावाची गरज भागवावी आणि गावाने त्याला जगण्यापुरते धान्य द्यावे असे समजले जाई. जुन्या व्यवस्थेत असणारे शिकारी आता पारधी बनले. कलाकार, गायक यांच्यापासून नट, छारा, भार, कंजारभाट, मीना अशा भटक्या जमाती बनल्या व उपजीविकेच्या साधनाअभावी गुन्हेगार बनल्या. सुसंस्कृत नगरे उभारण्याचे, व्यापारी रस्ते बांधण्याचे, रस्त्याशेजारी तळी खोदण्याचे काम थांबल्याने गाडीवडार, मातीवडार, पाथरवट, कलवडरु या समृद्ध जाती दरिद्री होऊन बहिष्कृत झाल्या. कच्छपासून कोहिमापर्यंत आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत व्यापाराचा माल वाहून नेणारे समुद्रावरून घाटावर मीठ पोहोचविणारे व्यापारच थांबल्यामुळे हीनदीन झाले. त्यांनाच लमाण, बंजारा, असे म्हणतात. अनेक वंजाऱ्यांकडे लाख लाख बैल असत. त्यांना लाखाबंजारा असे म्हणत. जुन्या काळ्या स्त्रीदेवता-विठलाई, अंबाबाई, काळम्मा, लक्ष्मीबाई, भावकाई, जोगुळांबा, स्थळदेव, म्हसोबा, थळोबा, वेताळबा आदी अप्रतिष्ठित होऊन त्या जागी शेतकऱ्यांवर खंडणी लादून पिळवणूक करणारे याज्ञिक ब्राह्मण आल्याने देशोधडीला लागलेल्या पूर्वीच्या भगतपुजाऱ्यांमधून, गोसावी, भराडी, बाळसंतोष, कुडमुडे जोशी इत्यादी भटक्या जमाती बनल्या. वरील विवेचनावरून आपल्या असे लक्षात येईल की, भारतीय समाज एकूण पाच घटकांपासून बनलेला आहे. पिळवणूक, दान, दक्षिणा, दहशत यांच्या आधारावर जगणारा ऐतखाऊ ब्राह्मण समाज, ब्राह्मणांना फितूर असणारा, पण ब्राह्मणांच्याइतका दर्जा नसणारा आणि ब्राह्मणी तत्त्वज्ञानाच्या मदतीने, तलवारीच्या जोरावर उरलेल्या श्रमिक समाजावर अन्याय करणारा क्षत्रिय समाज, पूर्वीच्या काळी बुद्धिमत्तेच्या व कौशल्याच्या जोरावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यापार करून समृद्ध झालेला स्वतःची दैवत व्यवस्था व तत्त्वज्ञान असलेला ओबीसी समाज, पूर्वी ओबीसी समाजाला धरून राहून राज्यकर्ता बनलेला, पण आज ब्राह्मणी व्यवस्थेकडून पराभूत झालेला अस्पृश्य समाज आणि आर्य-अनार्यांच्या संघर्षाशीदेखील कमीतकमी संबंध ठेवलेला स्वयंभू, पण अलिप्त आदिवासी समाज.
ब्राह्मणी व्यवस्थेने समाजातील चार गटांचे जे नुकसान केले त्यामुळे ते गट अवनत झाले, परंतु आर्यभटांनी ओबीसींचे जे नुकसान केले त्यामुळे केवळ भारताचेच नव्हे, तर साऱ्या जगाचे नुकसान झाले. कारण ओबीसींच्या व्यापारामुळेच भारत जगाला शून्याची देणगी देऊ शकला. त्रिकोणामिती, कॅल्क्युलस, खगोलशास्त्र, औषध, विज्ञान सर्जरी, प्रोजेक्टाईल मोशन, नौकानयन या साऱ्या गोष्टी भारतीय ओबीसी जातींनी निर्माण केल्या, वाढविल्या व जगाला अर्पण केल्या.
ओबीसींच्या गुलामगिरीमुळे भारताला विज्ञानविषयक अंधारयुगात दीर्घकाळात रहावे लागले व पुढे गुलामदेखील व्हावे लागले. आजही जो पिढ्यानपिढ्या लोखंडविषयक काम करतो, त्याच्या मुलाला मेकॅनिकल इंजिनियरिंगला जाता येत नाही. औषधांचे व उपचारांचे ज्ञान जतन करणाऱ्या धनगर, वैदू, न्हाव्यांच्या मुलांना डॉक्टर होता येत नाही. जोपर्यंत ओबीसींना विज्ञान, तंत्रज्ञान आदी क्षेत्रांमध्ये प्राधान्य मिळत नाही, त्यांच्यासाठी मोफत तंत्रशिक्षण उपलब्ध होत नाही, तोपर्यंत भारताला नोबेल पारितोषिकाची स्वप्ने पाहता येणार नाहीत.
आर्यांच्या आगमनानंतर झालेल्या पराभवातून सावरून बौद्धकाळात कारागिरांनी पुन्हा आपले संघ प्रस्थापित केले. कला-कौशल्ये व व्यापार बहरू लागला. भारतात आढळणारे स्तूप, शिल्पस्थळे, लेणी, कारागीर संघांनी दिलेल्या देणग्यांमधून उभारले गेले आहेत; याचे विपुल पुरावे मिळतात. यादव काळापर्यंत ब्राह्मणी ग्रंथ काहीही म्हणोत, कारागीर श्रेणी त्यांचे ऐकत नसत आणि राजाही त्यांना शिक्षा करू शकत नसे. परंतु यादव काळात हेमाद्री, विज्ञानेश्वर आदि ब्राह्मणी लेखकांनी लिहिलेल्या मिताक्षरी, चतुर्वर्ग चिंतामणी, दायभाग, पुराणे व अनेक स्मृतींनी समाजाची मने ब्राह्मणी व जातीय विचाराने कुजू लागली. यादवांच्या पराभवाबरोबर बेलगाम जहागीरदार व त्यांची सैन्ये, भाकडकथांनी आपल्या पोतड्या भरलेले भटभिक्षूक यांच्यामध्ये ओबीसी समाज भरडला जाऊ लागला. जहागीरदार व जमीनदारांची सैन्ये, शेत व बाजारपेठा लुटत, आणि उरलेले द्रव्य आर्यभट्ट भोंदाडून नेत. ओबीसींना शूद्र गुलाम ठरविण्यात आलेच, पण त्यांच्या भाषेलाही अपवित्र समजण्यात आले. बाराव्या शतकात ओबीसींची दोन क्रांतिकारक बंडे झाली. या दोन्ही बंडांची मुळे महाराष्ट्रात आणि विशेषतः सोलापूर जिल्ह्यात आहेत. एक वारकऱ्यांचे बंड आणि दुसरे लिंगायत यांचे बंड. ही दोन्ही बंडे केवळ धार्मिक नव्हती, तर आर्थिक, राजकीय व सामाजिकही होती. या दोन्ही चळवळींनी स्त्री-पुरुष समतेचा स्वीकार केला आहे. वारकरी चळवळीची परिणती स्वराज्यनिर्मितीमध्ये झाली, लिंगायत चळवळीमुळे कल्याण क्रांती झाली. वारकऱ्यांनी समतेचा संदेश देणारी 'वारी' जगाला दिली, तर लिंगायतांनी समतेचा व लोकशाहीचा उद्घोष करणारा अनुभव मंडळ' निर्माण केला. वारकऱ्यांनी ब्राह्मणी देव नाकारून विठ्ठल हा एकच ईश्वर प्रस्थापित केला, तर लिंगायतांनी वेद, श्रुती, स्मृती यांच्याबरोबर भटांना पोसणारी देवळेही नाकारली. परंतु या दोन्ही चळवळीतील एक महत्त्वाचा भेद लक्षात घेणे गरजेचे आहे. तो असा की, वारकऱ्यांची समता वाळवंटापुरती मर्यादित राहिली, ती गावात शिरू शकली नाही. परंतु लिंगायतांनी घराघरांत समता आणून प्रत्यक्षात आंतरजातीय विवाहही लावून दिले. त्यांनी श्रमाला व श्रमिकाला प्रतिष्ठा मिळवून दिली. 'कायकवे कैलास' असा क्रांतिकारक मंत्र दिल्यामुळे ओबीसी समाजामध्ये नवचैतन्य संचारले व त्यांनी सर्व क्षेत्रांमध्ये कर्तृत्व गाजवायला सुरवात केली. ओबीसींच्या उद्धारासाठी लिंगायतांचा श्रमप्रतिष्ठा विचार हा एकमेव क्रांतिकारक मार्ग आहे, असे माझे ठाम मत आहे.