मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी मुख्यमंत्री दर आठवड्याला आढावा बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांच्या या तत्परतेचे स्वागत करतो, मात्र मुख्यमंत्र्यांची हीच तत्परता ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांविषयी का नाही? असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
यासंदर्भात वडेट्टीवार यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतिगृहे १५ ऑगस्टपर्यंत सुरू होतील, अशी घोषणा बहुजन कल्याण मंत्र्यांनी मागील अधिवेशनात केली होती. या घोषणेला डिसेंबर मध्ये एक वर्ष पूर्ण होणार आहे. परंतु अद्याप त्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. अधिकारी यावर आम्हाला दिशानिर्देश नसल्याचे सांगत आहेत. एका वर्षात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी या विषयाचा आढावा का घेतला नाही? असा सवाल करताना महायुती सरकारने केवळ घोषणाबाजी करण्याचे फसवे धोरण थांबवून ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राज्यात तत्काळ वसतिगृहे सुरू करावीत, अशी आमची मागणी असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.