अमळनेर : शहरात ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी सर्वसामान्य शेतकरी, श्रमिक, महिला, दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय अशा एकूण बहुजन समाजाच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीला मुक्त विचारपीठ उपलब्ध करून देणारे १८वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन होईल, अशी माहिती विद्रोही साहित्य व सांस्कृतिक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी धनदाई महाविद्यालयातील यशवंत सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
याप्रसंगी मंचावर युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार, ज्येष्ठ विद्रोही साहित्य व सांस्कृतिक परिषदेचे मन्साराम पवार, एल. जे. गावित, नगरसेवक घनश्याम पाटील यांच्यासह विद्रोही साहित्य व सांस्कृतिक परिषद महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी उपस्थित होते. प्रा. प्रतिमा परदेशी म्हणाल्या की, समाजात होणाऱ्या विषमतावादी व सामाजिक न्याय डावलणाऱ्या घटनांवर 'ब्र' शब्द न काढता चंगळवादी संस्कृतीचा पुरस्कार करत मनोरंजन प्रधान स्वरूपाला आमचा विरोध आहे. हा विरोध महात्मा ज्योतिराव फुले यांनी ग्रंथकार सभेस पाठवलेल्या पत्रावर आधारित असून हे पत्र हाच विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचा जाहीरनामा असेल, असे त्या म्हणाल्या. अमळनेरची भूमी ही पुरोगामी विचारांचा वारसा सांगणारी भूमी आहे. येथे साने गुरुजींसारखे शेतकरी व कष्टकऱ्यांची भावना आपल्या साहित्यातून मांडणारे व कामगारांची आंदोलने उभी करणारे लेखक होऊन गेले. क्रांतिसिंह उत्तमराव पाटील, क्रांतीवीरांगणा लिलाताई पाटील यांची ही क्रांती भूमी आहे. शाहीर साबळेंसारख्या शाहिरांची जडणघडण या मातीत झाली आहे. हा वारसा आपल्या जीवनात घेऊन वावरणारे अमळनेरवासी हे १८वे विद्रोही साहित्य संमेलन यशस्वी करतील, याची खात्री असल्याचे अध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी यांनी या वेळी सांगितले. तर अमळनेरकर विद्रोही साहित्य संमेलनाचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत, असे सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी आभार मानतांना सांगितले.
अमळनेरच्या विविध सामाजिक कार्यकर्त्यांची १५ जुलैला यशवंत सभागृह बैठक झाली. यात अमळनेर येथे १८वे विद्रोही साहित्य संमेलन घेण्याचे निश्चित करण्यात आले. या बैठकीस विद्रोही साहित्य व सांस्कृतिक परिषदेच्या राज्य अध्यक्षा प्रा प्रतिमा परदेशी, संघटक किशोर ढमाळे, उपाध्यक्ष अर्जुन बागुल, धनदाई एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. डी. डी. पाटील, युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार आदी उपस्थित होते. या बैठकीत लेखक व प्रकाशक प्रा. गौतम निकम, शेतकरी कार्यकर्ते अरुण देशमुख, नगरसेवक श्याम पाटील, अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे, निवृत्त विस्ताराधिकारी अशोक बिन्हाडे, डी. ए. पाटील, प्रा. डॉ. राहुल निकम, अजिंक्य चिखलोदकर, गौतम सपकाळे, अजय भामरे, संजय सूर्यवंशी, प्रेमराज पवार यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. अशोक पवार यांनी अमळनेरकर विद्रोही संमेलन यशस्वी करतील, असे सांगितले. याप्रसंगी बापूराव ठाकरे यांनी संमेलनासाठी ११ हजार रुपये दिले. या वेळी विविध सामाजिक चळवळीतील सव्वाशेहून अधिक कार्यकर्ते हजर होते.
या संमेलनानिमित अमळनेरकरांना सांस्कृतिक मिरवणूक, कवी कट्टा, गझल कट्टा, शाहिरी काव्य यासह कथा, कादंबरी, वैचारिक साहित्य, कला व सांस्कृतिक प्रदर्शन यासह विविध साहित्यिक उपक्रमांची मेजवानी उपलब्ध होणार आहे, असे राज्य संघटक किशोर ढमाले यांनी सांगितले. साने गुरुजींच्या खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे या प्रार्थनेतील विचारानुसार हे संमेलन सामाजिक सौहार्द, बंधुभाव, सहकार्य यास समर्पित असेल, हे या संमेलनाचे वैशिष्ट्य असेल. महान साहित्यिक बाबुराव बागुल, आदिवासी साहित्यिक वाहरू सोनवणे, डॉ. यशवंत मनोहर, अजिज नदाफ, आत्माराम राठोड, कॉ. तारा रेड्डी, तुळशी परब, डॉ. आ. ह. साळुंखे, उर्मिला पवार, संजय पवार, जयंत पवार, डॉ. श्रीराम गुंदेकर, विमल मोरे, डॉ. प्रतिभा अहिरे, चंद्रकांत वानखेडे अशा अनेक दिग्गज साहित्यिकांनी विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आजवर भूषवल्याचे प्रास्ताविकात प्रा. डॉ. लीलाधर पाटील यांनी सांगितले.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan