अस्पृश्य जाती व आदिवासी हे अल्पसंख्य असल्याने व विज्ञान, तंत्रज्ञान आणि साक्षरता यांबाबतीत फारच मागासलेले असल्याने ते आरक्षणाचा फायदा घेऊन आपल्या राजकीय व आर्थिक साम्राज्याला धक्का देतील, अशी भीती संसदेतील उच्चवर्गीय व उच्चवर्णीयांना वाटत नसल्याने त्यांच्या आरक्षणाला विरोध झाला नाही.
परंतु कारागीर व कलाकार जाती एक झाल्या, तर कल्पकता, विज्ञान, तंत्रज्ञान व सर्जनशीलता यांच्यायोगे ते ब्राह्मणी मक्तेदारीला सुरुंग लावून या देशात सत्ताधारी होतील, अशी भीती असल्याने विविध खुसपटे काढून ओबीसी जातींचे आरक्षण लांबणीवर टाकणे, त्यांच्यामध्ये घटनेत कोठेही नसणारे क्रिमीलेअरचे तत्त्व घुसडणे, जनगणनेमध्ये त्यांची मोजणी न करणे, त्यांना शिष्यवृत्तीच्या नावावर फक्तं फी-माफी देणे अशी अनेक कटकारस्थाने करून ओबीसींना न्याय्य-हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले. ओबीसी जातींची संख्या एकूण लोकसंख्येत अर्ध्याहून अधिक असल्याने ते आरक्षणाचा फायदा घेऊन प्रगती करतील आणि त्यांना एकत्र राजकीय ओळख मिळाल्याने ते राज्यसत्तेवर कब्जा करतील. परिणामी, भारतामध्ये SC, ST, OBC या तिघांची एकत्र अस्मिता निर्माण होईल, त्यायोगे देशात वर्गविहीन व जातिविहीन समाज निर्माण होईल अशी सार्थ भीती या देशातील ब्राह्मणवाद्यांना वाटते. याचबरोबर मोठे जमीनदार व उद्योगपती यांनाही ओबीसींची भीती वाटते, कारण ओबीसी एकत्र येऊन सत्तेवर आले तर संविधानाच्या कलम ३९ चा आग्रह धरून इथल्या नैसर्गिक व मानवनिर्मित संसाधनाच्या समान वाटपाची मागणी करतील. वर्णविहीन व जातीविहीन, श्रमआधारित, समतावादी समाज निर्माण होणे हे येथील देवळांच्या उत्पन्नावर जगणाऱ्या पुरोहितांना व पुरोहितांच्या आधारावर जगणाऱ्या पुढाऱ्यांना परवडण्यासारखे नाही. ओबीसी कोण आहेत, ते किती आहेत, हे कळू नये म्हणूनच १९३१ नंतर ब्राह्मण्यग्रस्त अधिकाऱ्यांनी लोकल बोर्डातील जमीनदार लोकप्रतिनिधींना हाताशी धरून १९४१ ची जातवार जनगणना रोखली. तसेच त्यानंतरच्या काळातही जातवार जनगणना होऊ दिली नाही. ती झाली असती तर भारतात एक सामाजिक क्रांती झाली असती. इतर मागासवर्गीय कोण? ते किती आहेत ? हे कळले तर राष्ट्रीय अंदाजपत्रकात त्यांना तेवढा वाटा द्यावा लागला असता. संवैधानिक आरक्षण तेव्हाच मिळाले असते आणि उच्चवर्गीय व उच्चवर्णीय मूठभर समाजगटांना इतर मागासवर्गीयांच्या न्याय्य हक्कांवर दरोडा घालता आला नसता.
एका बाजूला राजकीय हत्यारे वापरून इतर मागासवर्गीयांना आरक्षण व इतर हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले, तर दुसऱ्या बाजूला पौराणिक भाकडकथा, वैदिक गूढकथा व ब्राह्मणी भयकथा यांचा वापर करून ओबीसींचा इतिहास नष्ट केला किंवा विकृत केला. ओबीसींच्या ज्ञानाला विद्या म्हणण्याऐवजी 'वार्ता' असे नाव देऊन हीन लेखण्यात आले. त्यांचे सण, उत्सव, परंपरा आणि वाङ्मय यांना अनुल्लेखाने मारण्यात आले. मूळच्या मातृसत्ताक ओबीसी'च्या मेंदूवर पुरुषी अहंकाराचे कलम केले व कारागीर स्त्री-पुरुषांमध्ये भेदाचा विस्तव पेरला.
ओबीसींचा इतिहास समस्त मनुष्यजातीच्या इतिहासाइतकाच प्राचीन आहे. होमोइरेक्टस हा माणसाचा पूर्वज जनावरांच्याच पातळीवर होता. माणसाला हत्यारांच्या निर्मितीचे ज्ञान झाले आणि तो माणूस बनला. अंगठ्याचा वापर, चाकाचा वापर, हत्यारांचा वापर आणि अवजारांचा वापर या साऱ्या गोष्टी ज्यांनी शोधून काढल्या, तेच लोक आज ओबीसी म्हणून विघटित जातींच्या स्वरूपात हीन दर्जाचे जीवन जगत आहेत. आम्ही कुंभार, लोहार, वडार, रंगारी, ओतारी, शिल्पकारी, कोष्टी, साळी, कुणबी, धनगर इत्यादी सारे विश्वव्यापी आहोत. परमेश्वरापेक्षा प्राचीन आहोत. देव आम्हीच निर्मिले. देवळे आम्हीच बांधली, आम्ही जगाचे नागडेपण झाकले. आमच्याशिवाय संस्कृती शक्य नाही, भाषा शक्य नाही आणि वाङ्मयसुद्धा शक्य नाही. आमच्या कर्तृत्वाने ज्ञान-विज्ञान व तंत्रज्ञान निर्माण केले. प्रलयातून, परचक्रातून, दुष्काळातून, गुलामीतून आम्ही चिवटपणे टिकून राहिलो आणि ज्ञान व विज्ञान समृद्ध करत राहिलो. कुंभारांनी गतीविषयक नियम शोधून चाकावरती मडकी घडविली. पायथागोरसच्या जन्माआधी पाच हजार वर्षे अगोदर आम्ही अमेरिकेमध्ये माया संस्कृती वसविली. युरोपमध्ये पोपशाहीच्या विरोधात लढून औद्योगिक क्रांती घडवणारे आम्हीच आहोत. ब्राह्मणवादी विक्रमादित्याचे साम्राज्य अवघ्या ७० वर्षांत नष्ट करून स्वतःचा वेगळा शक निर्माण करणारे शालिवाहन कंभार आम्ही आहोत. आम्हालाच घाबरून, ब्राह्मणांनाही मान्य करावे लागले की, विक्रमादित्याचा संवत ७० वर्षे चालला आणि शालिवाहनाचा शक ७० हजार वर्षे चालेल. आम्ही तयार केलेली एक एक वस्तू जगालाच कलाटणी देते. चाकाने, नांगराने, लेखणीने, धातूंनी, जहाजांनी काय क्रांती घडविली हे सारेच जाणतात. एक नांगराचा फाळ ऋग्वेदाच्या शेकडो ऋचांच्यापेक्षा जास्त उपयोगी आहे. आणि कोष्ट्याने विणलेले एक कापड महाभारताच्या एक लाख श्लोकांपेक्षा मोठे सांस्कतिक कार्य करते.
ब्राह्मणी तत्त्वज्ञानाने ज्ञानालाच बंधन घातले, वाङ्मयनिर्मितीचा शूद्रांचा अधिकार काढून घेतला. एका बाजूला दुष्काळाचे अस्मानी संकट, दुसऱ्या बाजूला आत्म्यालाच नष्ट करणारे वर्णजातिभेदाचे ब्राह्मणी संकट व तिसरीकडे परकी जुलमी राजवटींचे सुलतानी संकट, या तीन वामनपावलांनी ओबीसी जातींना चिरडून दारिद्य, अज्ञान व गुलामीच्या खोल पाताळात ढकलून दिले. यादव साम्राज्याच्या पतनानंतर जहागीरदारांची गुंडशाही माजली, सैनिक मोकाट सुटले आणि उरल्यासुरल्या वित्ताचे व आत्मविश्वाप्साचे ब्राह्मणांनी हरण केले. अशा वेळी संत नामदेवांनी देशभर ज्ञानाचा दिवा लावण्यासाठी आपले आयुष्य झोकून दिले. ‘सा विद्या या विमुक्तये' म्हणजे जी माणसाला स्वातंत्र्य देते, तीच विद्या होय. म्हणून नामदेव म्हणाले, “नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी ।।" सूफी व नाथपंथी यांच्या विचारांशी बहुजनांचे पिढीजात ज्ञान जोडून एका नव्या ज्ञानाधारित समाजाचे स्वप्न नामदेवांन पाहिले. जेव्हा ब्राह्मणांतील पराकोटीचे विद्वानसुद्धा आपल्या पुराणांतून लंगोटीएवढ्या छोट्या छोट्या राज्यांना देश म्हणत होते, तेव्हा नामदेव
ओबीसींच्या एकीची चळवळ उभारण्याचे देशव्यापी स्वप्न पहात होते. नामदेव शिंपी, रोहिदास चांभार, सेना न्हावी, गोरा कुंभार, सावता माळी, चोखा महार, वेश्या कान्होपात्रा, विसोबा खेचर हे सारे ओबीसी समतेच्या सर्वंकष तत्त्वज्ञानाची निर्मिती करतात. वेदांना प्रश्न विचारतात. वर्णजातिभेदांना मूठमाती देतात. यामध्ये जवळजवळ पाच शतके देशाला उपयोगी पडेल असे एकही अक्षर ब्राह्मणी किंवा क्षत्रिय लेखणीतून बाहेर पडले नाही, हे ध्यानात घ्यावे लागेल. वारकरी संप्रदायाशिवाय भेदिक शाहिरी तत्त्वज्ञानाला लोकांपर्यंत पोहोचवण्याचा करत होती. आणि भेदिक शाहिरी किंवा कलगीतुरा संप्रदायातील ९९ टक्के कवी ओबीसी जातींतून आलेले आहेत. कुणबी व कारागीर यांच्या अवजारांशी, वस्तूंशी, कृतींशी व आचारांशी संबधित असलेले शब्द मराठी भाषेतून काढून टाकले तर मागे काय उरेल? साऱ्या समाजजीवनातून साऱ्या पूजा, देवळे, भटपुजारी, धार्मिक ग्रंथ, ढाल-तलवारी आणि ब्राह्मणत्वाचा अभिमान असणारे सारे क्षत्रिय वगळून टाकले, तरी जगाचे काहीच नुकसान होणार नाही, पण ओबीसींना वगळून कोणत्याही देशाच्या Civilisation (संस्कृती) आणि Culture (सभ्यता)चा कसलाच विचार करता येणार नाही. १२ व्या शतकातील 'ज्ञानदेवी' ग्रंथाच्या सगळ्या प्रती शिंप्यांनीच लिहिल्या आहेत. गोरा कुंभार, सावतामाळी यांसारखे सारेच कारागीर संत लिहितात, वाचतात आणि हिशेबही ठेवतात. पण जेव्हा जेव्हा आम्ही | आमचे आत्मे भटब्राह्मणांच्या ग्रंथांकडे आणि व्रत-वैकल्यादि विचारांच्याकडे गहाण टाकतो, ज्ञानाची कास सोडून देतो, विद्रोहाला घाबरतो, तेव्हा तेव्हा आम्ही गुलाम होऊन मागासलेपणाच्या गर्तेत कोसळतो. वारकरी चळवळीचा प्रवास नामदेवाच्या 'ज्ञानदीप लावू जगी' या भूमिकेने सुरू होतो आणि 'शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू' या तुकारामांच्या भूमिकेने त्यावर कळस चढविला जातो,
ओबीसी जातींनी सुसंघटित होऊन ज्ञानाची हत्यारे बनवून निर्वाणीचा लढा उभा केल्याशिवाय केवळ ओबीसींनाच नव्हे, तर देशाच्या प्रगतीलाही तरणोपाय नाही.
ओबीसी किंवा कारागीर जाती बुद्धिमान आणि कर्तबगार असूनही त्यांची प्रचंड प्रमाणात पिछेहाट झालेली दिसते. विद्यापीठ अनुदान आयोग, दिल्लीचे अध्यक्ष प्रा. यशपाल व प्रा. सुखदेव थोरात यांनी उच्चशिक्षण, संशोधन व नोकऱ्यांतील ओबीसींच्या घटत्या प्रमाणाबाबत अनेक वेळा चिंता व्यक्त केलेली आहे. जागतिकीकरणातील नवउदारवादी धोरणानंतर लोकसंख्येत ५२ टक्के असलेल्या ओबीसींच्या नोकरी-व्यवसायातील प्रमाण १० टक्केपेक्षाही खाली घसरले आहे. त्याच वेळेस महानगरातील झोपडपट्ट्यांमध्यचे राहाणाऱ्या ओबीसींचे प्रमाण १९ टक्केवरून ४० टक्क्यांवर गेले आहे. गेल्या २० वर्षांत ओबीसींचे भूमिहीन होण्याचे प्रमाण पटीने वाढले आहे. ओबीसी जातींच्या दुरवस्थेच्या कारणांची शास्त्रीय चिकित्सा केल्याशिवाय यावरील उपाय सापडणार नाही.