डॉ. अशोक चोपडे
मोतीराम वानखडे १९११ च्या पुणे येथील पहिल्या सत्यशोधक समाजाच्या परिषदेचे जनरल सेक्रेटरी होते. सत्यशोधक समाज परिषद, ब्राह्मणेतर काँग्रेस, प्रांतिक परिषदा, महात्मा फुले पुण्यतिथी उत्सव, ब्राह्मणेतर साहित्य प्रदर्शनाशी त्यांचा जवळचा संबंध होता. त्यांच्या आयोजन- नियोजनातून अशा कार्यक्रमांची यशस्विता झालेली होती. 'क्षत्रिय माळी पुढारी' मासिकाचे ते संपादक होते. करजगावात 'सत्योदय' नावाचे मासिक ते काढत. याच नावाचा छापखाना त्यांनी उभारला होता. सत्यशोधक ग्रंथमाला, सत्यशोधक साहित्याचे प्रचारक-वितरक लेखक म्हणूनही ते प्रसिद्ध होते. मालनबाई वानखडे त्यांच्या पत्नी होत्या. स्त्रियांना संघटित करण्यात त्यांचा पुढाकार होता.
वानखडे यांच्या नावावर १७ पुस्तके आहेत. 'स्वयंपुरोहित' पुस्तकाच्या १९०९ पासून ते १९५३ पर्यंत १२ आवृत्त्या निघाल्या. एकोणवीस वर्षांत २४ हजार प्रती विकल्या गेल्या. हा त्या काळातील पुस्तक विक्रीचा विक्रमच होता. 'स्वयंपुरोहित' पुस्तकाची प्रेरणा 'सत्य तोचि धर्म, सत्य तोचि नेम, सत्यासुखी नामा सर्वकाळ' हे तत्त्व आहे. सदर पुस्तकात विविध संदर्भाचा दाखला देऊन मांडणी केली आहे. संत तुकाराम, रामदास तसेच तैतरीय ब्राह्मण, वेदांताचा आधार घेऊन, वेदोक्त पुराणोक्त मंत्र व त्याचा आशय स्पष्ट केला आहे. वर्तमानातील त्याच्या उपयोगितेची चर्चा सत्य व विवेकाच्या आधारे वानखडे करतात. भवसागरातून मुक्त व्हायचे असेल, अखंड शांतीसुख भोगायची असेल तर सत्यशोधक होऊन सत्याचा शोध घेण्याचे आवाहन वानखडे करतात. वानखडे संस्कृतऐवजी मराठीचा आग्रह धरतात. त्यामुळे सामान्यजनांची अडचण होणार नाही, असे त्यांना वाटते. पुस्तकाच्या दहाव्या प्रकरणात त्यांनी सत्यशोधक मतांप्रमाणे धर्मविधी करावे, असे म्हटले आहे. पुरोहित, भाषा, विधी, पुरोहित कायदा व सत्यशोधक समाज याबद्दलचा विचार आणि वेदोक्त मंत्राबद्दलचे स्पष्टीकरण मुद्दाम दिले आहे.
'स्वयंपुरोहित' खरंतर सत्यशोधक समाजाचे एक तत्त्व आहे. जोतीराव फुले व त्यांच्या तत्कालीन सहकाऱ्यांनी या तत्त्वाचा जोरदार प्रचार-प्रसार केला. प्रसंगी मोठा संघर्षही केला. न्यायालयीन प्रकरणांना सामोरे गेले. त्यात विजयही प्राप्त केला. परंतु कधीही वेदोक्ताच्या आणि क्षत्रियत्वाच्या जाळ्यात ते अडकले नाही. वेदोक्त-पुराणोक्ताची चर्चा आणि प्रभाव १९२० साली छत्रपती शाहू महाराजांनी 'छात्र जगद्गुरूपीठाची' स्थापना केल्यानंतर अनेक सत्यशोधक, कार्यकर्ते या प्रभावात आले. यात जातीगत संघटनांचाही मोठा सहभाग होता. यापासून सावध राहण्याचा सल्ला अय्यावारू यांनी जसा १९११ साली दिला होता; त्याचप्रमाणे 'दीनमित्रकार' मुकुंदराव पाटील व भास्करराव जाधव यांनी प्रत्यक्षात छत्रपती शाहू महाराजांच्या या निर्णयाला विरोध केला.
१९१२ सालच्या नाशिक येथील दुसऱ्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्ष डॉ. संतूजी लाड यांनी सत्यशोधक लेखकांच्या वेदोक्त पुराणोक्त प्रेमावर आणि त्याचा 'स्वयंपुरोहित' सारख्या लोककल्याणकारक चळवळीवर होणारा परिणाम रोखण्यासाठी सत्यशोधक समाजाने सत्यशोधक संस्काराचे निराळे पुस्तक प्रसिद्ध करण्याचे आवाहन केले होते. 'वेदोक्त-पुराणोक्त' पूजापद्धती स्वीकारण्याची हाव आम्ही सोडून दिली पाहिजे.
Satyashodhak, obc, Mahatma phule, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, Bahujan