आता निरोपाची वेळ आलेली आहे. आम्ही बहुजन-ओबीसी मुळात शांतिवादी आहोत. शांतरसाचा जनकही आमचा बहुजन बुद्ध आहे.
रुद्रटानंतर अभिनव गुप्त यांनी विवेचिलेला (उचललेला) शांतरस हा शांतिदूत तथागताच्या धम्मातून घेतला आहे. रुद्रटाचे शांतरसाबद्दलचे खालील म्हणणे आणि सम्यक समाधीतील धम्मशांती यात साम्य दिसून येते.
'सम्यकज्ञान प्रकृतिः शान्तो विगतेच्छेनायको भवति ।
सम्यगज्ञान विषय तमसो रागस्य चापगमात'
पुढे अभिनवगुप्ताने याच शांतरसाचा आविष्कर्ता होऊन अष्टरसविकारांपासून निवृत्त झाल्यावर प्राप्त होणारी आनंदाची परमोच्च स्थिती म्हणजे शांतरसाची अवस्था प्रतिपादली आहे, मला असे वाटते की रुद्रट, अभिनवगुप्तांनी ही प्रेरणा तथागताच्या धम्मातून घेतली असावी.
जगद्गुरू संत तुकोबांचे परमशिष्य संत संताजी जगनाडे महाराज यांनी जीवाचे रान करून तुकोबांची महान गाथा वाचवली. इंद्रायणीत अभंग वह्या बुडविल्यावर संत जगनाडे महाराजांना तुकोबारायांचा आकांत पाहवेना! त्यांनी रात्रंदिवस एक करून उपलब्ध लिखित व मौखिक अभंग एकत्र लिहन ती गाथा अन्नपाणी सोडून देह येथे इंद्रायणीकाठी बसलेल्या तुकोबारायांच्या हाती दिली आणि म्हणाले, “बुवा, डोळे उघडा. बघा इंद्रायणीने तुमची । गाथा परत केली.” अशी गाथा वर आली बाबांनो.
नंतरही संत संताजी जगनाडे महाराजांनी अनेक अडचणींशी मक करीत हे मराठीचं अक्षरसत्त्व वाचवलं ही बाब साधी नाही. एका आमच्यावर या तुकया मित्राचे हे मोठे ऋण आहे. एवढं करूनही संताजींचा नीट सन्मान शासनाने तर केला नाहीच, आम्हीही इतिहास ना होईल अशी नोंद घेतली नाही.'
रसिकहो, हा संवाद थांबवितांना संत तुकाराम महाराजांचे पुन्हा एकटा स्मरण करतो. कारण नागर-संस्कृतीच्या सोवळ्यात वेदांची घोकणी करणाऱ्या धर्मदांडग्यांनी इंद्रायणीच्या डोहात त्यांच्या सर्व गाथा बुडवूनही तुकाराम जनसामान्यांच्या अंतरंगात तरंगला आणि 'वेदांचा तो मंत्र आम्हासचि ठावो, बाकीचे ते भारवाहो' असे ठणकावून सांगणाऱ्या आणि वेदांची हमाली करणाऱ्यांचा समाचार घेत शब्दांची पूजा बांधता झाला.
'आम्हा घरी धन शब्दांचीच रत्न ।
शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू ।
शब्द अमुच्या जीवाचे जीवन । ।
शब्द वाटुधन जनलोका ।
तुका म्हणे पाहा शब्दचि हा देव ।
शब्देची गौरव पूजा करू ।'
या तुकोबारायांच्या शब्दगौरवासह माझ्या या वक्ताश्रोता संवादातील सर्व शब्दांना श्रोत्यांच्या चरणी अर्पण करून सर्वांची अनुमती घेतो
जय ओबीसी !!!
(स्रोत- महाकवी सुधाकर गायधनी यांचे अध्यक्षीय भाषण, पहिलाओबीसी साहित्य संमेलन, पुणे, ९ व १० सप्टेंबर २००६)