चंद्रपूर - राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या वादाची ठिणगी चंद्रपुरात सुद्धा पडली आहे. कुणबी आरक्षणाबाबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाची चंद्रपुरात ओबीसी महापंचायतीचे आयोजन केले होते. यामध्ये ओबीसी समाज व इतर जातनिहाय जनगणना, ओबीसी समाजाचे वसतिगृह तत्काळ सुरू करा व मराठा समाजाला सरसकट ओबीसी वर्गात सामील करू नये, असे ठराव मांडण्यात आले. 11 सप्टेंबरला चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे हे अन्नत्याग आंदोलन करणार आहे. तर 17 सप्टेंबरला ओबीसी समाजाचा महामोर्चा विविध मागण्यांसाठी काढण्यात येणार आहे.
मराठा समाजाला जर कुणबी प्रमाणपत्र दिल्यास सर्व ओबीसी जाती संघटनेवर त्याचा परिणाम पडण्याची शक्यता आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, पण ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता त्यांना सरकारने आरक्षण बहाल करावे, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने यापूर्वी केली होती. मात्र सरकार त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी हालचाल करीत आहे, त्यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का पोहचू शकतो, यावर आता ओबीसी समाजाने जागृत व्हावे, यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे चंद्रपूर शहरात शुक्रवारी सरदार पटेल महाविद्यालय जवळील आयएमए हॉलमध्ये ओबीसी महापंचायतीचे करण्यात आले होते. या महापंचायतीमध्ये एकमताने पुढील आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात आली.
सध्या राज्यात विशेषतः मराठ्यांचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करू नये, असे ठाम मत ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी व्यक्त केले आहे.
मात्र सरसकट सर्व मराठ्यांचा समावेश ओबीसी प्रवर्गात करण्यास राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विरोध आहे. प्रसंगी त्यासाठी रस्त्यावर उतरू, असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले.
मराठा समाजास कुणवी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्याचे निमित्त करून सरसकट मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये, मराठा समाजाला कुणबी जातीचा दाखला देण्याचा निर्णय घेतल्यास कुणबी समाज ओबीसीमध्ये असल्यामुळे तेली समाजासह अन्य समाजावरदेखील हा अन्याय होणार आहे. या अन्यायाविरोधात तेली समाज रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करेल, असा इशारा विदर्भ तेली समाज महासंघाने सरकारला दिला आहे. यावेळी माजी आमदार देवराव भांडेकर, विदर्भ तेली महासंघ जिल्हा जिल्हाध्यक्ष प्रा. सूर्यकांत खनके, माजी महापौर संगीता अमृतकर, विदर्भ तेली महासंघ जिल्हा शहर अध्यक्ष गोपाल अमृतकर, विदर्भ तेली महासंघ जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष मीनाक्षी गुजरकर, विदर्भ तेली महासंघ जिल्हा कार्याध्यक्ष गोविल मेहरकरे यांची उपस्थिती होती.
मराठा समाजाने आजपर्यंत मोठे मोर्चे काढले. आता आपल्याला एकत्रित होण्याची वेळ आली आहे. ओबीसी समाजाला मोठा मोर्चा काढायचा आहे, यासाठी प्रत्येक तालुक्यात ओबीसी समाजाच्या बैठका लावा, मोर्चाचे नेतृत्व आपल्याला करायचे आहे.
मराठा समाजाच्या जालन्यात सुरू असलेल्या जरांगे पाटील यांची मागणी मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजात सामील करावे, ही मागणी चुकीची आहे. त्याचा राष्ट्रीय ओबीसी महासंघ विरोध करीत आहे.
Satyashodhak, obc, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission