- सुनील चौधरी कल्याण.
लेखाच्या सुरुवातीसच स्पष्ट करतो की, आम्ही कुठल्याही जातीजमाती किंवा समाजाच्या विरोधात नाहीत परंतु जो समाज किंवा ज्या जाती आम्हा ओबीसींचा विचार करत नाहीत त्यांच्या विरोधात आम्ही नक्कीच जाऊ..!
१९३१ च्या सेंन्ससनुसार केंद्र सरकारने ५२% ओबीसी असल्याचे घोषित केले होते. आज आपण ६५% पेक्षा जास्त आहोत त्यावेळी २२५-२३५ जाती होत्या. आज ओबीसींच्या मध्ये ४०० जाती आहेत त्यात आणखी मराठा कुणबी कुणबी मराठ्यांना समावेश करण्याचा घाट घातला जात आहे म्हणजे ओबीसींची संख्या ही आज ६५% पेक्षा निश्चितच जास्त आहे ३२% मराठ्यांसाठी १६% आरक्षण सरकारने प्रस्तावित केले होते. हायकोर्टाने ते १३% इतके लागूही केले मग ६५% ओबीसी झोपलेला का..? ओबीसी जागा होणार नाही का? त्याची ६५% पेक्षा जास्त असलेली ताकद तो दाखवू शकणार नाही का? त्यांचा एकच माणूस संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देश हलवून टाकू शकतो मग तुम्ही ६५% असून बघ्याचीच भूमिका घ्याल का? इतकी उदासीनता ओबीसी मध्ये कशी आली काही समजत नाही.
जे काही तुटपूंजे असलेले आपले राजकीय नेतृत्व आहेत ते सुद्धा आज विशिष्ट राज्यकर्त्यांचे मांडलीक असल्या सारखेच वागत असतात. जेव्हा सुप्रीम कोर्टाने २७% आरक्षण बंद केले त्यावेळेस एकही ओबीसींचा राजकीय पुढारी, नगरसेवक ,सरपंच किंवा जिल्हा परिषद सदस्य सुद्धा रस्त्यावर आला नाही किंवा त्याने तेलीसमाजाने/ ओबीसींनी उभारलेल्या लढ्यात सहभाग दर्शवला नाही. ज्याओबीसी समाजासाठी आपण लढायला पाहिजे त्यापूर्वीच अवसान घातकीपणा कशामुळे येतो..? कधी जागा होणार आपल्यातला ओबीसी..? कधी आपण आपल्या मुलाबाळांच्या हक्कासाठी लढू..? कधी आपण आपले राजकीय, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक फायदे आपल्या मुलांसाठी मिळतील यासाठी लढा देऊ..?
एक मराठा, लाख मराठा या एकाच ब्रीद वाक्याने आपण पाहिलेत की त्यांच्या आंदोलनापुढे सरकार नतमस्तक झाले. मनधरणी करीता त्यांच्याकडे वारंवार खेटा मारत आहे. त्यांना आरक्षण देऊ करत आहे. सरकार अक्षरश: सैरभैर झाले आहे. सरकारच नव्हे तर ओबीसींचे सर्व घटक मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी मदत करताहेत. परंतु आपण संख्येने जास्त असुनही आपल्या मानसिकतेमधे इतकी हतबलता का आली आहे..?
याला मुख्य कारण म्हणजे आपण संघटित नाही. ४०० जाती एकत्र असून संघटीत नाही. नेतृत्वहीन आहोत. पुचाट नेते मांडलीकत्व पत्करण्यातच स्वताला धन्य मानताहेत.याउलट ते संख्येने कमी आहेत परंतु गोबेलच्या नियम वापरून ते त्यांचा संघटीतपणा व एकजूट दाखवत आहेत. आम्ही संख्येने जास्त आहोत आणि आम्हाला आरक्षण मिळालेच पाहिजे याचं किलींग इंस्टींक्ट आपल्यात नाही.खरंतर आपण संख्येने जास्त आहोत परंतु आपण घरात बसून आहोत. कारण आपल्यामध्ये लढण्याची वृत्तीच राहिलेली नाही. कुणीही यावं आणि आपल्या टपलीत मारावं.. आपले असलेले हक्क ते हिरावून घेताहेत याची दखलही आपण घेत नाही.यालाच उदासिनता म्हणतात..!
आज २७% दर्शनी आरक्षण असून आपल्याला १९%च आरक्षण असताना सुद्धा आपल्याला काही ठिकाणी फक्त ६%च आरक्षण मिळते.एवढा जबरदस्त अन्याय होतो तरी आपण अजूनही पेटून उठत नाहीत.ही प्रचंड उदासिनता आपल्या अंगी कुठून आली? आपण अन्यायाविरुद्ध लढा देऊ शकत नाहीत का? आपल्यातल्या पांढऱ्या पेशी मेल्यात का? का आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाही..? आपण शेळपट झाले आहोत कां ? आपण नेतृत्वहिन आहोत कां? आपल्याला पाहिजे तसे नेतृत्व मिळत नाही कां.? आपले जे राजकीय नेते किंवा समाजनेते आहेत ते निव्वळ आणि निव्वळ त्यांच्या पुरताच केंद्रित झाले आहेत कां? ते त्यांच्याच पोळीवर तूप ओढण्यापुरता मर्यादित राहिलेले आहेत का?त्यांना समाजाची किंवा ओबीसीच्या राजकारणाची अजिबात पर्वा नाही कां..? याप्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधावी लागतील..असे कुणालाच वाटत नाही कां.. ?
वार्षिक बक्षीस समारंभ, गुणगौरव समारंभ, लग्नाचे मेळावे इत्यादी पलीकडे या समाजाच्या मंडळांना कुठले काम राहिलेले नाहीत. ज्या वेळेस इलेक्शन/ निवडणुका जवळ येतात तेव्हा सर्व पक्षाचे नेते समाजात तात्पुरता पुढारीपण करतात. ते आपल्या सर्वांचा वापर करून घेतात मग आपल्याला अक्कलदाढ कधी येणार ? आपल्या समाजाचे पर्यायाने मुलांचे भवितव्य, त्यांचे भविष्य आपण कधी घडवणार ?
त्याकरिता सर्व ओबीसींनी एकत्र येणे महत्त्वाचे आहे.नेता नसला,नेतृत्व नसले तरी व्यकक्तीश: प्रत्येक ओबीसींनी मनामधे फक्त एकच निर्णय घ्यायचा आहे की..यापुढे..
"आम्ही जे मतदान करू ते फक्त आणि फक्त ओबीसी उमेदवारालाच करू..!"
कोणत्याही ओबीसी व्यतिरिक्त समाज जे आमचा मतदानापुरता फक्त वापर करतात नंतर विरोधात राजकारण करतात त्यांना आम्ही कदापि यापुढे मतदान करणार नाही.जेव्हा तुम्ही हा निर्णय घ्याल त्याच वेळेस सरकार किंवा सर्व पक्षाचे नेते तुमच्याकडे खेटा मारतील.अजूनही आपली वेळ गेलेली नाही. प्रत्येक ओबीसी घटकाला या निमित्ताने विनम्र आव्हान करण्यात येते की,त्यांनी येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये निव्वळ आणि निव्वळ ओबीसी समाजाच्या उमेदवारालाच मतदान करावे तरच या ठिकाणी आपलं अस्तित्व दिसेल याची सर्वांनी "शपथ घ्यावी.."नाहीतर पुन्हा पहिले पाढे पंचावन्नच रहातील.
बाकी..सुज्ञास अति सांगणे न लगे..!
जय ओबीसी..!
आपला ओबीसी शुभचिंतक.. - सुनील चौधरी कल्याण.
obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission