- सुहास नाईक
वैषाख शु.३.अक्षय्य तृतीया. सन १७४९ . वेळ सुर्योदयानंतरची. मुहूर्त गोरज. स्थळ पुण्यातील आंबील ओढा परिसर. सर्वत्र मंत्रोच्चाराचे आवाज. यज्ञ मांडलेला. पौरोहित्य करणाऱ्या ब्राम्हणांची लगबग. यजमानांना भिती, यज्ञातील आहुतीच्या पूर्तततेची. तेवढ्यात गारद्याने खांद्यावर लादून आणलेला, नुकताच मृत्यू झालेला नाथा मांग समोर ठेवला. मंत्रोच्चाराचे आवाज वाढले. टाळ्या पिटल्या गेल्या. पंचगव्य ( गाईचे दुध,दही, तुप, शेण आणि गोमुत्र) यज्ञाला अपर्ण केले गेले.पुष्पम् समर्पयामि - फुले अर्पण केली गेली, जलम् समर्पयामि - पाणी अर्पण केले गेले, शेवटी कुल्वम् समर्पयामीचा घोष झाला आणि नाथा मांगाचे रक्त यज्ञात समर्पित केले गेले. ज्वालाग्नी तीव्र झाला. दक्षिणा झाल्या, ब्राह्मण भोजन झाले. पेशवे आनंदले, पुरोहित उल्हासित झाले. नाथा मांगाला जिवंत मारला.
सन १७४९ ला नानासाहेब पेशव्याने कात्रजच्या तलावातून थेट शनिवार वाड्यात जमिनीअंतर्गत भुयारी मार्गातून पाणी आणण्याची योजना आखली होती. जमिनीखाली ६ फूट उंच आणि २.५ फूट रुंद चुना आणि विटा यांचा भुयारी मार्ग. या भुयारी मार्गामधून प्रवाहीत पाणी दगडी आणि मातीच्या खापरी नळातून पाणी देण्याची ही योजना होती. आंबील ओढ्यापर्यंत याच्या बांधकामाचे काम व्यवस्थित होते. मात्र आंबील ओढ्यावर काम पुर्णत्वास जात नव्हते. 'तीन महिने शर्थीचे प्रयत्न केले पण व्यर्थ'. शेवटी ठरले यज्ञ करून मांग जातीतील पुरुष बळी द्यायचा. पंचांगाच्या कोष्टकावरुन 'न' या अक्षराने सुरुवात होणारा मांग बळी देण्यासाठी योग्य ठरेल, असे वचन पंचांगकाराने दिलेले. अशातच समोर दिसला नाथा मांग. धाडसी, बलदंड शरीरयष्टीचा, निधड्या छातीचा, हत्तीचं बळ बाहूत पेलणारा.चौफुल्याजवळ रहाणारा नाथा हा पेशव्यांच्या शिकारखाण्यावर मस्तवाल जंगली जनावरांना काबू आणण्याच्या कामावर होता. जेव्हा त्याला सांगितले गेले की, 'तुला आम्ही बळी देणार आहोत' तेव्हा त्याने प्रतिकार केला. झटपट झाली. संघर्ष झाला. तो चौघांना भारी पडला. तरीही, तो बळी जाण्यास तयार झाला नाही. शेवटी त्याला फसवून, लबाडीने गेंड्याच्या पिंजर्यात ढकलून दिले. यज्ञात प्रतिकात्मक स्वरुपात त्याचे रक्त समर्पित केले गेले. आणि यज्ञ संपन्न झाला.
प्राचीन काळी बांधकाम पुर्णत्वास जाण्यासाठी तेथे मांग जातीमधील व्यक्तीस तेलमिश्रीत शेंदूर पाजून, वाजत गाजत बांधकामामध्ये गाडले जाते असे. अशाप्रकारचा मृत्यू आलेल्या मांगवीरास जाणिवपूर्वक दैवत म्हणून प्रसिध्दीस आणले जात असे. आंबील ओढा इथे कपटाने मारलेला नाथा मांग असाच एक मांगवीर आहे. अनिच्छेने मारलेला. पुढे भयग्रस्ततेतून नाथाचे कुटूंब निर्वासित झाले. मात्र नाथाचे स्मारक आंबील ओढ्याजवळ लोकस्मृतीनुसार जीवंत राहिले.
त्याच्या जातीबांधवानी त्याच्या स्मरणार्थ दगडी चौथरा बांधला होता. आता मात्र येथे त्याचे छोटेसे मंदिर बाधलेले असून. गेल्या दोनशे वर्षात या वीरपुरुषाचे स्मृती ठिकाण हे लोकप्रिय झालेले आहे. नवसाला पावणारा पेशेवेकालीन मांगीरबाबा म्हणून हे स्थळ प्रसिद्धीस आलेले आहे. यामधील भावनाशील श्रध्दाळू धार्मिकता वजा करुन नाथाजीचे स्मरण करणे औचित्यपूर्ण ठरते. नाथाचा २७२ वा स्मृतीदिन नुकताच साजरा झाला. या वीराला स्मृतीदिनानिमित्त अभिवादन.
महाराष्ट्रात 'मांगवीर', 'मांगीर' किंवा 'मांगीरबाबा' या नावाची अनेक लोकदैवतं प्रसिध्द आहेत. सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांनी 'गुलामगिरी' या ग्रंथात परशुरामाच्या एकविस स्वार्यांचा उल्लेख करुन हि प्रथा मांगांवर सूड उगवण्याच्या हेतूने सुरू केल्याचे सांगितले आहे. 'मांगास बहुत पीडिले, सजिव दडविले, गढीच्या पायात || ' या अंखडातून महात्मा फुलेनी मांगांच्या दयनीय अवस्थेचे चित्रण केलेले आहे.
महात्मा फुलेंची विद्यार्थ्यांनी मुक्ता साळवेने 'धर्म नसलेली माणसे' हा धर्माची चिकित्सा करणारा निंबध लिहिला. या निबंधात मुक्ताने या 'मांगीर' प्रथेबाबत सडेतोड भाष्य केले. तिच्या मते, 'मोठमोठ्या इमारती बांधून हे लोक बसले व त्या इमारतीच्या पायात आम्हास तेल-शेंदूर पाजून पुरण्याचा व आमचा 'निर्वंश' करण्याचा उपक्रम चालविला होता. आम्हा मनुष्यास ब्राह्मण लोकांनी गाई म्हशीपेक्षा नीच मानले. सांगते ऐका , ज्यावेळी बाजीरावाचे राज्य होते.' विशेष म्हणजे मुक्ता ही मातंग समाजातीलच. महात्मा फुलेंचे सहकारी लहूजी साळवे यांची पुतणी. मुक्ताने लिहिलेला निबंध एकोणिसाव्या शतकात प्रचंड गाजला ,वादळी ठरला. तर, कॉ. शरद पाटील यांनी 'वीर' या शब्दाचा अर्थ 'बंधू' असा होत असल्याचे सांगून, 'पुरुरवा कुल गणबंधूच्या हत्येसाठी जो वैर हत्य हा शब्द आला आहे, तो वीर पासून निघाला आहे त्याचा मूळ अर्थ बंधू असा आहे. कोणालाही कल्पना नसल्यामुळे कोणी खोलात गेले नाही. वीराची वैरानंतर दार्शनिक परिणीती झाली. स्वगणीयाचा वा परगणियाचा गणकर्मासाठी बळी देणे, पुरुषमेधात अनेक नरबळी देणे हा गणसमाजात गुन्हा नव्हता हे उर्वशीने पुरुव्याचा बळी दिला, शुन:शेपाचा वरुणाला बळी दिला जाणार होता' असे देखील त्यांनी सांगितले आहे.
'बळी' देणे हि प्राचीन काळापासून माणसाची यातुश्रध्दाविषय मानसिक परंपरा आहे. भारतात वैदिकपूर्व काळापासून यातूविधीत बळी दिले जात. गणसमाजात बळी देणे हा एक यातूविधी होता. अतिमानवी शक्तीला खुश करण्यासाठी असे बळी सर्रासपणे दिले जात. वैदिकांना या परंपरेचे नीटसे आकलन न झाल्यामूळे बळीप्रथेचे वैदिकांकडून गौरवीकरण झाले. व त्यांनी आपल्या धार्मिक संकल्पनेत याला अवाजवी महत्त्व दिले. आणि मागंबळी देण्याची प्रथा ताज्य ठेवली. मध्ययुगात जिथे ब्राह्मण राज्यकर्ते किंवा सत्ताधीश होते तिथे धार्मिक अधिष्ठानातून बळी प्रथेचे पुनरुज्जीवन केले गेले.
मांगीवीराचे अनेक प्रकार आहेत. कधी फसवणूक करुन मारलेला, कधी युध्दात हुतात्मा झालेला, तर कधी गावच्या रक्षणासाठी बलिदान दिलेला मांगवीर. बलीदान आणि युद्धप्रकारातील मांगवीरांची संख्या ही यादव, चालुक्य आणि राष्ट्रकूट काळात अधिक आहे. महाराष्ट्रातील अनेक 'वीरगळ' हे या प्रकारातील आहेत. हे 'वीरगळ' पशुसंरक्षणार्थ मरण पावलेल्या शूरवीरांच्या स्मरणार्थ उभारले दगड म्हणून गावोगावी स्थानापन्न झालेले आहेत. याधील बरेच वीर हे जातीने मांग असल्याचे सिद्ध झाले आहे. ' वीरगळांच्या संभांरात गोरक्षकांचे जे वीरगळ आहेत, ते प्राधान्याने 'शूद्र' समजल्या गेलेल्या वर्गातल्या वीरांचे आहेत. कारण, 'शुश्रूषणं द्विजगवा' गोब्राह्मणांचे सेवन हे 'शूद्रप्रकृती'चे एक महत्त्वाचे अंग पारंपरिक समाजव्यवस्थेत मानले गेले होते.' असे रा. चिं. ढेरे सप्रमाण सिद्ध केले आहे.
मातृसत्ताक समाजामध्ये मातृदेवतेचा लैंगिक तृप्तीचा सहकारी म्हणून वीर ओळखला जाई. यामध्ये हे लक्षात घेतले पाहिजे की, प्रजनक पुरुषाला नरमेधामध्ये मारुन मातृसत्ताक राज्यव्यवस्था आपल्या वारसांची निर्मिती करत असे. असभ्य म्हणी आणि शिव्यांची निर्मिती प्रक्रिया पाहिल्यास प्रजनक विषयीच्या प्रथा स्पष्ट होतात. वि.का. राजवाडे यांनी यासंदर्भात केलेले टिपण महत्वाचे आहे. प्रजननक्षम पुरुषावरुन शिवी देणे हि भाषिक अर्थाने या इतिहासाची महत्वपूर्ण नोंद ठरते आहे. ओरिसामधील गुमसूर मलिहा जातींमध्ये असा नरबळी देण्याचा प्रघात ब्रिटीशांनी बंदी घालेपर्यत सुरु होता. हा बळी देण्यामागे एक निश्चित धारणा होती की, प्रजनन करणार्या पुरुष बळी दिला गेल्याने त्याचे वर्चस्व नष्ट होईल. तर, धार्मिक प्रकारात झालेले मांगवीर पेशेवकाळात अधिक आहेत. केवळ पुणे शहराचा विचार करता पेशवेकाळात शनिवारवाड्यासह सत्तरहून अधिक जण सदाशिवपेठ, नारायण पेठ आणि शनिवारपेठ भागात विविध वाड्यांमध्ये जिवंत गाडले गेले आहेत. मांगीर झाले आहेत.
तेव्हा हा प्रश्न निर्माण होतो की, जातीने मांग असणारा तरुणच का बळी दिला जातो ? उत्तर स्पष्ट आहे. एकतर तो व्यवस्थेत गणसमाजाचा प्रतिनिधी समजला गेला आहे. हि त्याच्या प्राचीनतेच्या अस्तित्वाची महत्वाची खुण आहे. आणि त्यातच तो अत्यंत प्रजनक समजला गेला आहे. त्यामुळे गणसमाजानंतर आर्यांची अशी भावना झाली की, मांगाला बळी दिल्यास देव प्रसन्न होतात. व आपले इच्छीत कार्य सिद्धीस जाते. याच प्रक्रियेमधून पुढे मांग हि जात शुभंकरोती समजली गेली यामधील हि लक्षवेधी ऐतिहासिकता समजून घेतली पाहिजे. शुभंकर जात म्हणून आलेली विस्थापना मातंग समाज कित्येक वर्षे सहन करत आहे.
मांगवीरांच्या मूळ स्वरुपाचे आकलन करुन मातंग समाजातील चळवळी मांगवीरांचा उपयोग परिवर्तनासाठी करण्याचा प्रयत्न करत आहेत हि सकारात्मक बाब आहे. ऐतिहासिक दृष्टिकोनातून विश्लेषण केल्यानंतर निष्कर्ष निघतो की, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दिसणारी मांगविरांची ठाणी ही दगडचौथर्यांचे भग्नावशेष नसून धैर्याने मृत्यूला कवटाळलेल्या मातंगविरांची स्मारके आहेत. या स्मारकाचे नीट आकलन करुन, भावनिक न होता व्यावहारिक पातळीवर त्यांची समकालीन काळातील उपयोगीता डोळसपणे तपासली पाहिजे. पुरातत्वीय, पुराभिलेखीय पुराव्यांसहित लोकमानसातील मौखिक परंपरा एकत्रीत करुन ऐतिहासिक वास्तव स्वीकारले पाहिजे. अन्यथा क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या असणार्या मांगवीर या संकल्पनेचे, प्रथा परंपरेचे आणि प्रतिकांचे भांडवल करुन शत्रु मातंगाना गुलाम बनवेल. हा 'कावा' ओळखून सावध होणे हिच या मांग वीरांना खरी श्रध्दांजली ठरेल.
- सुहास नाईक, दि. 18 मे 2021, 9765176869