पण अशा गझलसदृश रचना संत नामदेवांच्याही पद-अभंग-संग्रहात आढळतात, पण त्याकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. 'महाराष्ट्र सारस्वत' (वि.ल.भावे) आणि 'श्रीनामदेव गाथा'मध्ये या रचना उपलब्ध आहेत. त्यांच्या रचना अशा -
(३) लोखंडाचा विळा । परिसासी लागला ।
मागलीया मोला । मागू नये ।।
वेश्या होती तेचि । पतिव्रता झाली ।
मागील ती बोली । बोलू नये ।
दासिचिया पुत्रा । राजपद आले ।
उपमा मागील । देऊ नये ।।
गावरस होता । गगेशी मिळाला ।
वाचुनी गंगाजळा । मानू नये ।।
विष्णुदास नामा । विठ्ठल मीनला ।
सिंपी सिंपी त्याला । म्हणू नये ।।
(४) कुच्शल भूमीवरी उगवली तुलसी ।
अपवित्र तियेसी म्हणो नये ।।
काकविष्टेमाजी जन्मे तो पिंपळ ।
तया अमंगळ म्हणो नये ।।
दासीचिया पुत्रा राज्यपद आले
उपमा मागील देऊ नये ।।
'नामा' म्हणे तैसा जातिचा मी शिंपी ।
उपमा जातीची देऊ नये ।।
'श्री नामदेव गाथा' या ग्रंथात एकूण २३३७ अभंग साकी व पदे संग्रहित केली गेली आहेत. त्यात फक्त उपरोक्त दोनच अभंग वा पदे यांमध्ये 'यमक' (काफिया) व 'अंत्ययमक' (रदीफ) म्हणजेच 'मागू नये, बोलू नये, देऊ नये, मानू नये, म्हणू नये' अशी आलेली आहेत. 'मतल्या' (पहिल्या दोन ओळी)मध्ये मात्र यमक-अंत्ययमक दोन्ही ओळी समान नाहीत. 'नामा हे टोपणनाव आले आहे.' अशा रचना दकनी गझलमध्ये दिसून येतात. विशेष म्हणजे संत नामदेवांच्या उपरोक्त रचनेत 'विला, लागला, मोला' अशी अंतर्गत यमकेही आढळतात व उर्दूमध्ये अशा रचनांमध्ये 'हुस्न' (सौंदर्य) आहे असे मानतात. त्या दृष्टीने नामदेवांचा प्रभाव दकनी गझलवर आहे हे सिद्ध होते.
उदाहरणादाखल हे शेर पहा -
"खिखतव मने सजन के मैं मोम की बती हूँ।
एक पोवपर खरी हूँ जलने परत पाती हूँ ।।
शै के मिलन की माती, हर नस जलन को आती ।
सब कद खरा जलाती, पन आह मैं कती हूँ।"
अमीर खुसरो त्या काळचे प्रसिद्ध फारसी, हिंदीचे महाकवी म्हणून प्रसिद्ध होते, त्यांचा प्रभाव संत नामदेवावर शक्य आहे. म्हणूनच २३३७ अभंग-पदांमध्ये उपरोक्त दोनच रचना गझल-रचना तंत्राच्या जवळ आहेत. अशा रचना संत एकनाथ - संत सोहिरोबा यांच्याही आढळतात. वास्तविक हा साहित्य संस्कृतीचा संगमाचा काळ आहे. पण सातत्याने त्या काळात फक्त हिंदू-मुस्लीम संघर्ष होता हे जात्यंध इतिहासकारांनी पुन्हा पुनः रंगविले आहे. त्यामुळे संस्कृतिसंगमाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले आहे.
डॉ. माधवराव पटवर्धन म्हणतात, 'मराठीचे अभंग, ओवी, घनाक्षरी इत्यादी रचना छान्दस् आहेत. संस्कृत तथा प्राकृतमध्येही, अशा रचना ज्या लगखभेदातील आहेत, दिसत नाहीत पण मराठीत मात्र प्रचलित आहे.' छान्दस् रचना गझलेप्रमाणेच उच्चारानुगामी आहेत. तेथे लघु-गुरुचा प्रश्न नाही, ओवीची रचना अनियमित वाटते, “ओवी हा गेय प्रकार होता."
गझल हा गेय प्रकार आहे. ती कविता नव्हे. दकनी गझलमधून उर्दू गझलचा जन्म झाला आहे व त्या उर्दूची जननी महाराष्ट्र भूमी आहे. उर्दू गझलेचा पितामह वाली दकनी व त्यापूर्वीचे लुत्फी, बिदरी, फिरोज बिदरी, इब्ने-निशाती, गवासी, कुली, कुतुबशहा हे गझलकार याच महाराष्ट्राच्या आसपासचे होते. म्हणूनच हे साहित्य संगमाचे प्रारंभिक रूप संत नामदेव होते, अमीर खुसरो होते याची दखल घेऊन मराठी साहित्य परंपरेचा विचार होणे गरजेचे आहे असे वाटते. जर अमृतराय व मोरोपंतांच्या रचना गझल म्हणून मिरवतात, तर संत नामदेवांची रचना गझल का ठरू नये? पण नामदेव शिंपी होते ना! गझलचा प्रणेता कसा ठरेल ?
(स्रोत - प्रा. डॉ. अजिज नदाफ यांनी लिहिलेला लेख, दुसऱ्या राज्यस्तरीय सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलनाची स्मरणिका-सत्यशोधन, ९-१० फेब्रुवारी २०१३)