नागपुर, उमरेड : शहरातील ओबीसी समाजाच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भातील निवेदन उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोमवारी (४ सप्टेंबर) पाठविण्यात आले. समाजबांधवांनी निवेदनात म्हटले की, ७२०० ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांसाठी ३६ जिल्ह्यांत ७२ वसतिगृहे सुरू करावी, स्वाधार योजनेच्या धर्तीवर आधार योजना सुरू करावी, परदेशी शिष्यवृत्ती योजनेत विद्यार्थिसंख्या वाढविण्यात यावी. या तिन्ही योजना एकाच वेळी सुरू कराव्यात त्या न केल्यास राज्यभरात भीक मांगो आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यातून जमा झालेली भीक शासनाच्या वित्त विभागाला पाठविण्यात येईल. तसेच इतरही मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. येत्या १० सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास शासनाकडे निधीची कुठलीही उणीव नाही, असे समजून १२ सप्टेंबरपासून भीक मांगो आंदोलनाला सुरुवात होईल.
या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व इतरांनाही देण्यात आल्या आहे. निवेदन देताना शिष्टमंडळात महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे विभागीय अध्यक्ष जगदीश वैद्य, माजी नगराध्यक्ष गंगाधर रेवतकर, डॉ. शंभरकर, संजय घुगूस्कर, चंद्रशेखर बावनकुळे, हरिश्चंद्र दहाघाने, अंकुश बेले, मीना दहाघाने, गीता आगासे, लता बेले, प्रवीण गिरडे, प्रभाकर बेले, श्रावण गवळी, यशवंत वंजारी, तातेराव तिमांडे, रवींद्र झाडे, मनीषा मुंगले, सोनल बालपांडे, रेखा मुळे, गणेश वासुरकर, मंगेश मेंदुले, हेमंत दांडेकर, गणपत हजारेंसह ओबीसीबांधवांचा समावेश होता.