स्मृतीशेष हरी नरके सर,
आपण सध्या आमच्यात नसले तरी महाराष्ट्राच्या पुरोगामी आणि प्रबोधनाच्या चळवळीत आपले नाव शेवटपर्यंत अजरामर राहील यात कोणतीही शंका नाही. तसे पाहिले तर इतक्या लवकर जग सोडून जाण्याचे आपले वय नव्हते. परंतु प्रकृती आणि इलाज करताना डॉक्टरांकडून झालेली हलगर्जी यामुळे आपण बहुजन समाजाला पोरके करून गेलेले आहात. आपण केलेले कार्य हे अलौकिक आहे. पुरोगामी चळवळीला एकविसाव्या शतकात योग्य दिशा देण्याचे काम आपण केलेले आहे. अतिशय कमी वयात अत्यंत सखोल आणि अव्वल दर्जाचे संशोधन करून आपण आपला एक वेगळा ठसा उमटविलेला आहे. स्वतःला इतिहास संशोधक समजणारे अनेक तथाकथित विद्वान आमच्या देशात आहेत. परंतु पुराव्यासहित, संदर्भासहित आणि अतिशय अभ्यासपूर्ण व पूर्वग्रह विरहीत अशा प्रकारचे संशोधन आपण केले आणि बहुजन महामानवांचा वास्तववादी इतिहास जगासमोर आणण्यास मोलाचे योगदान दिले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या बाबतीत आपण केलेले संशोधन आणि पुराव्यानिशी समोर आणलेला इतिहास नवीन पिढीसाठी एक ज्ञानाचा सागर आहे. आपले वक्तृत्व, कर्तृत्व, दातृत्व आणि साहित्याच्या क्षेत्रातील नेतृत्व या सर्वच गोष्टी आपणाला बहुजन समाजाचे महानायक ठरविण्यास परिपूर्ण आहेत.
प्रिय सर, बहुजन समाजामध्ये प्राचीन काळापासूनच महापुरुषांची फार मोठी परंपरा आहे. या महापुरुषांनी प्रचंड संघर्ष आणि विरोध पत्करून बहुजन समाजाला दिशा देण्याचे काम केलेले आहे. प्रसंगी प्राणाचे बलिदान देऊन, जनावरासारख्या वागणुकीतून बहुजनांना माणसांमध्ये आणण्याचे काम आमच्या अनेक महापुरुषांनी प्रत्येक कालखंडात केलेले आहे. त्यामुळेच आज जे काही बहुजन समाजाने प्राप्त केलेले आहे ती सर्व या महापुरुषांची पुण्याई आहे. परंतु सध्याचा काळ फार कठीण आहे. आमच्या महापुरुषांचा जाज्वल्य इतिहास पुसून टाकून त्याऐवजी प्रतिक्रांती करणाऱ्या मनुवादी लोकांचा खोटा आणि विकृत इतिहास आमच्या तरुण पिढी समोर आणण्याचे कारस्थान देशात सुरू आहे. हे कारस्थान हाणून पाडण्याचे काम आपण अनेकदा केलेले आहे. त्यासाठी आपल्याला खूप विरोधालाही सामोरे जावे लागले. प्रचंड टीका सहन करावी लागली,चारित्र्यहनन झाले. तरीसुद्धा कोणासमोरही न झुकता आपण सातत्याने बहुजन समाजाला जागृत करण्याचे कार्य केलेले आहे.
सर, आपण अनेक विषयांवर आपले मत व्यक्त केलेले आहे. छत्रपती शिवराय, संभाजी महाराजांपासून तर फुले, शाहू, आंबेडकर, महात्मा गांधी, सावरकर गोडसे यासारख्या सर्वच विषयांवर आपण सातत्याने लिहित, बोलत आलेले आहात. त्यामुळे आपल्यावर सातत्याने टीका होत गेली. प्रसंगी चळवळीतील लोकांनीही आपल्याला दूर लोटण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीसुद्धा आपण आपल्या कामांमध्ये कोणताही खंड पडू न देता व कोणाचाही द्वेष न करता आपले कार्य सतत सुरूच ठेवले. सर, आज देशाची परिस्थिती अत्यंत भीषण आहे. इतिहासाची तोडमोड सुरू आहे. आमच्या महापुरुषांची जाहीरपणे बदनामी आणि चारित्र्यहनन सुरू आहे. सरकारचे या सर्व गोष्टींना जाहीर समर्थन व पाठिंबा आहे. अशावेळी तुमची या देशाला नितांत आवश्यकता होती. कारण आपल्या अभ्यासपूर्ण आणि संशोधनात्मक वाणीने आणि लेखणीने मनुवाद्यांना झुकविण्याची आणि पराभूत करण्याची ताकद आपल्यात होती. आपण दिलेले संदर्भ खोडून काढणे मनुवाद्यांसाठी अत्यंत कठीण गोष्ट होती. त्यामुळे ते आपल्याला घाबरत होते. जिवंतपणे तर त्यांनी आपल्याला त्रास दिलास, परंतु मृत्यूनंतर सुद्धा त्यांनी आपल्या संदर्भात जे लिखाण केले त्यातून त्यांची विकृती तर दिसून आलीच पण तुमच्या विषयी त्यांच्या मनात किती भीती आणि दबाव होता हे सुध्दा दिसून आले. तुमच्या मृत्यूची बातमी समजतात पुण्यातील एक जात विशिष्ट आडनावाच्या लोकांनी आपल्या घाणेरड्या मेंदूतून जी घाण बाहेर टाकली ती खरोखर त्यांची संस्कृती आणि संस्कार कोणत्या स्तरातील आहे हे दाखवणारी होती. परंतु त्यांनी आपल्यावर ज्या पद्धतीची टीका केली, त्यावरून हे लक्षात आले की आपली दिशा योग्य होती आणि आपण बहुजन समाजाला केलेले मार्गदर्शन हे खरोखर मौल्यवान होते तसेच मनुवादी संस्कृतीच्या समर्थकांना पराभूत करणारेही होते.
प्रिय सर, आज आपण आमच्यामधे जरी नसले तरी आपले विचार आमच्या हृदयात आणि मेंदूत आम्ही जपून ठेवले आहे. आपल्या विचारांनी आपण सदैव जीवंत राहाल. आपल्याच विचारांनी या मनुवादी विकृतीला उध्वस्त करण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत निश्चितपणे प्रयत्न करीत राहणार. आपल्या विचारात ती ताकद पुरेपुर आहे. येणारा काळ हा बहुजनांचाच असणार आहे. त्यामुळे तुमच्या विचारांच्या स्मृती सोबत घेवूनच आम्ही येणाऱ्या काळात मार्गक्रमण करून बहुजनांचे राज्य या देशात निर्माण करणार आहो. त्या दिवशी आपण शरीराने जरी हजर नसला तरी आपल्या विचारांचीच ती क्रांती असेल एवढे मात्र निश्चित ! भावपूर्ण आदरांजली. .........
प्रेमकुमार बोके अंजनगाव सुर्जी
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan