- लेखकः प्रा. श्रावण देवरे
वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक-अध्यक्ष माननीय (बाळासाहेब) प्रकाश आंबेडकर यांनी परवा (28 ऑगस्ट 23 रोजी) फोन करून ओबीसींच्या राजकारणाची दिशा काय असावी याबाबत अत्यंत महत्वाच्या मुद्द्यांवर माझ्याशी चर्चा केली. मुद्दे अत्यंत महत्वाचे असल्याने मी हे मुद्दे समस्त ओबीसी कार्यकर्त्यांच्या समोर चर्चेला ठेवू ईच्छितो..
ओबीसींनी कुणाला मते दिली पाहिजेत, यावर बोलतांना त्यांनी पहिला निकष सांगीतला की, ‘जे पक्ष आरक्षणविरोधी आहेत, त्यांना ओबीसींनी मुळीच मते देवू नयेत, असे बाळासाहेब म्हणाले. हा मुद्दा अधिक स्पष्ट करतांना ते म्हणाले की, भाजपा हा पक्ष उघडपणे आरक्षणविरोधी आहे, त्यामुळे ओबीसींनी चुकूनही या पक्षाला मते नाही दिली पाहिजेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादी सारखे पक्ष हे श्रीमंत मराठ्यांचे पक्ष आहेत. त्यांची निर्णय प्रक्रिया व अमलबजावणीची पद्धती ही मराठा-ब्राह्मणांच्या ताब्यात आहे. त्यामुळे या सर्व प्रक्रियेत ओबीसीला कुठेही स्थान नाही. त्यामुळे हे पक्षही ओबीसींनी बाद केले पाहिजे.
दुसरा एक महत्वाचा निकष त्यांनी सांगीतला की, ‘जो पक्ष ओबीसींना 50 टक्केपेक्षाही जास्त तिकीटे देईल त्याच पक्षाला ओबीसी मते देतील, असे जाहीर केले पाहिजे.’ आता हा मुद्दा योग्यच आहे. कारण कॉंग्रेस-राष्ट्रवादीसारखे मराठा-वर्चस्वाचे पक्ष हे मराठा जातीलाच जास्त तिकीटे देतात व एक-दोन दलाल ओबीसींना तिकीटे देवून 52 टक्के ओबीसींची वोटबँक लुटतात. शिवसेना तिच्या सुरूवातीच्या राजकीय कारकिर्दीत ओबीसींना मोठ्या प्रमाणात तिकीटे देत होती, मात्र तो काळ शिवसेनेच्या पायाभरणीचा काळ होता. पायाभरणीच्या काळात पायाचे दगड होण्यासाठी ओबीसींशिवाय दुसरा कोणताही समाजघटक पात्र असू शकत नाही. पायाचा दगड होणे म्हणजे बळीचा बकरा होणे. बळीचा बकरा होण्यासाठी पात्रता लागते. विचारशक्ती नष्ट झालेली असणे, हि सर्वात मोठी पात्रता! नेतृत्वाबद्दल प्रचंड निष्ठा व भक्ती असणे ही दुसरी पात्रता! या दोन्ही कसोट्यांवर आजचाही ओबीसी मेरिटमध्ये पास होत असतो. त्यामुळे शिवसेनेच्या सुरूवातीच्या राजकीय कारकिर्दित पायाभरणीसाठी ओबीसी उमेदवार निवडणूकीत मोठ्याप्रमाणात उभे केले गेलेत व 52 टक्के ओबीसी वोटबँकेवर दरोडे टाकून शिवसेनेने आपली पायाभरणी केली.
पायाभरणी भक्कम झाल्यावर व ओबीसी वोटबँक मजबूत झाल्यावर जेव्हा निवडणूकीत आमदार-खासदार निवडून येण्याची शक्यता वाढली, तेव्हा या सर्व ओबीसींचे तिकीटे कापून तेथे मराठा व ब्राह्मण उमेदवारांना तिकीटे देण्यात आलीत. यासाठी धुळ्याचे उदाहरण प्रतिनिधिक समजले पाहिजे. उदाहरण दिल्याशिवाय आमच्या ओबीसींना ते समजतच नाही. धुळ्यात नेमके काय झाले?
मी 1972 ला शिक्षणासाठी धुळ्यात आलो तेव्हा मोठमोठ्या भिंतींवर ‘शिवसेनेचे झुंजार नेते बापू शार्दूल यांना प्रचंड मतांनी निवडून द्या’ अशा जाहिराती लिहीलेल्या दिसत होत्या. बापू शार्दूल हे विश्वकर्मा (सुतार समाजाचे) होते. 1966 ते 1969 या काळात देशभरातला ओबीसी राजकीयदृष्ट्या जागृत होण्याचा हा काळ होता. 1969 ला एकाच वेळेस तामीळनाडू, बिहार व उत्तरप्रदेश हे अत्यंत मोक्याचे व विस्तिर्ण प्रदेशांची राजकीय सत्ता ओबीसी चळवळींनी काबीज केली होती. ओबीसींचे हे वादळ महाराष्ट्रात केव्हाही येऊ शकते व मूळ धरू शकते, हे कॉंग्रेसी मराठा-ब्राह्मणांना चांगलेच ठावूक होते. फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सत्यशोधक चळवळीने केलेली मशातगत ओबीसी चळवळीसाठी पोषक होती. नेमक्या याच काळात कॉंग्रेसने शिवसेनेला जन्माला घातले. कॉंग्रेसचे मराठा वर्चस्वाचे राजकारण पाहता ओबीसींना शिवसेना हा राजकीय पर्याय वाटू लागला. निवडणूकात ओबीसींना तिकीटे देऊन त्यांच्यात नेतृत्वाची महत्वाकांक्षा निर्माण करण्यात आली. अशा असंख्य ओबीसींपैकी एक म्हणजे धुळ्याचे बापू शार्दूल होय! प्रत्येक विधानसभा व लोकसभा निवडणूकीत शिवसेनेतर्फे बापू शार्दूल उभे राहायचे.
बापू शार्दुल यांना 100 टक्के माहीत असायचे की आपण कॉंग्रेसच्या विरोधात अजिबात निवडून येणार नाहीत. परंतू तरीही केवळ शिवसेनेच्या पायाभरणीसाठी निवडणूकीत उभे राहायचे व स्वतःच्या कष्टाच्या कमाईचे पैसे व साधने वापरून निवडणूक लढवायची. निवडणूकीत डिपॉझिट जप्त झाले की, कफल्लक बनून पुन्हा आपल्या रोजच्या पोटा-पाण्याच्या व्यवसायाला लागायचे! 1985 नंतर हिंदूत्वाची पालखीही त्यांनी वाहीली. 1990 नंतर जेव्हा हिंदू विचारांची वोटबँक निर्माण झाली व शिवसेनेचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता वाढली त्यावेळी बापू शार्दूल यांचे तिकीट कापण्यात आले व ते तिकीट शिवसेनेशी काडीचाही संबंध नसलेल्या मराठा जातीच्या विजय नवले यांना देण्यात आले. 1990 नंतर अचानक अनेक ब्राह्मण व मराठा लोक शिवसेनेच्या तिकीटांवर निवडून यायला लागलीत. चूकून एखादा भुजबळांसारखा ओबीसी निवडून आला तर त्याच्या डोक्यावर मनोहर जोशीसारखा ब्राह्मण बसवायचा, जेणेकरुन तो ओबीसी नेता ‘‘ओबीसी जनतेचा नेता’’ बनता कामा नये! शिवसेनेला जन्माला घालण्याचे मुख्य कारण हेच होते की, ओबीसी जातीतून स्वतंत्रपणे ओबीसी नेते निर्माण होऊ नयेत. राजकीय महत्वाकांक्षा असलेल्या ओबीसी व्यक्तींना तिकीटे द्यायची, त्यांचे कष्टाने कमावलेले पेसे निवडणूकीत खर्च करायला लावायचे. कफल्लक झाला की, राजकारण बाजूला ठेवून पुन्हा रोजीरोटीच्या मागे धावायचं. अशा असंख्य महत्वाकांक्षी ओबीसी कार्यकर्त्यांचे जीवन उध्वस्त करण्याचे काम शिवसेनेने केले आहे. या महत्वाकांक्षी ओबीसी कार्यकर्त्यांनी त्या काळात शिवसेनेच्या नादी न लागता कर्मवीर ऍडव्होकेट जनार्दन पाटील यांच्या ओबीसी संघटनेत काम केले असते तर, तामीळनाडू, बिहार व उत्तरप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही ओबीसी पक्ष स्थापन झाला असता व हे ओबीसी सत्ताधारी झाले असते. पण असे होऊ नये म्हणूनच कॉंग्रेसी मराठा-ब्राह्मणांनी शिवसेना नावाचे षडयंत्र रचले व त्यात ओबीसींच्या ऐन उमेदीच्या पिढ्या बरबाद केल्यात!
प्रत्येक काळात नवनव्या नावाने शिवसेना सारखे पक्ष निर्माण करण्यात येतात व ओबीसींच्या पिढ्या बरबाद करण्याचे दृष्टचक्र सुरूच राहते. आता शिवसेनेचेच प्रतीरूप असलेले आप पक्ष व बी.आर.एस. पक्ष महाराष्ट्रात येत आहेत. महाराष्ट्रातल्या ब्राह्मण-मराठ्यांनी ज्याप्रमाणे भुजबळांसारखे उमदे ओबीसी नेतृत्व मातीत घालवले, त्याचप्रमाणे केजरीवाल यांनी दिल्लीतले योगेंद्र यादवांसारखे वैचारिक ओबीसी नेतृत्व मातीत घालवले आहे. आणी आता ते महाराष्ट्रात असंख्य ओबीसी कार्यकर्त्यांना उध्वस्त करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. आंध्रचे मुख्यमंत्री के.सी.आर. हे अगदी उघडपणे ओबीसी कार्यकर्त्यांना 5-10 हजार रुपयात विकत घेत आहेत.
अशा परिस्थितीत बाळासाहेब (प्रकाश) आंबेडकरांनी सांगीतलेला 50 टक्के उमेदवारीचा निकष गोंधळ निर्माण करतो, कारण केजरीवाल व केसीआर सारखे लोक आपल्या पक्षाची पायाभरणी करण्यासाठी ओबीसींना मोठ्याप्रमाणात तिकीटे देतात. म्हणून आपल्याला 2024 च्या लोकसभेच्या निवडणूकीपर्यंत काही निकष शोधावे लागणार आहेत, ते काय असु शकतात, यावर आपण या लेखाच्या दुसर्या भागात विचार करू या, तो पर्यंत जयजोती, जयभीम! सत्य की जय हो
- प्रा श्रावण देवरे, संपर्क मोबाईल- 94 227 88 546, ईमेल- s.deore2012@gmail.com
Satyashodhak, obc, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission, Republican Party of India