अधिवेशन - धरणगावात सत्यशोधक समाज संघाच्या बैठकीत विचारमंथन
धरणगाव - सत्यशोधक चळवळीचा इतिहास प्रेरणादायी असून सत्यशोधक विचारांवर चालण्याची गरज आहे. असे आवाहन सत्यशोधक समाज संघाचे राज्य सचिव डॉ. सुरेश झाल्टे यांनी केले. ते येथील संत सावता माळी समाज पंचमंडळ, मोठा माळीवाडा समाज भवनात सत्यशोधक समाज संघ अभ्यासगटाच्या बैठकीत बोलत होते. प्रास्ताविकात सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक पी. डी. पाटील यांनी येत्या २४ रोजी नाशिक येथे राज्यस्तरीय अधिवेशनाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा नामदेव माळी होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून सत्यशोधक समाज संघाचे राज्य सचिव डॉ. सुरेश झाल्टे, सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक विजय सुल्हे, विधीकर्ते शिवदास महाजन उपस्थित होते.
सत्यशोधक विचारांवर मार्गक्रमण करण्याची गरज.....
कार्यक्रमप्रसंगी डॉ. सुरेश झाल्टे यांनी सत्यशोधक चळवळीचा इतिहास उलगडला. सत्यशोधक समाज संघाचे महत्त्व सांगून सत्यशोधक विचारांवर चालण्याची गरज आहे. महाराष्ट्रात सत्यशोधक विधीकर्ते निर्माण करून प्रत्येकाने सत्यशोधक विधीप्रमाणे विधी करावेत असे मनोगतातून आवाहन केले. यावेळी मोठा माळीवाडा, लहान माळीवाडा परिसराचे समाजाध्यक्ष विठोबा माळी, रामकृष्ण महाजन यांनी जास्तीत जास्त संख्येने नाशिक येथे अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले.