- अनुज हुलके
चातुर्वर्ण व्यवस्थेने चार वर्ण तयार केले. चौथा वर्ण शुद्र.जाती उतरंडीत शुद्रांना निम्न स्तरावर बंदिस्त केले. ओबीसी प्रवर्गात मागास-शुद्र जाती येतात. एखाद्या जागेवर त्यांनी एकत्र येऊन एखादा कार्यक्रम घेतला की ती जागा बाटली, अपवित्र झाली असं मानून गोमूत्र शिंपडून पवित्र केली जाते, हा ओबीसीचा धडधडीत अपमान आहे. ओबीसीसह मागासलेल्या जातींना निच समजणे होय. ओबीसीचे मत चालते, ओबीसीची मतं झोळीत पडावी म्हणून राज्याचे पक्षाध्यक्ष ओबीसी हवे असतात. शेतकरी-ओबीसी शेती करून धान्य पिकवतात, ते अन्नधान्य भाजीपाला दही दूध तूप चालते. मात्र ओबीसी आपल्या न्याय्य हक्कासाठी एकत्र आलेले का चालत नाही? मनुस्मृतीच्या नवव्या अध्यायात
'प्रजापतिर्हि वैश्याय सृष्टीवर परिददे पशून् | ब्राम्हणाय च राज्ञे च सर्वाः परिददे प्रजा:( ओवी ३२६)
अर्थात,प्रजापती ने पशु निर्मिती करून तीण विश्वास दिली आणि इतर प्रजा (शुद्र,वैश्य) हे निर्माण करुन त्यांच्यावर ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचे स्वामित्व प्रस्थापित केले.' अशा प्रकारे ब्राम्हणेतरांना गुलाम करणारे विचार लादलेले आहे.
ओबीसी शिक्षण, राजकारण, नोकऱ्या, उद्योग, व्यापार इ. क्षेत्रात पुढे जाणे म्हणजे, उच्चजात प्रस्थापितांना एकप्रकारे आव्हान ठरते. म्हणून ओबीसींना मागे ठेवण्यासाठी, ओबीसीचा आत्मविश्वास खाली खेचण्यासाठी ओबीसीला अपमानित केले जाते. यावरुन ओबीसीला ओबीसी आरक्षण असल्याविना त्यांच्या वाट्याला येणारी लोकसंख्येच्या प्रमाणात सर्व क्षेत्रात सत्ता व राजकीय, प्रशासकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, न्यायिक, धार्मिक, कला-साहित्य,प्रसार माध्यमे यांमध्ये सहभागाविना न्याय्य वागणूक मिळू शकणार नाही, याची खात्री पटते. नागपूर येथील वज्रमूठ सभेतील बहुतांश नेते ओबीसी मराठा आदि मागास ब्राम्हणेतर आहेत.अनेक नेते धूर्त, चाणाक्ष,मातब्बर, मुरब्बी,पारंगत राजकारणी आहेत. तरी त्यांना त्यांच्या शुद्रजातीमुळे असे अपमानित व्हावे लागते. ही जातीद्वेषावर आधारित मानसिकता समाजाचं वास्तव आहे. सद्यस्थितीत सर्वाधिक गरिब आणि हतबल हवालदिल ओबीसी समाज आहे. शेतीव्यवसायाशी निगडित देशाचा पोशिंदा समजण्यात येणारा हा समाज अत्यंत दयनीय असुरक्षित अपमानास्पद अवस्थेत आहे. सबब ओबीसीला सर्व क्षेत्रात न्याय्य वाटा मिळाला पाहिजे म्हणून ओबीसीचे जातीनीहाय जनगणना आंदोलन पेटले आहे. त्या आंदोलनात ओबीसी विरोधक भस्म होतील,या भयास्तव ओबीसीला अपमानित- प्रताडित केले जात आहे. तुलसीदास रचित रामचरित मानस सांगते, 'ढोल, गंवार, शुद्र, पशु, नारी,सकल ताडना के अधिकारी' या दंडकाने आणि धर्मशास्त्राच्या न्यायाने ओबीसीला अपवित्र ठरवून ते एकत्रित झालेल्या जागेवर गोमूत्र सिंपडून ती जागा पवित्र केली जाते. गाईचं गोमूत्र किती पवित्र! आणि ओबीसी अपवित्र?
आणि मग गोमूत्र शिंपडणाऱ्यांच्या कळपात घुसलेले कसे पवित्र होतात. त्याठिकाणी वज्रमूठ सभेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील प्रमुख ब्राम्हणेतर राजकीय धुरीण एकवटलेले असताना सभेची जागा अपवित्र झाल्याच्या गमजा मारत पुन्हा एकदा महाराष्ट्रात कलंकित घटनांची पुनरावृत्ती तर पेशवाईची वंशवेल करु पहात नाही?
खरंतर ही उच्चनीच मानसिकता वर्णव्यवस्थेने दृढ केलेली आहे. पिढ्यानपिढ्या ती टिकवण्याचे, जिवंत ठेवण्याचं काम जातसमर्थक उच्चजातींनी कसोशीने केले. संत तुकाराम महाराजांचे विद्रोही संतत्व जेव्हा सामान्य माणसाची चेतना बनू पाहते तत्क्षणी तुकारामांना शुद्रांना धर्मशास्त्राची चिकित्सा करण्याचा अधिकार नाही म्हणून सनातनी कंपू कडून ताकिद दिली जाते. त्याच मानसिकतेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला आव्हान दिले जाते. गागाभट्टास पाचारण करुन शिवाजी महाराजांना दुसरा राज्याभिषेक करून छत्रपती पदाला अधिमान्यता मिळवून घ्यावा लागते. तर
'धर्मेप्सवस्तु धर्म ज्ञा: सतां वृत्तमनुष्ठिता:| मन्त्रवर्ज्यं न दुष्यन्ति द्रशंसा प्राण्नुवन्ति च | (ओवी १२६, मनुस्मृती, वे.शा.सं. पंडित रामचंद्रशास्त्री अंबादास जोशी,प्रकाशक-श्री ध. ह. सुरळकर,श्री गुरुदेव प्रकाशन, ७ रविवार पेठ,पुणे २)
अर्थात,धर्मकार्य करु इच्छिणाऱ्या धर्मज्ञ शुद्रांना पंचमहायज्ञादि करावे. वैदिक मंत्र म्हणू नये. यामुळे त्यांची लोकात कीर्ती पसरते. या धर्माज्ञेच्या आधारे, छत्रपती शाहू महाराजांना तुम्ही शुद्र आहात म्हणून वेदोक्त मंत्रोच्चार करण्याचा अधिकार नाही असा पुरोहितशाहीने कांगावा केला. शाहू महाराजांच्या काळातील वेदोक्त प्रकरण महाराष्ट्राच्या मस्तकावरील पुरोगामीत्वाला प्रश्नांकित करु लागते. असे कितीतरी दाखले मिळतील ज्यातून जातीय अहंकारातून आजही शुद्रातिशुद्रांना निच समजले जाते. मात्र त्यांच्या कच्छपी लागलेले राजकीय हितस्वार्थाकरिता अशा कृत्यांचा निषेध करण्याऐवजी पक्षीय राजकारणाच्या आडून एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या राजकीय भूमिकेतून समर्थन करताना दिसतात. ही अतिशय खेदाची बाब आहे. वास्तविक पाहता भारतीय राजकारणात शुद्र जातींना किंवा नेतृत्वाला अजूनही राष्ट्रीय नेता मानायला प्रसारमाध्यमे आणि राजकीय पक्ष तयार नाहीत. शुद्रातिशुद्र नेते अर्थातच ओबीसी-ब्राम्हणेतर आणि त्यांचे राजकीय पक्ष हे दुय्यम तिय्यम समजून मुख्य राजकीय प्रवाहाच्या बाहेर कसे फेकता येईल याकडे अधिक कटाक्ष असतो. आणि म्हणून राजकीय व्यवस्थेत बदल होण्यासाठी सामाजिक बदलाची पूर्वअट मान्य करणे अपरिहार्य ठरते. सामाजिक न्यायाशिवाय समता, स्वातंत्र्य, बंधुत्व प्रदान करणारी लोकशाही राज्यव्यवस्था वांझोटी ठरते. सद्यस्थितीत तर सत्तांतरणासाठी राजकीय पक्षांच्या हालचाली चालू असताना सत्ताधारी राजकीय शक्तीस पराभूत करण्यासाठी यादृष्टीने विचार करण्याची गरज आहे. शुद्रांना अपवित्र समजून गोमूत्र शिंपडून हिन लेखणाऱ्या विचाराशी हा संघर्ष असेल त्यासाठी फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा राजकीय लढ्यासाठी अंगिकारणे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे ठरेल. ओबीसी - बहुजनांना हीन समजून, गायीच्या गोमुत्रापेक्षाही हीन समजून वज्रमूठ सभेची जागा शुद्ध करणे ही केवळ राजकीय बाब राहत नाही, तर ती मानवामानवांमध्ये भेद मानण्याची तुच्छ मानसिकता प्रदर्शित करते. अशा अमानवीय प्रवृत्तीचे उच्चजात समूह समाज व्यवस्थेतील आपली श्रेष्ठत्वाची एकाधिकारशाही शाबूत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे उद्योग निरंतर चालू ठेवतात. आपले कुटील डाव समजले तर लोक आपल्यावर चवताळून येतील अशी या गोमूत्र प्रेमींना भिती वाटू नये? ब्राम्हणेतरांना कितीही तुच्छ वागणूक दिली तरी आपलं कोणीच काही बिघडवू शकत नाही, हा दर्प उच्चजात अहंकारी मानसिकतेतून आलेला आहे तोच अशा कुरापती करण्यासाठी जात समर्थकांना उद्युक्त करत राहिलेला आहे.
आता जातिभेद उरले नाहीत. जातीजातीत रोटीबेटी व्यवहार होतात, त्यावरील बंधनं सैल झालेली आहेत, मिश्रजाती विवाहसंबंध जुळू लागले आहेत, कित्येक ब्राम्हणही आता पुरोगामी होऊ लागले आहेत, असे समजणाऱ्या भाबड्या ओबीसी भावंडानो ! ओबीसीचा विटाळ घालवण्यासाठी मारलेली गोमूत्राची पवित्र मेख समजून घ्यावी लागेल.
- अनुज हुलके