सत्यशोधक पितृऋण कृतज्ञता कार्यक्रम

     निसर्गलीन किसनाजी कोठेकर स्मृतिप्रीत्यर्थ सत्यशोधक पद्धतीने पितृऋण कृतज्ञता कार्यक्रम हिंगणघाट येथे आयोजित करण्यात आला. आमचे सत्यशोधक चळवळीतील सन्मित्र गिरीधर कोठेकर यांचे वडील आदरणीय किसनाजी कोठेकर हे सप्टेंबरच्या २१ तारखेस वयाच्या शंभराव्या वर्षी गतप्राण झाले. त्याप्रित्यर्थ पितृऋण कृतज्ञता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.मा. किसनाची कोठेकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कुटुंबातील सर्व स्त्री-पुरुष सदस्यांनी महात्मा जोतीराव फुले यांच्या अखंडांचे सामुहिक गायन करुन कृतज्ञता व्यक्त केली. स्टेजवर  मा. किसनाजी कोठेकर यांच्या प्रतिमेसोबतच म. जोतीराव फुले यांची प्रतीमा आणि म. महात्मा फुले समग्र वाङमय मध्यभागी ठेवून अभिवादन करण्यात आले.  आपल्या जीवनाला आकार देण्यासाठी आईवडिलांसोबतच आपले महान पूर्वज महात्मा जोतीराव फुले यांचे योगदानाची आठवण करणे, सिंधुजन- बहुजनांच्या आत्मसन्माच्या सत्यशोधक चळवळीची आठवण करणे हा सदर कृतज्ञता कार्यक्रमात  आणखी एक महत्वपूर्ण क्षण पहायला मिळाला. याप्रसंगी सत्यशोधक समाजाचे डॉ. अशोक चोपडे, कपिल थुटे, बाबा बिडकर, अनुज हुलके, टेमराज माले, प्रदीप ताटेवार प्रामुख्याने उपस्थित होते.

satyashodhak PITRURHUN kritagyata karyakram

 प्राणीमात्रांसंगे।
करण्यास स्नेह।
होता सदा देह।
सचेतन।।१।।

आजवरी होता।
आमुचे सांगाती।
आता नवी गती।
देहाला या ।।२।।

राहतील मनीं।
नित्य आठवणी।।
प्रेरणेची गाणी।
ओठांवर।।३।।

आता या देहास।
अंतिम प्रणाम।
राहो त्याचे नाम।
चिरंतन।।४।।

    अशाप्रकारे काव्यगायनातून त्यांचे स्मरण करण्यात आले. शिवधर्म गाथेतील दुखवटा मजकुराचे वाचनही या प्रसंगी करण्यात आले. पितृऋण कृतज्ञता व्यक्त करताना मान्यवरांनी सत्यशोधक समाजाच्या कार्यासंबंधी माहिती विशद करत  पुरोहिताशिवाय ब्राम्हणेतर समाजातील तेली, माळी ,कुणबी, धनगर, वंजारी, कोहळी, पवार, आगरी, भंडारी, बारी, न्हावी, कुंभार, सुतार, सोनार, लोहार आदि अठरापगड जातीतील लोकांनी आपली लग्नकार्ये, गृहप्रवेश, मृत्यु संस्कार, पिंडदान, नामकरण आदी प्रसंगी भट-पुरोहित-ब्राम्हणपुजाऱ्याशिवाय ही कार्ये का व कशी करावित? ह्यांची विधी संहिता आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीचे विवेचन करण्यात आले. सार्वजनिक सत्यधर्म, सत्यशोधक चळवळ, सत्यशोधक समाजाच्या कार्यभागाची महती समजावून सांगितली. सत्यशोधक समाजाच्या चळवळीने ओबीसी कष्टकरी समाजातील पुजारी तयार केले. पूजा विधी तयार केल्या. आपल्या कुलदैवतांची उपासना करण्याची शिकवण दिली.भटब्राम्हण हे पोटार्थी असून, पोट भरण्यासाठी ते धर्माचा देवाचा बाजार मांडतात. अशा दांभिक धर्ममार्तंडापासून ब्राम्हणेतर हिंदूंना सजग करण्याचे काम केले. सत्यशोधक चळवळीचा व विचाराचा प्रभाव म्हणून आजही अशा तमाम कार्यात अनेक प्रसंगी विविध जातीसमूहात आणि समाजात पुरोहिताला न बोलविता सत्यशोधक पद्धतीने, शिवधर्म पद्धतीने, वा गुरुदेव सेवा मंडळाच्या तुकडोजी महाराजांनी दाखविलेल्या मार्गाने व इतरही पद्धतीने ब्राम्हणाशिवाय अशी मंगल व दुखाची कार्य मोठ्या प्रमाणात करुन आपल्या धार्मिक स्वावलंबनाचा, स्वायत्ततेचा आविष्कार करतात. ब्राम्हणांशिवाय इतर जातीचे लोक बहुधा पुजारी बनून पौरोहित्य करताना दिसतात. कोठेकर परिवाराने या परंपरेचा स्विकार करुन कडी जोडली.

    आदरणीय किसनाजी कोठेकर हे मुळचे शिवनगर पो. हमदापूर ता.सेलू ,जि. वर्धा येथील रहिवासी. वारकरी संत परंपरेचा आपल्या समाजमनावर खोलवर प्रभाव ठसलेला आहे. किसनाजी कोठेकर यांच्या आचरणावरही तो स्पष्टपणे दिसून येतो. सत्यशोधक समाजाचे प्रचार प्रसाराचे कार्य प्रत्यक्षात त्यांनी बघीतले त्याचे ते प्रत्यक्षदर्शी साक्षीदार ठरतात. सत्यशोधक चळवळीचे प्रचार-प्रसाराचे प्रभावी माध्यम म्हणून सत्यशोधकी जलसा फार लौकिक प्राप्त होता. त्याद्दलची इत्यंभूत माहिती कोठेकर काका अगदी लीलया आणि तल्लीन होऊन सांगत,असे अशोकभाऊ चोपडे त्यांच्या सत्यशोधक चळवळीचे साहित्य या संशोधनासाठी माहिती संकलनाचे निकराचे काम करत असतानाचे असे किस्से आम्हा सवंगड्यांसवे चर्चा करताना सांगतात. कोठेकर काकांच्या आदरांजलीप्रसंगी ही बाब त्यांनी आवर्जून सांगितली. या विचाराचा प्रभाव म्हणावा की शिक्षणाबद्दच्या उत्कट प्रेमाने त्यांनी आपल्या अपत्यांवर शैक्षणिक संस्कार केले. मारुती,विठ्ठल ,रमेश आणि गिरीधर असे चौघे पुत्र त्यांना विश्वासार्ह वाटत, आयुष्यभर खूप सूख-आनंद देणारे वाटत. रमेश आणि गिरीधर दोघे शिक्षक. त्यांच्या जडणघडणीत किसनाजी काका कोठेकर यांनी कसलीही कसर सोडली नाही. त्यातही गिरीधर कोठेकर हा पुत्र म्हणजे, "तिही लोकी झेंडा."

    एका वेगळ्या अर्थाने गिरीधर या सूत्रात बसतात. कोठेकर कुटुंबाची सर्वसामान्य परिस्थिती असताना शालेय जीवनापासून आजतागायत निकराचा संघर्ष करत गिरीधर कोठेकर यांनी आपलं विश्व निर्माण केलं. स्वतंत्र व्यक्तिमत्त्व उभं केलं, त्याला सामाजिक कार्याची जोड आहे. गिरीधर कोठेकर यांना वडीलांचा वारसा बोनस ठरला. विद्यार्थी दशेपासून ते हाडाचे कार्यकर्ते. मंडलच्या काळात वर्धा येथील विविध शिबिरातून पक्के कार्यकर्ते घडत.त्या मूशीतून घडलेले. त्यांची संवादशैली कमालीची मधाळ आहे. विभिन्न विचाराच्या मित्रांसोबत सलोखा साधणे आणि मैत्र जपणे अफलातून कसब त्यांच्या अंगी वसलेले. सार्वजनिक क्षेत्रात काम करत असताना जे खूपच उपयुक्त ठरते. या सद्गुणांचा आचरणात उपयोग करून त्यांनी सत्यशोधकी विचाराची कास धरुन ठेवली. या वाटेवर चालणारे अनेक सहप्रवासी जोडण्याचे काम केले. शिवनगर-हमदापूर  या त्यांच्या गावात आणि सिंदी-सेलू परिसरात त्यांनी ओबीसी, विद्यार्थी, शेतकरी केंद्रित अनेक कार्यक्रम आयोजित केले. शिक्षक म्हणून काम करत असताना, अधिक जोमाने परिवर्तनाचा गाडा पुढे नेण्याचे काम केले. शिक्षकांचे प्रबोधन चळवळीत फार अमूल्य योगदान ठरते. यादृष्टीने सत्यशोधक शिक्षक प्रबोधिनीच्या वर्धा, हिंगणघाट येथील निवासी शिबिराच्या आयोजनात त्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. त्यातून अनेक शिक्षक सत्यशोधकी पद्धतीने विचार आचार करू लागले. अनेक तरुण फूले शाहू आंबेडकरी  विचार, सत्यशोधकी विचार समजून घ्यायला लागले. वर्धा जिल्ह्यातील मंडल आंदोलनात ओबीसी प्रबोधनात, सत्यशोधकी साहित्य संमेलन, सत्यशोधक समाज अधिवेशन विद्रोही साहित्य संमेलनाच्या आयोजनात सहभागी होऊन त्यांनी सक्रियता कायम राखली.  कुटुंबातील आपली भावंडं सोबत घेऊन, सर्वांना विश्वासात घेऊन त्यांनी सत्यशोधक पितृऋण कृतज्ञता कार्यक्रम आयोजित केला.

विवेकी करीना जप अनुष्ठाने।
पोकळ अर्पण निर्मिकास।।
विवेकी ढळेना दीन रंडक्यांना।
त्यास भादरीना न्हाव्या हाती।।
विवेकी भजेना धातू दगडांस।
म्हणेना शुद्रास तुम्ही नीच।।
सद्विवेकाविना करीत मळमळ
पाखंडी निव्वळ जोती म्हणे।।

    आणि म्हणून सद्विवेकाचा मार्ग धरुन पाखंड दूर करत त्यांनी समाजापुढे आदर्श उभा केला. मातृ-पितृऋण फेडत असताना त्यांनी पुढाकार घेऊन काही वर्षांपूर्वी आई  निर्वानानंतर आणि आता वडील गेल्यानंतर दोघांच्याही  कृतज्ञतापूर्वक आदरांजलीचा कार्यक्रम आयोजित केला होता.

■ अनुज हुलके

Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209