नागपूर, ता. १३ : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आठवे महाअधिवेशन आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. ७ ऑगस्ट रोजी श्री वेंकटेश्वरा युनिव्हर्सिटी स्टेडियम तिरुपती येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे महाअधिवेशन होईल.
१३ रोजी विजयवाडा येथे झालेल्या भेटीत त्यांनी निमंत्रण स्विकारले आहे. त्यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मार्गदर्शक माजी न्यायमूर्ती इश्वरेया, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, बिसी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास जाजूला, आंध्रप्रदेश बिसी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष केसंना शंकरराव, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, प्रा. अनिल शिंदे, क्रांतिकुमार, अॅड. किशोर विक्रम गौड आदी उपस्थित होते. व्ही. पी सिंग यांनी ७ ऑगस्ट १९९० मंडल आयोग लागू केला होता. या दिवसाची आठवण म्हणून या तारखेला दरवर्षी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन देशाच्या विविध राज्यात आयोजित केल्या जाते.
यामध्ये समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधून त्या पूर्ण करण्याकरिता सतत पाठपुरावा केला जातो. या अधिवेशनात जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, केंद्रात स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे, क्रीमीलेरची मर्यादा मागील सहा वर्षा पासून वाढली नसून ती वाढविण्यात यावी, ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढविण्यात यावी आदी मागण्या मंजूर करवून घेण्यासाठी चर्चा होणार आहे. त्यासाठी ठराव पारित करून केंद्र सरकारला ते पूर्ण करण्यासाठी सादर केले जाणार आहे.
Satyashodhak, obc, Bahujan, Mandal commission