नवापूर - महिला कुस्तीगिरांच्या लैंगिक शोषणाचा आरोप असणाऱ्या भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांना त्वरीत अटक करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सत्यशोधक शेतकरी सभेतर्फे देण्यात आला आहे.
याबाबत तहसिलदार मंदार कुलकर्णी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, भाजपचे खा. बृजभूषण शरण सिंह यांनी १२ वर्षे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष असतांना महिला कुस्तीगिरांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्यांचा राजीनामा व अटकेच्या मागण्यासाठी दिल्लीच्या जंतरमंतरवर हरियाणातील महिला कुस्तीगिरांनी पुरुष सहकाऱ्यांसह आंदोलन सुरु केले. त्या आंदोलनात २३ जानेवारी रोजी चौकशी समिती नेमण्याचे घोषित करुन हे आंदोलन गुंडाळण्याचा प्रयत्न सरकारने केला. प्रत्यक्षात बृजभूषण शरण सिंह याला पाठीशी घालण्यात आले. महिला कुस्तीगिरांनी या संदर्भात पोलिसांकडे एफआयआर नोंदविलेला असतांना व त्यातही एक अल्पवयीन कुस्तीगीर मुलीची तक्रार दाखल असतांना बृजभूषण शरण सिंह उजळ माथ्याने समाजात वावरत आहे. त्यांना पोस्को कायद्यांतर्गत त्वरीत अटक होणे आवश्यक आहे. या संदर्भातील गुन्हाही सुप्रिम कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर नाईलाजाने नोंदविण्यात आला आहे. देशासाठी सर्वोच्च कामगिरी करत जागतिक स्पर्धा व ऑलम्पिकमध्येही मेडल मिळविणाऱ्या या कुस्तीगीर भगिनींना स्वतः वरील अन्यायाविरुध्द दाद मागण्यासाठी रस्त्यावर यावे लागते, यापेक्षा लांच्छनास्पद गोष्ट नाही. याशिवाय प्रतिकात्मक महिला संसद भरवुन स्वतः वरील अन्यायाची गोष्ट जगाला सांगू इच्छिणाऱ्या या महिला व सहकारी पुरुष कुस्तीगिरांना फरफटत दांडगाईने अटक केली. आता जागतिक कुस्तीगीर परिषदेने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. सत्यशोधक कष्टकरी महिला सभा, सत्यशोधक शेतकरी सभा, श्रमिक शेतकरी संघटना, (संलग्न अखिल भारतीय किसान महासभेने या दडपशाहीचा निषेध केला आहे.
बृजभूषण शरण सिंह यांना महिला कुस्तीगिरांच्या लैंगिक छळाबद्दल पोस्को व अन्य कायद्यानुसार त्वरीत अटक करावी, जंतरमंतरवर शांततेने आंदोलन करणाऱ्या कुस्तीगिरांवरील खोट्या केसेस मागे घ्याव्यात अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. कुस्तीगिरांना त्वरीत न्याय न मिळाल्यास अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात अ ला आहे. निवेदनावर सत्यशोधक शेतकरी सभेचे कॉ. आर.टी. गावीत, महिला सभेचे तालुका अध्यक्ष शितल गावीत, राज्या गावीत, रामदास गावीत, गेवाबाई गावीत, नीबूबाई गावीत, गोबाजी गावीत, सुकऱ्या गावीत, बाबल्या गावीत, रंगूबाई मावची, सेम्या गावीत, मोग्या गावीत, धेड्या गावीत, विष्णू गावीत, विक्रम गावीत, देविदास पाडवी, सेल्या गावीत, करणसिंग नाईक, वनकर कोकणी, गिऱ्या नाईक, चांदया नाईक, होण्या नाईक यांच्या सह्या आहेत.
Satyashodhak, obc, Bharatiya Janata Party, rashtriya swayamsevak sangh