नागपूर - देहदान, नेत्रदान, अवयदान, त्वचादान यावर शासकीय यंत्रणेद्धारा प्रसिद्धी माध्यमातून जोरदार प्रचार सुरू असतो. पण प्रत्यक्ष देहदान करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या मृताच्या नातेवाईकांना शासकीय यंत्रणा मानसिक त्रास देत आहे. असाच प्रकार सुरू राहिल्यास येत्या काळात देहदानाविषयी लोकांमध्ये आस्थाच उरणार नाही, अशी भीती श्री गुरुदेव युवा मंचचे प्रवर्तक ज्ञानेश्वर रक्षक यांनी व्यक्त केली.
आई, वडिलांचे देहदान करताना आलेल्या अडचणी याकडे लक्ष वेधत ज्ञानेश्वर रक्षक म्हणाले, वडिलांचे देहदान इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजला २०१८ मध्ये केले. तेव्हाही प्रशासकीय यंत्रणेचा बराच त्रास झाला. २०२२ मध्ये आईच्या निधनानंतर देहदानासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीर रचनाशास्त्र विभागाला फोन केला. तेव्हा नैसर्गिक मृत्यू झाला असतानाही विविध तपासण्यांचे कारण पुढे केले गेले. मृतदेहाची अवहेलना करण्याचा प्रकार घडला. प्रा. डॉ. सुशील मेश्राम यांना ही व्यथा सांगितल्यानंतर मार्ग निघाला. देहदान चळवळीत काम करणाऱ्या डॉ. मेश्राम यांनाही असाच अनुभव आला. आमच्या देहदानाच्या कामात लता मंगेशकर हॉस्पिटलचे डॉ. ओंकार, डॉ. फुलसे यांनी सहकार्य केले. मात्र, येथे प्रमाणपत्रासाठी मनस्ताप सहन करावा लागतो. लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूर ग्रामीणमध्ये येत असल्यामुळे मृत्यू प्रमाणपत्रासाठी चकरा माराव्या लागतात. डॉक्टरांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्र तसेच शरीर रचनाशास्त्र विभागप्रमुखाच्या स्वाक्षरीसह 'देहदान प्रमाणपत्र' असल्यावरही मृत्यूचा दाखला मिळण्यास अडचणी येतात. श्री गुरुदेव सेवा मंडळाचे चंद्रभान राऊत यांनी नुकतेच त्यांच्या आईचे देहदान लता मंगेशकर हॉस्पिटलला केले. त्यांना मृत्यू दाखल्यासाठी महापालिकेकडून मनस्ताप दिला जात असल्याचेही ज्ञानेश्वर रक्षक यांनी सांगितले.