अमरावती - महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते तथा प्रबोधनकार, ख्यातनाम लेखक व प्रभावी संघटक प्रा. प्रेमकुमार बोके यांची संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. संभाजी ब्रिगेडच्या राज्य कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष अॅड. मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर व सर्व केंद्रीय कार्यकारिणीच्या उपस्थितीत ही नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रा. प्रेमकुमार बोके हे मागील २५ वर्षांपासून संभाजी ब्रिगेडमध्ये काम करीत आहे.
संभाजी ब्रिगेडच्या प्रत्येक घडामोडीत त्यांचा सहभाग असतो. संभाजी ब्रिगेडची आंदोलने, मोर्चे यामध्ये ते सातत्याने भाग घेत असतात. महाराष्ट्रात एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. तसेच एक लेखक म्हणून त्यांना लोकमान्यता प्राप्त झालेली आहे. त्यांच्या प्रेरणेतून अनेक लेखक तयार झालेले आहेत. तसेच विविध विषयांवर अतिशय प्रभावीपणे आपले मत व्यक्त करणारे अभ्यासू व्याख्याते म्हणून त्यांना महाराष्ट्रात ओळखले जाते. महाराष्ट्रातील विविध सामाजिक संघटना आणि संत चळवळीशी ते निगडित आहे. शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेचे प्रचारक म्हणून त्यांना ओळखले जाते.त्यांनी आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात २५०० पेक्षा जास्त व्याख्याने दिलेली आहेत. तसेच विविध विषयांवर आतापर्यंत त्यांचे चार हजारपेक्षा जास्त लेख प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झालेली असून आणखी पाच पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहे. अशाप्रकारे अनेक क्षेत्रात अभ्यास असलेल्या व सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळलेल्या व्यक्तिमत्त्वाची संभाजी ब्रिगेडच्या राज्य प्रवक्तेपदी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.