- प्रा. श्रावण देवरे
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1937 सालच्या मध्यवर्ती असेंब्ली निवडणुकांमध्ये स्वतंत्र मजूर पक्षातर्फे एकूण 17 उमेदवार उभे केले होते, त्यापैकी 14 उमेदवार निवडून आले होते. त्यातील तीन उमेदवार ओपन कॅटिगिरीतील निवडून आले होते. या निवडणूकांच्या कामासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ईगतपूरी येथे आले होते. तेथे उमेदवारीसाठी त्यांच्या दोन कार्यकर्त्यांमध्ये चुरस लागलेली होती. त्यापैकी एक कार्यकर्ता अत्यंत गरीब होता, परंतू तो प्रामाणिक व अत्यंत निष्ठावंत होता. दुसरा कार्यकर्ता श्रीमंत होता. पैशांच्या जोरावर निश्चितपणे निवडून येईल, अशी त्याची परिस्थिती होती.
या दोघांची बाजू बाबासाहेबांनी ऐकूण घेतली. आणी त्या रात्री झालेल्या जाहीर भाषणात त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. बाबासाहेब म्हणाले कि, ‘निवडणूका या केवळ निवडून येण्यासाठी लढायच्या नसतात, तर आपले विचार, आपल्या भुमिका घरोघरी पोहचविण्यासाठी लढायच्या असतात. विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी निवडणूकांइतके प्रभावी माध्यम दुसरे कोणतेही नाही.’
निवडणूका जाहीर होण्याआधी एक महिना व निवडणूका जाहीर झाल्यानंतरचा एक महिना, असे एकूण दोन महिने प्रचाराचा धुराळा उडत असतो. या काळात उमेदवार जेवढे सतर्क असतात त्याहीपेक्षा मतदार जनता अधिक सतर्क असते. जनता निवडणूकांच्या काळात राजकीयदृष्ट्या सेन्सिटिव्ह बनलेली असते. कोण उमेदवार काय बोलतो, काय पत्रक काढतो हे जनता काळजीपूर्वक ऐकत असते, वाचत असते. सर्वसामान्य लोक प्रत्येक उमेदवाराच्या सभा अटेंड करीत असतात व रोज वर्तमानपत्रात निवडणूकांच्या बातम्या वाचून त्यावर चर्चा करीत असतात. कार्यालयात, बाजारात, चहाच्या हॉटेलात, पान-सुपारीच्या टपरीवर अशा चर्चांना उत आलेला असतो. या काळात जर पुरोगामी विचारांचा प्रामाणिक उमेदवार निवडणूकीला उभा राहीला तर त्याने काढलेली वैचारिक पत्रके, पुरोगामी भुमिका असलेला जाहीरनामा जर घरोघरी पोहचलेत तर लोक निश्चितच ते वाचतात.
बाबासाहेब भाषणाच्या शेवटी सांगतात की, ‘मी जर पैश्यांकडे पाहून श्रीमंत माणसाला तिकीट दिले तर त्याचे सर्व लक्ष केवळ जास्तीतजास्त पैसे खर्च करण्यावर राहील, कारण तो निवडून येन्यासाठी त्याच्याजवळ पैशांचे माध्यम आहे. परंतू मी जर गरीब उमेदवाराला तिकीट दिले तर त्याचा जास्तीतजास्त भर विचारांच्या प्रचार-प्रसारावर राहील. कारण निवडून येण्यासाठी त्याच्याजवळ केवळ विचार हेच एकमेव माध्यम राहील.
प्रामाणिक व गरीब उमेदवार निवडून आला नाही तर तो पुढील पाच वर्षे विचारांच्या प्रचार-प्रसाराचे काम अधिक जोमात करेल, कारण त्याला विचारांच्या जोरावरच निवडून यायचे आहे. पण हाच गरीब उमेदवार जर निवडून आला तर तो वैचारिक प्रबोधनावर जास्तीत काम करेल, कारण त्याला पुन्हा जास्तीतजास्त मताधिक्याने निवडून यायचे आहे. लोकांनी मला मला निवडून देतांना पैसे नाही बघितले तर माझे विचार पाहून मला निवडून दिले आहे, याची तो सतत जाणीव ठेवेल.
पण जर मी श्रीमंत उमेदवाराला तिकीट दिले आणी तो पराभुत झाला तर निवडणूकीनंतर तो ‘विनाकारण पैसे पाण्यात घातलेत’ म्हणून पश्चाताप करीत बसेल व कार्यकर्त्यांना ‘पैसे घेऊनही नीट काम केले नाही’ म्हणून शिव्या देत बसेल. पण हा श्रीमंत उमेदवार जर निवडून आला तर तो फुशारकी मारून सांगेल की, ‘मी माझ्या पैशांवर निवडून आलो आहे, पक्षाच्या वैचारिक भुमिकेमुळे नाही.’ निवडणूकीत जेवढे पैसे खर्च झाले असतील ते पाच-दहा पटीने वसूल कसे होतील, याचाच विचार तो करू लागेल. त्यासाठी तो आमदारकीचा गैरवापर करून लोकांना फसवून पेसा कमवेल, पैशांसाठी सत्ताधारी पक्षाशी वैचारिक तडजोडी करुन खोकीच्या खोकी माल कमावेल. पक्षनेतृत्व व कार्यकर्त्यांना तुच्छतेने वागवेल. म्हणून आम्ही ‘ओबीसी राजकीय आघाडीतर्फे’ जास्तीतजास्त प्रामाणिक व वैचारिकदृष्ट्या निष्ठावंत असलेल्या लोकांनाच तिकीटे देत आहोत. आतापर्यंत 15 विधानसभा व 10 लोकसभा उमेदवार निश्चित झाले असुन त्यांनी प्राचाराच्या कामाला सुरुवातही केलेली आहे.
पैसेवाल्यांना जास्त तिकीटे दिलीत तर जास्त संख्येने आमदार-खासदार निवडून येतील व तुमच्या पक्षाला सत्ताही मिळेल, परंतू हे पैसेवाले आमदार जास्त पैशांसाठी खोकी घेऊन विकले गेलेत तर ती सत्ता काय कामाची? सत्तेच्या बाजारात जनतेचे जीवन-मरणाचे प्रश्न सुटणारच नाहीत. गरीब व वैचारिक निष्ठावंत उमेदवार निवडून येनार नाहीत, परंतू त्यांच्या विचारांचा दबाव सत्ताधार्यांच्या मानगुटीवर सतत असतो व तो त्यांचे काम करायला भाग पाडत असतो.
- प्रा. श्रावण देवरे
संस्थापक-अध्यक्ष, ओबीसी राजकीय आघाडी
संपर्कः 94 227 88 546 ईमेलः obcparty@gmail.com