लेखक - प्रा. श्रावण देवरे,
माळी राजकीय मिशन या नावाने संघटनेचा एक व्हाट्सप गृप आहे. या गृपवरील अनेक कमेंट्समध्ये एक कॉमन मुद्दा तुम्हाला वारंवार वाचायला मिळेल! तो मुद्दा असा आहे की- ‘माळी समाज महाराष्ट्रात संख्येने दोन नंबर आहे, आणी तरीही माळी समाजाला राजकारणात, सत्तेत स्थान नाही, संख्येच्या प्रमाणात आमदार नाहीत व मंत्रीही नाहीत.’ या मुद्द्यावर यापूर्वीही मी अनेकवेळा लिहीले आहे व बोललो आहे. लोकशाहीत संख्येवर सत्ता मिळत असते काय? ‘’जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी’’ असे कांशीरामसाहेब म्हणाले होते. पण ते खरे आहे काय? लोकशाहीत फक्त डोकी मोजली जातात, हे खरे असले तरी या डोक्यांच्या आत कोणते विचार भरले आहेत, हेच जास्त महत्वाचे असते. तसे नसते तर साडेतीन टक्के लोकसंख्या असलेल्या ब्राह्मणांचा भाजपा पक्ष 300 खासदार घेऊन दिल्लीत सत्तेत बसला नसता व 85 टक्के लोकसंख्या असलेला बहुजनांचा ‘बहुजन समाज पक्ष’ फक्त 10 खासदारांवर राहीला नसता. 52 टक्के ओबीसींचे अनेक पक्ष देशात आहेत. लालू, मुलायम यांचे पक्ष तर शूद्ध ओबीसींचे पक्ष म्हटले जातात, मात्र या पक्षांची सत्ता दिल्लीत काय राज्यातही आता येत नाही.
सत्ता ही कोणत्याही जातीमुळे अथवा धर्मामुळे मिळत नाही, तर विचार-तत्त्वज्ञानाच्या आधारे मिळत असते. बाळ गंगाधर टिळक हे अनेक ब्राह्मण कार्यकर्त्यांना सोबत घेउन कॉंग्रेसमध्ये गेलेत. कॉंग्रेसला त्यांनी वेदांती ब्राह्मणी-हिंदू तत्वज्ञानाचा पाया दिला. शेंडी-जाणव्याचे ब्राह्मणी हिंदू तत्त्वज्ञान घेऊन त्यांनी कॉंग्रेसची स्वातंत्र्य चळवळ चालविली. या तत्त्वज्ञानाचा त्यांनी भरपूर प्रचार-प्रसार केला, त्यासाठी त्यांनी ‘गितारहस्य’ नावाचा ग्रंथ लिहीला. शेंडी जाणव्याच्या हिंदूत्वाला विरोध करणार्या सुधारकांना त्यांनी झोडपून काढले. सुधारक रानडेंच्या सामाजिक परीषदेचा मंडप रॉकेल टाकून जाळून टाकला. तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुलेंच्या सत्यशोधक चळवळीला कडाडून विरोध केला. शेंडी-जाणव्याचे ब्राह्मणी हिंदूत्व गल्ली-बोळातील लोकांच्या डोक्यात शिरले पाहिजे म्हणून गणेशोत्सव सुरू केला. टिळक व त्यांच्या शिष्यांनी प्रचंड मेहनत घेऊन हे ब्राह्मणी-हिंदूत्वाचे विचार जनतेच्या मनात बिंबवले. टिळकांच्या नंतर गांधीजी आलेत. त्यांनाही कॉंग्रेसचा नेता बनण्यासाठी शेंडी-जाणव्याचे हिंदुत्व स्वीकारावे लागले. सत्यशोधक बनलेले मराठा नेते जेव्हा कॉंग्रेसमध्ये गेलेत, तेव्हा या मराठ्यांनाही शेंडी-जाणव्याचे ब्राह्मणी हिंदूत्व स्वीकारावे लागले. कॉंग्रेसच्या ब्राह्मणी लाटेत फुले शाहू आंबेडकरी चळवळ कुठल्याकुठे वाहून गेली. या देशावर किमान 50 वर्षे कॉंग्रेसी ब्राह्मणांची एकहाती सत्ता होती. या सत्तेच्या जोरावर ते बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणूकीत पराभव करू शकलेत, 52 टक्के ओबीसींचा कालेलकर आयोग, मंडल आयोग दडपून टाकू शकलेत, ओबीसींची जनगणना बंद पाडू शकलेत, दलितांवर अनन्वीत अत्याचार बिनधास्तपणे करू शकलेत. हिंदू-मुस्लीम दंगली पेटवून मुस्लीमांचे शिरकाण करू शकलेत. इतकी मोठी प्रचंड ताकद या तत्त्वज्ञान-विचारसरणीमध्ये असते.
पण आपल्या ओबीसींना हे विचारसरणी-तत्त्वज्ञान वगैरे काही माहीत नसते. बस्स! जातीची डोकी मोजायची आणी त्याच्या आधारे सत्तेची व आरक्षणाची भीख मागायची! या देशावर 75 टक्के दलित-आदिवासी-ओबीसींची सत्ता यावी म्हणून फुलेशाहूआंबेडकरांनी विचार दिलेत. तत्त्वज्ञान दिले व चळवळही उभी केली. पण विचार-तत्त्वज्ञान सोडून आपण फक्त जातीची डोकी मोजत बसलोत. आपण ज्या महापुरूषांना आदर्श मानतो, त्या फुले-आंबेडकरांनी कधी जातींची डोकी मोजली का? त्यांनी कधी जातीची संघटना काढली का? तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांनी माळी समाज संघटना काढण्याएवजी सत्यसोधक समाज संघटना निर्माण केली. या सत्यशोधक समाजात ब्राह्मणांपासून तेली, माळी, मांग महार व मुसलमानसुद्धा सभासद होते. तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांचे शिष्य असलेल्या भालेरावांनी जातीची संघटना बांधण्याऐवजी शेतकरी संघटना बांधली, रावबहाद्दूर नारायण मेधाजी लोखंडे यांनी देशातील पहिली कामगार संघटना बांधली. तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांचे शिष्य असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महार जातीची संघटना बांधण्याऐवजी शेड्युल कास्ट फेडरेशन ही अस्पृश्य कॅटेगिरीची संघटना बांधली व स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. या सर्व संघटनांचा उपयोग त्यांनी जनतेच्या वैचारिक प्रबोधनासाठी केला. त्यांच्या या वैचारिक प्रबोधनातून त्याकाळी एक वोटबँक तयार झाली. या वोटबँकेमुळे स्वतंत्र मजूर पक्षातर्फे पहिल्याच निवडणूकीत 15 पैकी 13 आमदार निवडून आलेत. त्यात ब्राह्मण व ओबीसी जातीतूनही आमदार निवडून आले होते.
महापुरूषांचा एवढा गौरवशाली यशस्वी इतिहास असतांना आपण पुन्हा पुन्हा जातीचीच माती का खातो. जातीचाच माणूस निवडून आला पाहिजे, असा आग्रह का धरतो? आपल्या जातीचाच माणूस आपल्या जातीचं भलं करू शकतो, या अंधश्रद्धेतून बाहेर पडा, तरच तुमच्या जातीचं भलं होईल. जातीची माणसं कुर्हाडीचा दांडा ठरतात व आपल्याच जातीचे हातपाय तोडतात. जातीने मोठी केलेली माणसे स्वतःच्या स्वार्थासाठी जातीलाच खड्ड्यात घालायला मागे-पुढे पाहात नाहीत, हे अमोल कोल्हे या खासदाराने सिद्ध केले आहे. जातीच्या बाहेर पडले तरच जातीचे भले होत असते, याची बरीच ऐतिहासिक उदाहरणे तुमच्यासमोर आहेत. त्यापैकी 2-3 उदाहरणे तुम्हाला देतो-
बिहारमध्ये 1970 च्या काळात समाजवादी तत्वज्ञान स्वीकारून तेथील ओबीसी जनतेने चळवळ उभी केली. त्यातून एक मोठी वोटबँक तयार झाली. या वोटबँकेत यादव जातींची संख्या मोठी होती. जर यादव जातीने ठरविले असते तर त्याकाळात यादव जातीचाच मुख्यमंत्री झाला असता, परंतू यादव जातीने आपले मन मोठे केले आणी नाभिक जातीचे कर्पुरी ठाकूर यांना मुख्यमंत्री बनविले. या कर्पूरी ठाकूरांनी मुख्यमंत्री होताच ओबीसी आरक्षण लागू केले, ज्यात सर्वात जास्त फायदा यादवांचाच झाला. मात्र कर्पुरी ठाकूर मुख्यमंत्री झाल्यामुळे नाभिक, सुतार, लोहार, कुंभार यासारख्या सर्व छोट्या-छोट्या बारा बलुतेदार जाती ओबीसी चळवळीत आल्या व ओबीसींची वोटबँक मजबूत झाली. कर्पूरी ठाकूर दोनवेळा मुख्यमंत्री झालेत. परंतू नंतरच्या काळात यादवांनी यादव जातीचेच राजकारण सुरू केले व तेही आपल्या माळ्यांप्रमाणे ‘यादव यादव’ करू लागलेत. यादव जातीचाच मुख्यमंत्री बनवायला सुरूवात केली. त्यामुळे बाकीच्या छोट्या-छोट्या ओबीसी जाती नाराज झाल्यात, त्याचा फायदा भाजपाने घेतला. यादवांचे राज्य गेले. आता तेथे भाजपाचे राज्य आहे. उत्तरप्रदेशचेही हेच रडगाणे आहे.
त्यानंतर दुसरे उदाहरण तामिळनाडूचे आहे. 1925 साली ब्राह्मणी कॉंग्रेसला लाथ मारून स्वामी पेरीयार यांनी सर्व ब्राह्मणेतर जातींना संघटित केले. तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांचे अब्राह्मणी तत्वज्ञान स्वीकारून रामायण-महाभारताविरोधात प्रबोधन सुरू केले. या चळवळीतून पुढे ओबीसींच्या नेतृत्वाखाली डीएमके पक्ष निर्माण झाला. आज या पक्षातर्फे तेथे जो मुख्यमंत्री आहे तो गुरव जातीचा आहे. गुरव जात अल्पसंख्य आहे, मात्र तेथील बहुसंख्य ओबीसी जाती जातीयवादी राजकारण करीत नाहीत. जातीच्या बाहेर पडून इतर छोट्या जातींना मोठ्या पदावर निवडून देतात. त्याचा परिणाम असा झाला की तेथे ओबीसी वोटबॅंक मजबूत झाली आहे. तामीळनाडूमध्ये 50 टक्के ओबीसींना 50 टक्के आरक्षण आहे. त्या राज्यात लोकसभेपासून ग्रामपंचायत पर्यंतच्या सर्व निवडणूकांमध्ये 72 टक्के ओबीसीच निवडून येतात. त्यामुळे तेथे ओबीसींना निवडून येण्यासाठी कोणत्याही राजकीय आरक्षणाची गरज भासत नाही.
तिसरे उदाहरण फार महत्वाचे आहे- भाजपा हा ब्राह्मणांचा पक्ष आहे. त्यांनी ठरविले तर ब्राह्मण प्रधानमंत्री ते करू शकतात. मात्र त्यांनी जातीचा विचार न करता ओबीसी मोदींना प्रधानमंत्री पदाचा उमेदवार बनविले. त्यामुळे त्यांची वोटबँक इतकी मजबूत झाली की, भाजपाचे 300 खासदार निवडून आलेत. फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याऐवजी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यामागे त्यांचा हाच उद्देश आहे.
1917 साली मराठा जातीने जातीची संघटना ‘मराठा लीग’ स्थापन करून निवडणूका लढविण्याचे ठरविले. परंतू त्याकाळच्या काही मराठा विद्वानांनी सांगीतले की, जातीच्या राजकारणातून तुम्ही निवडून येऊ शकत नाहीत. त्याकाळचे मराठा लोक विद्वानांचे विचार मान्य करीत होते. म्हणून मराठ्यांनी जातीच्या बाहेर पडून सत्यशोधक व बहुजन बनून व्यापक राजकारण केले व सत्ताधारी झालेत. आत्ताचे मराठे विद्वानांचं ऐकत नाहीत, जातीचेच राजकारण करतात, म्हणून आज त्यांच्यावर फडणवीस पेशव्याच्या नियंत्रणाखाली काम करावे लागते आहे. जी जात आपल्या जातीतील विद्वानांचं ऐकत नाही, ती जात खड्ड्यात गेल्याशिवाय राहात नाही, असा इतिहास आहे.
आज माळी समाज तात्यासाहेब महात्मा फुलेंचे विचार मानीत नाही, तात्यासाहेबांचा फक्त फोटो लावतात. त्यामुळे कमी शिकलेले, अभ्यास नसलेले लोक निवडून येतात व तेच विद्वान बनून मार्गदर्शन करतात, खरे विद्वान लोक मात्र अडगळीत पडून राहतात. आज सर्वच ओबीसी जाती अधिकाधिक खड्ड्यात जात आहेत, या खड्ड्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला फुलेआंबेडकरी विद्वानच उपयोगी पडतील. कमी शिकलेले, अभ्यास नसलेले व मराठा-ब्राह्मणांच्या पक्षांची गुलामगिरी करणारे आमदार-खासदार तुम्हाला अजून जास्त खड्ड्यात घालतील व वरून जातीची मातीही लोटतील. बाबासाहेब आंबेडकर जातीव्यवस्थेला गटार म्हणत होते. तेव्हा जातीच्या गटारीत डुकरासारखे लोळत पडू नका, माळी माळी करू नका, जातीच्या बाहेर पडा व ओबीसी बना! उद्याचे सत्ताधारी तुम्हीच व्हाल!
लेखक- प्रा. श्रावण देवरे, संपर्क मोबाईल- 88 301 27 270, ईमेल- s.deore2012@gmail.com
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan