जत दि. १५ जुलै २०२३ - नामदेव महाराज यांचा जन्म २६ ऑक्टोबर १२७० नरसी येथे झाला. नामदेव महाराज महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी व्रज भाषांमध्येही काव्ये रचली. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबातले चरित्रकार, आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. त्यामुळे पंजाबी मंडळी तसेच संबंधित मंडळी आज त्यांच्या जन्मस्थानाचा, नरसी नामदेव या गावाचा विकास करीत आहेत. नरसी नामदेव हे गांव महाराष्ट्रातील मराठवाड्यामधील हिंगोली जिल्ह्यातील असून तेथील संत नामदेव महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार २०१९ला झाला.
वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होत. आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती. संत नामदेव प्रत्यक्ष श्रीविठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता, असे मानले जाते. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी त्या बाबतीत भावनिक एकात्मता साधली. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले.
दामाशेट्टी हे संत नामदेवांचे वडील व गोणाई त्यांची माता होती. दामाशेटींचा व्यवसाय कपडे शिवणे हा होता. म्हणजे ते शिंपी होते. यांच्या अगोदरच्या सातव्या पिढीतील पुरुष यदुशेट हे सात्त्विक प्रवृत्तीचे भगवद्भक्त होते. सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी म्हणजेच नरसी नामदेव हे संत नामदेवांचे जन्म गाव होय. नामदेवांचा जन्म प्रभव नाम संवत्सरात, शके ११९२ इ.स.१२७० मध्ये कार्तिक शुद्ध एकादशीस, रोहिणी नक्षत्रास, रविवारी झाला. संत नामदेवांना ८० वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांचे बालपण हे पंढरपुरात गेले. त्यांनी लहानपणापासूनच श्रीविठ्ठलाची अनन्यसाधारण भक्ती केली.
संत गोरा कुंभार यांच्याकडे, तेरढोकी येथे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई, संत नामदेव, चोखामेळा, विसोबा खेचर आदी संतांचा मेळा जमला होता. याच प्रसंगी संत ज्ञानेश्वरांच्या विनंतीवरून गोरोबाकाकांनी उपस्थितांच्या आध्यात्मिक तयारीविषयी आपले मतप्रदर्शन केले होते. या प्रसंगानंतरच संत नामदेवांना विसोबा खेचर हे आध्यात्मिक गुरू म्हणून लाभले. पत्नी राजाई, मोठी बहीण आऊबाई; नारा, विठा, गोंदा, महादा हे त्यांचे चार पुत्र व एक मुलगी लिंबाई असा संत नामदेवांचा परिवार होता. त्यांच्या कुटुंबात एकूण पंधरा माणसे होती. स्वतःला ‘नामयाची दासी’ असे म्हणणाऱ्या संत जनाबाई या त्यांच्या परिवारातील एक सदस्य होत्या.
संत नामदेवाची अभंगगाथा प्रसिद्ध आहे. त्यांनी शौरसेनी भाषेत काही अभंग रचना केली. त्यातील सुमारे बासष्ट अभंग नामदेवजीकी मुखबानी शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत. संत नामदेवांनी आदि, समाधी व तीर्थावळी किंवा तीर्थावली या गाथंतील तीन अध्यायांतून संत ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगितले आहे.
कीर्तनांत अनेक चांगल्या ग्रंथांचा उल्लेख असे. यावरून ते बहुश्रुत व अभ्यासू असल्याचे लक्षात येते. ‘नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग’- अशी त्यांची योग्यता होती. ’नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते.
भागवत धर्माचे एक आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे ५० वर्षे भागवतधर्माचा प्रचार केला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले. पंजाबमधील शीख बांधवांना ते आपले वाटतात. शीख बांधव ‘नामदेव बाबा’ म्हणून त्यांचे गुणगान गातात. पंजाबातील ‘शबदकीर्तन’ व महाराष्ट्रातील ‘वारकरी कीर्तन’ यांत विलक्षण साम्य आहे. घुमान (पंजाब) येथे शीख बांधवांनी त्यांचे मंदिर उभारले आहे. बहोरदास, लढ्विष्णूस्वामी, केशव कलाधारी हे त्यांचे पंजाबी शिष्य होत. राजस्थानातील शीख बांधवांनीही नामदेवाची मंदिरे उभारलेली आहेत. `संत शिरोमणी' असे यथार्थ संबोधन त्यांच्याबद्दल वापरले जाते.
भगवद्भक्तांच्या व साधु-संतांच्या चरण धुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी "पायरीचा दगड" होण्यात त्यांनी धन्यता मानली. संत नामदेव हे आषाढ वद्य त्रयोदशी, शके १२७२ मध्ये (शनिवारी, दि. ३ जुलै, १३५० रोजी) पंढरपूर येथे पांडुरंगचरणी विलीन झाले. नक्की दिनांकाविषयी एकवाक्यता दिसून येत नाही. संत नामदेव हे कीर्तने करत करत भारतभर फिरले. सर्व भारतभर संत नामदेव महाराज यांची मंदिरे आहेत.
संत नामदेव महाराज यांच्या समकालीन संत सावंता महाराज.
संत सावंता महाराज यांचा जन्म : इ.स. १२५०; झाला. हे एक मराठी संतकवी होते. अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर हे सावतोबांचे गाव होय. दैवू माळी हे सावता महाराजांचे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील होते. ते पंढरीचे वारकरी होते. त्यांना दोन मुले होती. पुरसोबा आणि डोंगरोबा. पुरसोबा हे धार्मिक वळणाचे होते. शेतीचा व्यवसाय सांभाळून ते भजन-पूजन करीत असत. पंढरीची वारी करीत असत. त्यांचा विवाहही त्याच पंचक्रोशीतील सदू माळी यांच्या मुलीशी झाला. या दांपत्याच्या पोटी सावतोबांचा जन्म झाला. या घराण्याचे मूळ गाव मिरज संस्थानातले औसे होय. दैवू माळी सावंता माळी यांचे आजोबाअरण या गावी स्थायिक झाले.
सावता माळी यांनी भेंड गावचे ‘भानवसे रूपमाळी’ हे घराणे असलेल्या जनाई नावाच्या मुलीशी लग्न केले. तिने उत्तम संसार केला. त्यांना विठ्ठल व नागाताई अशी दोन अपत्ये झाली. सावता माळी यांनी सेना न्हावी, नरहरी सोनार यांच्याप्रमाणेच त्यांनीही आपल्या व्यवसायातील वाक्प्रचार, शब्द अभंगांत वापरले आहेत. तत्कालीन मराठी अभंगाच्या भाषेत नव्या शब्दांची, नव्या उपमानांची त्यामुळे भर पडली.
संत सावता महाराज हे संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले ज्येष्ठ संत होते. यांचा काळ इ.स. १२५० ते १२९५चा आहे. संत ज्ञानेश्वरांचा काळ इ.स. १२७५ ते १२९६ आहे. ‘साव’ म्हणजे खरे तर शुद्ध चारित्र्य, सज्जनपणा. सावता हा भाववाचक शब्द होय. सावपणा असा याचा अर्थ होतो. सावता महाराज लहानपणापासून विठ्ठलभक्तीमध्ये रममाण झाले. फुले, फळे, भाज्या आदी पिके काढण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता. ‘आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत’ असे ते एका अभंगात म्हणतात.
ऐहिक जीवनात कर्तव्यकर्मे करीत असतानाच काया-वाचे-मने ईश्र्वरभक्ती करता येते, हा अधिकार सर्वांना आहे. ‘न लगे सायास, न पडे संकट, नामे सोपी वाट वैकुंठाची’ असा त्यांचा रोकडा अनुभव होता. त्यांनी जनसामान्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला. यांना केवळ ४५ वर्षांचे आयुष्य लाभले. धार्मिक प्रबोधनाचे व भक्तिप्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने व्रत म्हणून आचरिले. समरसता आणि अलिप्तता यातील विलक्षण समतोल त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रकर्षाने जाणवतो. त्यांचे केवळ ३७ अभंग उपलब्ध आहेत. अरण येथे आषाढ वद्य चतुर्दशी, शके १२१७ दि. १२ जुलै, १२९५ रोजी संत सावता महाराज अनंतात विलीन झाले. आजही पंढरपूरच्या श्री विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटावयास येत असते. अरण येथे आषाढ वद्य चतुर्दशी, शके १२१७ दि. १२ जुलै, १२९५)रोजी संत सावता महाराज यांनी संजीवन समाधी घेतली.
सावता माळी हे कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी ईश्वरसेवा अशी प्रवृत्तिमार्गी शिकवण देणारे सत आहेत. वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत म्हणून त्यांचा लौकिक आहे. श्री विठ्ठल हेच त्यांचे परमदैवत होते. ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत. प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांना भेटावयास आले. ते कर्ममार्गी संत होते. ‘कर्मे ईशु भजावा’ हीच त्यांची वृत्ती होती. पंढरपूरच्या विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटावयास येत असते. त्यांनी अध्यात्म आणि भक्ती, आत्मबोध आणि लोकसंग्रह, कर्तव्य आणि सदाचार याची बेमालूम सांगड घातली. धर्माचरणातील अंध:श्रद्धा, कर्मठपणा, दांभिकता व बाह्य अवडंबर याबाबत त्यांनी कोणाचीच भीडभाड ठेवली नाही. त्यावर सतत कोरडे ओढले. अन्त:शुद्धी, तत्त्वचिंतन, सदाचार, निर्भयता, नीतिमत्ता, सहिष्णुता इत्यादी गुणांची त्यांनी भलावण केली. ईश्र्वराला प्रसन्न करून घ्यावयाचे असेल तर योग-याग-जप-तप, तीर्थव्रत, व्रतवैकल्ये या साधनांची बिलकूल आवश्यकता नाही. केवळ ईश्र्वराचे अंतःकरणपूर्वक चिंतन हवे आहे.
यावेळी तुकाराम माळी, चंद्रकांत बंडगर, रवींद्र सोलनकर, अर्जुन कुकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
Satyashodhak, obc, Mahatma phule, Bahujan