मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी आधी दंड थोपटल्यानंतर आता प्रमुख ओबीसी नेत्यांनी राजकीय जोडे बाजूला ठेवत एकत्र येण्याची भूमिका घेतली आहे. जालन्यातील अंबड येथे १७ नोव्हेंबरला ओबीसी, भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभा बोलावण्यात आली असून भुजबळांसह पंकजा मुंडे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, जयदत्त क्षीरसागर, प्रकाश शेंडगे, आमदार महादेव जानकर, गोपीचंद पडळकर यांच्यासह मुस्लिम ओबीसी संघटनेचे शब्बीर अन्सारी यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे
मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर स्वतंत्र द्यावे, अशीही मागणी त्यांनी केली होती. भुजबळ यांच्या मागणीनंतर मराठा समाजातील नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. दुसरीकडे, ओबीसी नेतेही संघटित होऊ लागले असून सकल ओबीसी, भटके विमुक्त जाती, एसबीसी आणि अल्पसंख्याक नेत्यांना एकत्र जमवले जाणार आहे.
ओबीसी समाजाचा स्पष्ट विरोध दर्शवण्याबरोबरच ताकद दाखवण्यासाठी शंभर एकरवर सभा घेतली जाणार आहे. भुजबळांनी मुंडे, पडळकर, जानकर, वडेट्टीवार, जयदत्त क्षीरसागर, प्रकाश शेंडगे या पहिल्या फळीतील ओबीसी नेत्यांना एकत्र आणण्याची रणनीती आखल्यामुळे भविष्यात संघर्ष तीव्र होणार आहे. तसेच ही सभा झाल्यानंतर आगामी रणनीतीदेखील आखण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश करू नये, बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, मराठा समाजाला देण्यात आलेली खोटी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करावी, खोटी बिंदुनामावली तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, ७ सप्टेंबर २०२३ रोजी कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाने काढलेला जी. आर. ताबडतोब रद्द करावा यासह विविध मागण्या करण्यात येणार आहेत.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission