पुणे, ता. ६ : पुण्याची लोकसभा पोटनिवडणूक झाल्यास ती लढविण्याचा निर्धार 'ओबीसी राजकीय आघाडी'चे संस्थापक अध्यक्ष प्रा. श्रावण देवरे यांनी व्यक्त केला. मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, “२२ ओबीसी संघटनांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केला आहे. आजवर सर्वच राजकीय पक्षांनी खोटी आश्वासने देऊन ओबीसींच्या तोंडाला पाने पुसली आहेत." पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सर्व ओबीसी संघटनांनी आमच्यासोबत यावे, असे आवाहन त्यांनी केले. ओबीसी जनगणना व जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा राजकीय अजेंड्यावर आल्याशिवाय तो सुटणार नाही. त्यासाठी 'ओबीसीं'नी आपली स्वतंत्र राजकीय आघाडी स्थापन करून निवडणुकीत आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले पाहिजेत, असा निर्णय ओबीसी बैठकीत झाल्याचे त्यांनी सांगितले. “मराठा समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने नाकारले असून यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने २९ मे रोजी काढलेला अध्यादेश म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे," असे सांगून प्रा. देवरे यांनी अध्यादेशाची प्रत फाडून निषेध नोंदविला.
Satyashodhak, obc, Mahatma phule, Bahujan, Mandal commission