कोल्हापुरातील सत्यशोधक चळवळीने महाराष्ट्राला प्रगतिशील विचारांचे नवे परिमाण दिले. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला आता दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त कोल्हापुरातील सत्यशोधक चळवळीचा घेतलेला परामर्श. - प्रा. डॉ. अरुण शिंदे
करवीर सत्यशोधक समाजाची स्थापना १९११ ला झाली. भास्करराव जाधव (अध्यक्ष), अण्णासाहेब लठ्ठे (उपाध्यक्ष), हरिभाऊ लक्ष्मण चव्हाण (सेक्रेटरी), तसेच महादेवराव डोंगरे, गोविंदराव सासने मास्तर, गोविंदराव विठ्ठलराव जाधव, गणपतराव कदम वकील (सदस्य) यांची पदाधिकारी म्हणून निवड केली. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेपासून राजर्षी शाहू महाराजांनी समाजास सर्व प्रकारचे साहाय्य केले. करवीर दरबाराच्या नोकरीत असणारे विठ्ठल बिराजी डोणे यांना महाराजांनी दरवाराकडील सेवा माफ करून त्यांची सत्यशोधक समाजाच्या कामासाठी पूर्ण वेळ नेमणूक केली. डोणे मास्तरांनी सत्यशोधक समाजाचे काम निष्ठेने केले. करवीर संस्थानमध्ये १९१३ मध्ये ५१६१ धार्मिक विधी सत्यशोधक पुरोहितांनी केले. १९१४ मध्ये २९८ विवाह सत्यशोधक पद्धतीने झाले.
समाजास स्थैर्य देण्यासाठी शाहू महाराजांनी गंगावेस येथील जागा दिली. सत्यशोधक समाजतत्त्वांचे पुरोहित तयार करणारी शाळा सुरू करण्यासाठी महिना चाळीस रुपयांची मदत सुरू केली. गंगावेस येथे १९१३ मध्ये पुरोहितशाळा सुरू झाली. या शाळेमध्ये मराठी मुलखातील विद्याथ्यानी प्रवेश घेतला. डोणे मास्तर, ह. ल. चव्हाण यांच्यासारख्यांच्या चिकाटीमुळे गंगावेस येथील इमारत उभी राहिली. १९१६ मध्ये निपाणी येथे सत्यशोधक समाज परिषद झाली.
सत्यशोधक समाजातर्फे छत्रपती राजाराम महाराजांना २८ ऑगस्ट १९२२ मानपत्र दिले. १९२३ मध्ये 'श्री शाहू सत्यशोधक समाज' या नावाने समाज स्थापन केला. याद्वारे विविध उपक्रम सातत्याने आयोजित केले गेले. नवरात्रात शाहू व्याख्यानमाला होत असे. १९२६ पासून मोफत सार्वजनिक वाचनालय सुरू केले.
१९३३ मध्ये माधवराव बागल यांनी 'सत्यशोधक हीरक महोत्सव ग्रंथ' प्रकाशित केला. सत्यशोधक समाजाचे अधिवेशन २७ मे १९५० ला मुकुंदराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापुरात झाले. अधिवेशनाचे उद्घाटन लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी केले. केशवराव विचारे यांच्या सत्यशोधक विद्यार्थी संघातर्फे १९४७ मध्ये पन्हाळा येथे अभ्यास शिविर झाले. त्यामधून डी. एस. नार्वेकर, डी. डी. जाधव, ज्ञानवा साळुंखे असे अनेक कार्यकर्ते पडले. पुढे नार्वेकर यांनी शाहू सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष म्हणून दीर्घकाळ काम केले. नरसिंगराव भूजंगराव पाटील यांनी १९३८ मध्ये शिवणगे येथे शाळा सुरू केली. त्यांनी सत्यशोधक विचार प्रसार, दारुबंदी, लक्ष्मी यात्रा बंदी असा धाडाका लावला. व्ही. एस. पाटील (१९०१-१९७६) या निष्णात वकिलांनी त्यांच्या कारकिर्दीत बेळगाव, खानापूर, चंदगड, हक्केरी, चिक्कोडी या तालुक्यांमध्ये शेकडो शाळा सुरू करून शिक्षणप्रसाराची मोहीम सुरू केली.
दाजीबा देसाई (१९२५-१९८५) यानी राजाराम कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना विद्यार्थी चळवळीचे नेतृत्व केले. पुढे त्यांनी सीमालाचे नेतृत्व केले. १९६० मध्ये राज्यसभेवर व १९७७ मध्ये कोल्हापूरमधून लोकसभेवर ते निवडून गेले. गुरुनाथ पाटील ऊर्फ 'गुरवान मास्तर' यांनी शिक्षकी पेशा स्वीकारून शिक्षणप्रसाराचा ध्यास घेतला.
सत्यशोधक कार्यकर्त्यांनी १९५३ मध्ये कालीला माध्यमिक शाळा सुरू केली. ध्येयवादी मंडळींनी एकत्र येऊन खेडूत शिक्षण मंडळाची स्थापना केली. या मंडळाने न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड (१९५६) महात्मा फुले विद्यालय (१९५८), सह्याद्री विद्यालय, हेरे (१९६७) आदी शाळा सुरू केल्या. कोल्हापुरातील सत्यशोधक चळवळीने महाराष्ट्राला प्रगतिशील विचारांचे नवे परिमाण दिले.
२५ मार्च १९२७ ला महात्मा गांधी रेल्वेने कोल्हापुरात आले. सोबत कस्तुरबाही होत्या. सायंकाळी खासबाग मैदानात गांधीजींची जाहीर सभा झाली. त्यानंतर गांधीजी गंगावेसीतील सत्यशोधक समाजाकडे गेले. तेथे खंडोबा पन्हाळकर यांच्या हस्ते गांधीजीना थैली व मानपत्र देण्यात आले. या वेळी महात्माजी म्हणाले, "सत्यशोधक समाजाचा जातिभेद नष्ट करून समानता वाढविण्याचा उद्देश स्तुत्य आहे."
(लेखक कोल्हापुरातील नाईट कॉलेजमध्ये मराठी विभागप्रमुख आहेत.)
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan