ओबीसींचे प्रश्न आतापर्यंत केवळ ओबीसींनीच मांडले, असे नाही तर, ओबीसींच्या जीवनप्रश्नांवर ओबीसी नसलेल्या अनेकांनी सातत्याने प्रकाश टाकलाय. ओबीसींच्या प्रश्नांच्या बाजूने उभे राहणे, बहिष्कृत समूहाच्या प्रश्नांच्या बाजूने उभे राहणे, हा केवळ बहिष्कृत जाती समूहाचा लढा नसतो तर एकूण परिवर्तनाचा लढा असतो. दलित मुक्ततेचा लढा हा परिवर्तनाचा लढा होतो, म्हणून वर्णाने उच्च समजली जाणारी बुद्धिजीवी मंडळी लढ्याच्या बाजूने मोठ्या प्रमाणात उभी राहिली. ओबीसींचा लढा हा जसा परिवर्तनाचा लढा आहे तसाच तो ओबीसींचा आत्मभान शोधण्याचाही प्रवास आहे. पुरोगामी विचार करणाऱ्या सर्वांचे सहकार्य, सहयोग या लढ्याला अपेक्षित आहे. एवढे मात्र निश्चितच की, प्रतिगामी विचार करणाऱ्यांविरुद्धचा हा संघर्ष आहे आणि तो शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. कदाचित याच कारणामुळे आज बीडला होणाऱ्या सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलनाला उभ्या महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. देशातल्या बुद्धिजीवींकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिक्रियाच सांगतात की, हे साहित्य संमेलन काळाचीच गरज आहे.
विशिष्ट जाती समूहांच्या साहित्यिक उपक्रमांना जातीय भावनेचे एकत्रीकरण या दृष्टीने पाहण्याचा विचार आता कालबाह्य ठरला आहे. महाराष्ट्रात जैन साहित्य संमेलन, सकल मराठा साहित्य संमेलन, मराठीमुस्लीम साहित्य संमेलन, आदिवासी, गुराखी, ख्रिस्ती-मराठी साहित्य संमेलन यांसारखे विविध साहित्य संमेलने सुरू झाली आहेत. या सर्व संमेलनांचे स्वागत व्हायलाच हवे. जर एखादा समूह आपले जीवनप्रश्न विचारवंत, बुद्धिजीवी, साहित्यिकांच्या माध्यमातून विचारपीठावर मांडत असेल तर त्याचे केवळ अभिनंदन नव्हे, तर अनुकरणही व्हायला हवे. कारण आपले प्रश्न मांडण्याचा व त्यावर सर्वव्यापी मंथन घडवून आणण्याचा हा सर्वोत्कृष्ट व संविधानिक मार्ग आहे. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या विचारपीठावर गुराखी, आदिवासी, ओबीसी, दलित, ख्रिस्ती, मराठी, मुस्लीम यांसारख्या समूहांच्या जीवनप्रश्नांना मांडण्याची संधी फारशी नसते. मुळातच अशा संमेलनाचा हेतू हा साहित्यिकांच्या व एकूणच समाजजीवनाच्या ठळक प्रश्नांवर चर्चा करणे हा असतो. मग प्रश्न उरतो तो उपेक्षित घटकांच्या अनुल्लेखित प्रश्नांचा. असे प्रश्न समोर यावेत, यावर समाजातल्या सर्व परिवर्तनवाद्यांनी एकत्रित येऊन मंथन करावे व काहीएक निष्कर्ष हाती लागावेत, ही प्रेरणा वर उल्लेखित विविध साहित्य संमेलनांमागची आहे. सत्यशोधक साहित्य संमेलनाचीही हीच प्रेरणा आहे. त्यामुळे हे संमेलन एका विशिष्ट जाती-समूहाच्या नव्हे, तर ५२ टक्के उपेक्षितांच्या परिवर्तनाच्या लढ्याची नांदी आहे. या नांदीचे शिल्पकार महाराष्ट्रातील विद्वान आहेत. सत्यशोधक ओबीसी परिषद राज्यातील सर्व समाजांतील परिवर्तनवादी विचारवंत, कार्यकर्त्यांनी या लढ्यात, संमेलनात सक्रिय सहभाग देण्याचे विनम्र आवाहन करते. सर्वांच्या सक्रियतेशिवाय ओबीसीवरील अंधाराची जळमटं दूर होणार नाही.