Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

आंदोलन

     श्रवणबेळगोळ ! कर्नाटकातील एक मोठे तीर्थक्षेत्र. जिनेशला तिथं जाण्याचा योग आला. त्या तीर्थक्षेत्री येणारे वक्कलिंग, कुणबी त्याला दिसले. जैन गंगदिकार, जैन पशुपालक अहिर त्याला दिसले, जैन चतुर्थ जातीचे कुणबी शेतकरी त्याला दिसले. गुजराथमधून येणारे जैन लेवा कुणबी, जैन पाटीदार, जैन कुणबी, जैन (बांगडीविके) त्याला दिसले. याशिवाय अनेक जातीजमातींची माणसं मोठ्या श्रद्धेने जैन तीर्थक्षेत्री येताना दिसत होती.  त्यांची संख्या प्रचंड होती... धोतर, पगडी तर कुठे साधा लंगोट-कांबळं अशा वेषातील ही बहुजन जैन मंडळी होती. असेच एकदा राजस्थानात महावीरजी या तीर्थक्षेत्री तो गेला होता. मोठ्या श्रद्धेने त्याने भगवान महावीरांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. त्यावेळी त्याने पाहिले-मोठ्या श्रद्धेने आदिवासी मीना जातीचे बांधव, मेंढपाळ आहिर जातीचे बांधव आणि जाट किसानसुद्धा दर्शनाला येत होते...

     ... जैन तीर्थक्षेत्र केशरियाजी हे तर खास आदिवासी भिल्लांचे तीर्थक्षेत्र. आदिवासी भिल्ल मोठ्या संख्येने तेथे येतात आणि जैन तीर्थंकर ऋषभनाथ यांचे दर्शन घेतात. ऋषभनाथजी हेच त्यांचे आराध्यदैवत. त्यास ते काळाबाबा म्हणतात,

Jain Other Backward Class - obc      खरंच जैन परंपरा विविध जाती आणि जमातींमध्ये कशी विद्यमान आहे... याचे जिनेशला कोडे पडायचे आणि मग त्याने जैन समाजाचा शास्त्रशुद्ध अभ्यास सुरू केला. विविध जिल्हा गॅझेटिअर्स, जातीजमातींची माहिती देणारे विविध ग्रंथ, सेन्सेस रिपोर्टस् याचा अभ्यास त्याने सुरू केला... त्याला जाणवले, जैन हा एक धर्म आहे... विचारधारा आहे... जीवनपद्धती आहे. एकच गट, एकच जात किंवा समूह नाही. साऱ्या देशभर जैन म्हणविणाऱ्या अनेक जाती आहेत, जमाती आहेत. त्या मूलनिवासी आहेत. त्यांची भाषा, त्यांचे वेश, लग्नाच्या आणि इतर पद्धती, रीतिरिवाज हे प्रत्येक प्रदेशानुसार वेगवेगळे आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रात मराठी भाषिक जैन आहेत. हे मराठी मातृभाषिक आहेत, त्यांची आडनावे मराठी आहेत. त्यांचे रीतिरिवाज, लग्नपद्धती मराठी आहेत, सण मराठी आहेत. या मंडळींत पाटील, चौगुले, देसाई, वाडेकर, रणदिवे, खरात अशी आडनावे आहेत.

     जिनेशचा एक मित्र त्याला म्हणाला होता, “अरे, तुम्ही जैन तर व्यापारी. मग तुमच्यात वेगवेगळे कारागीर, शेतकरी, कष्टकरी जाती कशा ?" जिनेशने त्याला समजावून दिले, “जैन समाज देशव्यापी आहे. सामाजिकदृष्ट्या त्यांचे चार भाग ढोबळमानाने करता येतील."

१) अभिजन वर्ग - जैन परंपरा मानणाऱ्या काही उच्च जातींच्या लोकांचा यात समावेश होतो. हे लोक मोठे मोठे धार्मिक उत्सव करतात. त्यासाठी खूप खर्च करतात. सर्वांची समजूत त्यामुळे अशी होते की, जैन समाज म्हणजे हेच धनिक, जैन समाज हा धनिकांचा, फक्त पैसेवाल्यांचा आहे. 

२) इतर मागास वर्ग (ओबीसी) - जैन म्हणविणाऱ्या, परंपरागत व्यवसायात असणाऱ्या जाती यात येतात. उदा. जैन कासार, जैन शिंपी, जैन कुणबी, जैन साळी, जैन कलार, जैन भावसार, जैन रंगारी, जैन छिप्पी इ. 

३) धर्मांतरित जैन - काही दलित जातींनी जैन परंपरेचा अंगीकार केला आहे. मध्यप्रदेशात काही बलाई - दलितांनी आणि कसाई मंडळींनी जैन परंपरा स्वीकारली आहे. बलाईनी धर्मपाल हे नाव धारण केले आहे. तर कसाई मंडळींनी वीरवाल हे नाव धारण केले आहे. 

४) आदिवासीमध्ये जैन - काही आदिवासींमध्येसुद्धा जैन परंपरा आहे. राजस्थान मध्ये-भिल्ल मीना या आदिवासींमध्ये जैन परंपरा आढळते. कर्नाटकात कुरुम्ब आदिवासींमध्ये जैन परंपरा आढळते.

     मित्रांना, लोकांना जिनेश समजावून सांगत होता. सांगत होता, "बहुजन जैन समाज हा या देशातील वास्तव आहे. त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणावर उपाय म्हणून, त्यांच्या प्रगतीसाठी आरक्षण हवे.'

     जिनेश नुसता बोलून थांबला नाही. संबंधित साहित्य, सरकारचे जी. आर. त्याने मिळवले. जैन ओबीसींच्यासाठी खटपटी केल्या. सरकारला निवेदने दिली. त्याचा पाठपुरावा केला. आंदोलने केली.  

     सभांतून, शिबिरांतून, समारंभातून मिळालेल्या संधीचा तो लोकांच्या प्रबोधनासाठी वापर करी. व्यक्तिगत पातळीवर लहान-मोठ्या सभांतून तो हे सारे लोकांना पटवून देई. समजावून सांगी. ओबीसींचे कार्यक्रम, इतर सामाजिक कार्यक्रम यांत तो हिरिरीने भाग घेऊ लागला. जैन ओबीसीची दुःखं मांडू लागला. आपल्या विचारांच्या प्रचारासाठी तो एक मासिक चालवू लागला. साध्या, सरळ, सोप्या भाषेत तो मांडणी करू लागला. ओबीसींच्या इतर प्रश्नांनांही तो मासिकांतून आवाज उठवू लागला. विविध लहान-मोठ्या बैठकांमधून, अधिवेशनांमधून तो मासिकांचे अंक मोफत वितरित करू लागला. जैन ओबीसीतील युवक, विद्यार्थी, महिला, बेरोजगार इ. साठीही तो पोटतिडकीने, कळकळीने काम करू लागला.

     कुणीच नव्हते त्याच्या साथीला. एकटाच तो चालत राहिला. सोबत होती जिद्द आणि चिकाटी. हळूहळू त्याच्या प्रयत्नांना यश मिळू लागले. सरकारदरबारी जैन ओबीसीची नोंद होऊ लागली. जिनेशच्या कार्याची सारेजण वाहवा करू लागले. आपल्या कामाचे चीज होते याचे समाधान त्याला मिळू लागले.

     या प्रवासात त्याला अनेक अडचणी आल्या; टीका, उपहास, निंदा ऐकाव्या लागल्या.

     ... पाठीवर थाप पडल्याने जिनेश भानावर आला. 'सत्काराला तुम्ही उत्तर द्यायचंय.' संयोजक त्याला सांगत होते.

     डोळ्यांवरचा चष्मा काढून जिनेशने रुमालाने डोळे टिपले, आणि तो भाषणासाठी माईकसमोर उभा राहीला.


(स्रोत- प्रा. प्रदीप फलटणे यांची कथा, ओबीसींच्या जीवनकथा, २००१)



Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209