सोमनाथ कन्न (मराठवाडा)
गावगाड्याबद्दल वाटणारं अप्रूप मला दिवसेंदिवस कमी होत गेलं. गावगाडा गोंडस दिसत असला तरी तो असंख्य लोकांच्या रक्तावर पोसलेला आहे हे लक्षात येत गेलं. शोषणाच्या संस्कृतीचे शेवटचे अवशेष गावगाड्यानेच जपले. शहरं त्या मानाने लय दिलदार असतात. गावाबद्दल उगं रोमँटिक लिहणारे कवी आणि लेखक लोकं तद्दन भामटे असतात. कारण गावगाडा मांडताना ते आम्हा पाटलांच्या घरांमध्ये देवळीत ठेवलेला फुटक्या बाळीचा कप, आणि सालगडी माणसांची वेगळी ताटं आणि ग्लास कधीच मांडत नाहीत. आमच्या गढ्या आणि वाड्यांच्या मोठमोठाल्या मातीच्या भिंती उभारायला अख्खा महारवाडा
जनावरांसारखा राबला.
रेड्याच्या पाठीवर लादलेल्या पखालीतून पाणी वाहून कैक माणसांचे पाय वाकडे झाले. आमच्या माड्यांचे अवजड नक्षीदार खांब बनवण्यासाठी लागणारे लाकडं डोंगरातून खांद्यावर वाहून आणल्याने कित्येक खांद्यांना मरणांतिक कळ लागली असेल. आम्ही त्याच्या बदल्यात माणशी शेरभर ज्वारी दिली आणि मोकळे झालो.
आजपर्यंत शाबूत असलेल्या आमच्या डौलदार माड्या आणि तिच्यावरून दिसणारे कुडाचे, छपराचे महारवाडे पाहत आलो. आता महारवाड्यांचे बौद्धवाडे झाले. कुडाची घरं जाऊन पक्की घरं आली. वेगळा असलेला बौद्धवाडा गावात मिसळून गेलेला दिसतो, ते पाहिलं की मनातला गिल्ट ( अपराधिक भावना) काही अंशी कमी होते आणि म्हणून डॉ. बाबासाहेबांच्या पायाला घट्ट मिठी मारावी वाटते.
मोठमोठे झाडं आणि दगड उकरून याच महारवाड्यातल्या माणसांनी आमचे शेकडो एकरांचे मळे तळहातासारखे सपाट आणि सुपीक तयार करून दिले. त्याबदल्यात आम्ही त्यांना डाळींचा चुरा, अन कळणा कोंडा खायला दिला. हे कुणीच मांडलं नाही. पन्नासेक जनावरांच्या, म्हशींच्या शेणाच्या पाट्या वाहून त्यांच्या टाळूचे केस गेले. वासरांनी पायावर पाय देऊन अनेकदा रक्ताचे बरबुडे आले, नखं उचकटली. त्याबदल्यात फक्त तपिलं भरून ताक देऊन आम्ही पाटीलकी दाखवत त्यांची बोळवण केली. ते सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं की मरून मेल्यासारखं वाटतं. आज ते सगळं आठवून बाबासाहेबांच्या पायाला घट्ट मिठी मारावी वाटते.
बाबासाहेबांनी दलितांना माणसात आणलं हे फार चुकीचं वाक्य आहे. बाबासाहेबांनी दलितांना नाही, त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या सवर्णांना माणसात आणलं. दलित माणसंच होते. आम्ही माणसासारखं वागत नव्हतो. त्यामुळे बाबासाहेबांचं ऋण आमच्या कातडीचा जोडा शिवूनही फिटणार नाही. कारण दलितांना आमच्यापासन वेगळं केलं नसतं तर आम्ही अजूनही त्यांचं रक्त शोषतच राहिलो असतो. म्हणून वाटतं सगळा भम्पक माज बाजूला ठेऊन बाबासाहेबांना घट्ट मिठी मारावी. लै जुना काळ नाही, गावातल्या शाळेत बौद्धवाड्यातल्या पोरांची रांग वेगळी बसत होती. म्हणजे तसं कॅम्पलेशन नव्हतं. पण सामाजिक कंपूबाजपणा आणि हजारो वषांची डीएनएच्या जीनमध्ये रुजलेली / ठासून भरलेली शिकवण नकळत आपली विकृती दाखवायची. चौथीच्या मराठीच्या पुस्तकातल्या बाबासाहेबांच्या चित्राला पेनाने चित्र विचित्र मिशा काढून विद्रूप करायचो. आज ते हटकून आठवतं. अपराधी वाटतं आणि त्याचं प्रायश्चित्त म्हणून बाबासाहेबांच्या पायाला घट्ट मिठी मारावी वाटते.
जवळच्या निमशहरात शिकायला होतो. एक कार येऊन गल्लीत उभी राहिली. त्यातले माणसं उतरून कुणाच्यातरी घरात जातात. कारच्या मागच्या काचेवर 'भीमा तुझ्या जन्मामुळे' लिहलेलं. आमच्यातला एक थोडा प्रौढ मुलगा गेला आणि खाली त्या धूळ बसलेल्या काचेवर लिहून आला. 'आम्ही माजलो' आज ते सगळं आठवलं की वाटतं बाबासाहेबांनी आपल्यापर्यंत पोहोचायला किती उशीर केला. नंतर कळत आपणच त्यांच्याजवळ जायला उशीर केला. शेवटी अपराधी फील झाल्यावर पुन्हा बाबासाहेबांच्या पायाला घट्ट मिठी मारावी वाटते. वर्णव्यवस्थेचं खापर ब्राम्हणांवर फोडून मोकळे होणारे आम्ही खरे लबाड होतो. व्यवस्था ब्रम्हणांनी तयार केली असली तरी ती आम्ही उपभोगली, राबवली. कधी कोणता ब्राह्मण गावात अस्पृश्यता किंवा जातिव्यवस्था राबवण्याचं ट्रेनिंग द्यायला आल्याचं आठवत नाही. पण आज त्यांच्यावर सगळे आरोप ढकलून आम्ही सेफ झोनमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. सगळं सगळं साफ समोर दिसतं. पूर्णपणे गंडलोय आम्ही. दिशा दाखवणारे, आम्हाला माणसात आणणारे बाबासाहेब समजून घ्यायला आम्ही उशीर केला. आता समजून घेतोय. बाबासाहेबांचं बोट धरून एक एक पाऊल टाकतोय. माणसात येण्याची प्रक्रिया किचकट असते, हळूहळू प्रयत्न सुरू आहे. भारी फील असतो हा...म्हणून बाबासाहेबांना घट्ट मिठी मारावी वाटते.....
....कारण आम्ही खातो त्या भाकरीवरबी बाबासाहेबांची सही आहे रं...!!
सोमनाथ कन्न (मराठवाडा)
Satyashodhak, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan