अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर व ओबीसींचे राजकारण ! (भाग-2)

लेखकः प्रा. श्रावण देवरे

     अनेक मुद्द्यांवर मतभेद असूनही माननीय बाळासाहेब (प्रकाश) आंबेडकर हे अधून-मधून फोनवर संपर्क साधत असतात व विविध मुद्द्यांवर मनमोकळेपणाने चर्चा करीत असतात. हा त्यांचा मोठेपणा आहे! परवाच्या फोनवरील चर्चेत त्यांनी आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडला! ओबीसींच्या धर्मांतराचा!

Adv Prakash Ambedkar and Politics of OBC

     बाळासाहेब स्पष्टपणे म्हणाले की, ‘‘ओबीसी हे काही मोठ्याप्रमाणात धर्मांतर करणार नाहीत. त्यांनी आहे त्या धर्मात राहूनच आपले हक्क व अधिकार मिळवण्यासाठी संघर्षरत राहीले पाहिजे.’’ त्यांचा हा मुद्दा वास्तवाच्या कसोटीवर 100 टक्के योग्य आहे! इतिहास जर पाहिला तर फक्त हिंदू धर्मातच पुरोहितशाहीविरोधात लढण्याची परंपरा आहे. चार्वाक, फुले, शाहू, संत परंपरा, कांशिराम, सामी पेरियार अशा असंख्य महापुरूषांनी कोणतेही धर्मांतर न करता पुरोहितशाहीविरोधात संघर्ष केला व त्यात ते यशस्वीही झाले. ज्या महापुरूषांनी हिंदू धर्मातील ब्राह्मणवादाशी विद्रोह करीत नवे धर्म स्थापन केलेत ते धर्मही नंतर आपल्याच धर्मातील पुरोहितशाहीविरोधात लढू शकत नाहीत. ब्राह्मणवादाविरोधात लढणारे लढवय्ये लोक दुसर्‍या धर्मात गेलेत की, सर्वात जास्त आनंद होतो तो ब्राह्मणांना! ब्राह्मण म्हणतात, ‘‘बरे झाले! आपल्या विरोधात लढणारे दुसर्‍या धर्मात गेलेत, आता आपल्याला चरायला कुरण मोकळे!’’

     आपण पहिल्या भागात पाहिले की, ओबीसींनी कुणाला मते दिली पाहिजेत!? कॉंग्रेस, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, आप, बीआर.एस. वगैरे पक्ष आपल्या सुरूवातीच्या काळात राजकीय पायाभरणी करण्यासाठी ओबीसी कार्यकर्त्यांना तिकीटे देतात, म्हणजे बळीचा बकरा बनवतात. पायाभरणी पक्की झाल्यावर हे पक्ष जेव्हा सत्ता मिळवितात, त्यावेळी ओबीसींना बाजूला सारीत मराठा-ब्राह्मणांना तिकीटे देतात, हे पण आपण उदाहरणासहीत पाहीले.

     परंतू हे निरिक्षण ब्राह्मणवादी व प्रस्थापित पक्षांबद्दलचे आहे. पुरोगामी व फुलेशाहूआंबेडकरवादी पक्षांबद्दल काय? बहुजन समाज पक्ष (बसपा) 1985 ला स्थापन झाला. परंतू मंडल आयोग लागू झाल्यावरच यादवेतर जागृत ओबीसी कार्यकर्त्यांनी बसपाला सरळ सत्तेतच बसविले. या ओबीसी कार्यकर्त्यांना आमदारकी-खासदारकी मिळाली, मंत्रीपदेही मिळालीत, परंतू त्यांच्यातून एकही प्रभावी ओबीसी नेता निर्माण होऊ दिला नाही. प्रभावी ओबीसी नेता बनण्याच्या प्रक्रियेत शिवसेनेने भुजबळांना पक्षाबाहेर जाण्यास मजबूर करण्यात आले, त्याचप्रमाणे बसपातूनही ओबीसी नेत्यांची हकालपट्टी होत गेली. बसपात एक जरी देशव्यापी प्रभावी ओबीसी नेता निर्माण केला असता, तर आज बसपा देशव्यापी राष्ट्रीय पक्ष राहीला असता. ओबीसींचा पाठींबा निघून जाताच बसपा आज संघ-भाजपाचा ‘‘दलित सेल’’ बनून राहीला आहे.

     मंडल आयोगाच्या आंदोलनात रामविलास पास्वानजी ओबीसी नेत्यांच्या सोबत लढलेत. नंतर संघ-भाजपाच्या षडयंत्राला बळी पडत त्यांनी लालूजींच्या विरोधात स्वतंत्र पक्ष स्थापन केला. सुरूवातीला बिहारमधील यादवेतर जातींनी रामविलास पास्वानजींना पाठीबा देत राज्यस्तरीय पक्ष बनवला. यादवेतर ओबीसींच्या पाठींब्यामुळे पहिल्याच निवडणूकीत त्यांचे 35 आमदार निवडून आले होते. मात्र नंतर त्यांनीही बसपाप्रमाणेच ओबीसींची अवहेलना केल्यामुळे आज पास्वानजींचा पक्ष संघ-भाजपाचा ‘‘दलित सेल’’ बनून राहीलेला आहे. फक्त ओबीसींचेच नेतृत्व ब्राह्मणवादी कॉंग्रेस-भाजपाला खतम करू शकते, याची खात्री ब्राह्मणांना तामीळी अनुभवातून आलेली असल्याने, ओबीसी नेत्यांचे खच्चीकरण करणे हा एकमेव उद्देश घेऊन ब्राह्मणवाद्यांनी षडयंत्रे रचलीत. ब्राह्मणी छावणीने शिस्तबद्ध पद्धतीने षडयंत्र करून कांशिराम साहेबांच्या बसपाला व पास्वानजींच्या लोजपाला लालू-मुलायमविरोधात शत्रू म्हणून उभे केले. परंतू त्यावरही मात करीत लालू-मुलायमजींचे पक्ष आजही संघ-भाजापविरोधात ताठ मानेने संघर्ष करीत आहेत.

     ओबीसीविरोधात दलित नेता उभा करण्याचे ब्राह्मणी षडयंत्र तामीळनाडूत यशस्वी होऊ शकले नाही, त्यामुळे तेथील दलित, आदिवासी, मुस्लीम हे सर्वच समाजघटक ओबीसींच्या नेतृत्वाखाली संघटित आहेत. त्याचे क्रांतीकारक परिणाम आज आपण पाहात आहोत. कॉंग्रेस-भाजपा हे दोन्ही ब्राह्मणी पक्ष तामीळनाडूतून खतम झालेले आहेत. दलितांना सर्वात जास्त आरक्षण फक्त तामीळनाडूतच मिळते. दंगली घडवून आणणार्‍या ब्राह्मणवादी संघटना संघ-विश्वहिंदू परिषद-बजरंग दल वगैरे संघटना तेथे बिवार्‍यालाही सापडत नाहीत. त्यामुळे गेल्या 55 वर्षात तामीळनाडूमध्ये एकही जातीय दंगल, धार्मिक दंगल झालेली नाही. ब्राह्मण जात वगळता सर्व जाती-धर्मांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळते. जन्मजात पुरोहितशाहीच्या विरोधात कायदा करून हिंदू मंदिरातून ब्राह्मण जातीच्या पुजार्‍यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे. आता ‘सेल्फ रिस्पेक्ट मॅरेज’ हा नवा कायदा बनवून लग्न समारंभातून ब्राह्मण पुरोहित व त्याचे कर्मकांड हद्दपार करण्यात आलेले आहे. तामीळनाडूतील दलित, आदिवासी, मुस्लिम, ख्रिश्चन या सर्व समाजघटक ओबीसींच्या नेतृत्वाखाली गुण्या-गोविंदाने सत्ता भोगत आहेत व सत्तेची गोड फळे चाखत आहेत.
   
     बिहार व उत्तर प्रदेशात दलित-मुस्लिम विरोधात असतांना सुद्धा लालु-मुलायम एकेकट्याने संघ-भाजपाविरोधात जीवाची बाजी लावून लढत आहेत. लालु-मुलायमसारखे ओबीसी नेते एकट्याने लढतात तेव्हा ते भाजपाचा फक्त राजकीय पराभव करू करतात. परंतू तामीळनाडूप्रमाणे ओबीसींच्या नेतृत्वाखाली दलित+आदिवासी+मुस्लीम संघटितपणे लढलेत तर राजकीय+सामाजिक+धार्मिक+सांस्कृतिक ब्राह्मणवाद मुळातूनच उखडून फेकता येतो. तामीळनाडूचा हा क्रांतीकारक अनुभव गाठीशी ठेवून आता आपण सर्वांनी 2024 साठी भुमिका घेतली पाहिजे. बिहारचा कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला व तामीळनाडूचा स्टॅलिन फॉर्म्युला ही भुमिका घेऊन आम्ही एक पहिली पायरी चढलेलो आहोत. महाराष्ट्रातील प्रामाणिक ओबीसी कार्यकर्त्यांनी ‘‘ओबीसी राजकीय आघाडी’’ स्थापन करून काम सुरू केले आहे. त्याचप्रमाणे प्रामाणिक दलित कार्यकर्त्यांनी ‘‘दलित राजकीय आघाडी’’ किंवा ‘‘रिपब्लीकन राजकीय आघाडी’’ स्थापन केली पाहिजे. या तिन्ही आघाड्यांनी संयुक्तपणे 2024 च्या निवडणूका लढवल्यात तर निश्चितपणे आपण महाराष्ट्रात तामीळनाडूचे मॉडेल उभे करू शकतो, यात वाद नाही.       

धन्यवाद! जयजोती, जयभीम, सत्य की जय हो!!

प्रा. श्रावण देवरे, संपर्क मोबाईल- 94 227 8546  ईमेल-  s.deore2012@gmail.com

Satyashodhak, obc, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission, Republican Party of India
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209