गडचिरोली : राज्यात तलाठ्यांची ४ हजार ६४४ पदे भरण्याची जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने नुकतीच प्रकाशित केली आहे. यात गडचिरोली जिल्ह्यात १५८ पदांपैकी पेसा क्षेत्रातून १५१ पदे व नॉन पेसा क्षेत्रातून ७ पदे भरण्याची जाहिरात आहे. यात ओबीसी, एस. सी., एन. टी. सह खुल्याप्रवर्गासाठी एकही जागा नसल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
पेसा क्षेत्रात वर्ग ३ व ४ ची १७ संवर्गातील पदे भरताना १०० टक्के अनुसूचित जमातीच्या उमेदवारातूनच भरण्याबाबतच्या ९ जून २०१४ च्या राज्यपालांच्या सूचनेत २९ ऑगस्ट २०१९ च्या अधिसूचनेनुसार सुधारणा करण्यात आली आहे. ती सुधारित अधिसूचना २८ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र राज्यात अंमलात आली आहे. परंतु महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने पेसा क्षेत्रातील १५१ तलाठी पदे भरण्याची जाहिरात ९ जून २०१४ च्या राज्यपालांच्या जुन्याच अधिसूचनेनुसार प्रकाशित केल्यामुळे ओबीसीसह एससी, एनटी, व्हीजे, एसबीसी, इडब्ल्यूएस व खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना या पदभरतीत एकही स्थान मिळाले नाही. त्यामुळे या प्रवर्गातील उमेदवारांवर फार मोठा अन्याय झाला आहे.
२८ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार पेसा क्षेत्रातील ज्या गावात अनुसूचित जमातीची लोकसंख्या २५ ते ५० टक्के पर्यंत आहे, अशा गावातील १७ संवर्गीय पदे भरताना ५० टक्के अनुसूचित जमातीतून, ६ टक्के अनुसूचित जातीतून, ९ टक्के इतर मागास प्रवर्गातून, ६ टक्के विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातून, ५ टक्के आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातून तर २४ टक्के खुल्या प्रवर्गातील भरण्याचे निर्देश आहेत. तर ज्या गावात अनुसूचित जमातीची लोकसंख्या २५ टक्केपेक्षा कमी आहे, अशा गावातील १७ संवर्ग पदे भरताना २५ टक्के अनुसूचित जमातीतून १० टक्के अनुसूचित जातीतून, १४ टक्के इतर मागास प्रवर्गातून, १० टक्के विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातून, ७ टक्के आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातून तर ३४ टक्के खुल्या प्रवर्गातून भरण्याची निर्देश आहेत. असे असताना, ९ जून २०१४ च्या जुन्या अधिसूचनेनुसार जाहिरात काढण्यात आल्याचा आरोप ओबीसी बांधव करीत आहेत.
'सदर पदभरतीची जाहिरात तात्काळ रद्द करून ती २८ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार प्रकाशित करण्यात यावी, अन्यथा राष्ट्रीय ओबीसी महासंघ व इतर समविचारी संघटनांच्यावतीने मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. '
Satyashodhak, obc, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, dr Babasaheb Ambedkar, Bahujan