लेखक - ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक,
सर्वच प्राणीमात्राला निसर्गता बुद्धी आहे. मानवाला भावना शब्दातून व्यक्त करता येतात. पशुना त्या व्यक्त करता येत नाही. माणसाला चांगल वाईट पारखण्याची अक्कल निसर्गाने दिलेली असतांना तो खोट्या विचारांचा माणसिक गुलाम बनतो. त्याला लहान वयात सांगीतल्या जाते. आई, वडील, गुरूची आज्ञा पाळावी. मग हे कितीही अज्ञानी असेल, अंधश्रद्धाळू असेल तरी. शिक्षित मुलेसुद्धा डोळेबंद ठेवत आज्ञा पाळतात. कारण मोठ्यांचा सन्मान असे सांगत. अनेक घरात वाईट परंपरा ह्या वडीलोपार्जीत म्हणून जपल्या आहेत.
माणूस कुटूंबासाठी धन आणि अन्न संग्रह करतो. पण पशु, पक्षी आपल्या पिल्लांना चालण्याची, उडण्याची शक्ती येईपर्यंत त्यांचा सांभाळ करतात. एकदा त्याच्यात शक्ती आली की तो स्वावलंबी बनतो. पण माणूस मृत्युपर्यंत परावलंबीच राहतो. माणूस आत्मविश्वासापेक्षा पाषाणाच्या देवावर विश्वास ठेऊन अनेक संकटे ओढवून घेतो. खरा देव कशाला म्हणतात, तो माणसातच कसा राहतो हे संतांनी आपल्या काव्यातून नेहमीच मांडले. संत तुकाराम महाराज म्हणतात,
'देवळीचा देव मेला । अंतरीचा जागवा रें ॥
देव पाहव्यासी गेलो। देवची होऊनी ठेलो ॥
मंदिरात पुजा करणे, भजन किर्तनात बसून डोक हालवणे म्हणजे देवाची भक्ति आहे का? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भक्तिचा अर्थ सांगतात.
मंदिरी बैसोनि नाक दाबावे ।
त्यापेक्षा मागचे काटे उचलावे।
दुःखितासी प्रेमे पाणि पाजावे ।
श्रेष्ठ तीर्थखानाहूनि ॥19 ग्रा.अ.18॥
एक हात खोदावी जमीन।
हे पूजनाहूनि पूजन ।
परिणाम शेकडो व्याख्यानाहून।
अधिक तयाचा 120 ग्रा.अ. 18॥
राष्ट्रसंत श्रेष्ठकर्म सांगतांना ग्रामगीतेत लिहतात-
श्रमिकास जेणे लाभेल अन्न ।
ते कर्म श्रेष्ठ यज्ञाहून।
एरव्ही गीतेचे नाव सांगून ।
भलते समर्थन करू नये ॥ 21 ग्रा.अ.18॥
मित्रानों भक्तिवान असा, धार्मीक असा पण खरा धर्म, खऱ्या देवाच स्वरूप संत विचारातून समजून घ्या.
चालती आम्हा ऐसे नास्तिक !
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नास्तिकाविषयी ग्रामगीतेत लिहतात-
अंध दुबळा भाविकपणा ।
तो कधीही न रूचे माझ्या मना ।
संतदेवाची निष्क्रिय गर्जना ।
करील तो आस्तिक नव्हे ॥105 ग्रा. अ. 1111
आम्ही मुख्यतः कार्यप्रेरक ।
चालती आम्हा ऐसे नास्तिक ।
ज्यांचा भाव आहे सम्यक ।
'सुखी व्हावे सर्व' म्हणूनि ॥106 ग्रा.अ.11.
आज धार्मीकतेचे अवडंबर साऱ्याच धर्मात दिसत आहे. धार्मीक स्थव्यंवरची गर्दी वाढत आहे. प्रत्येक धर्माचे धर्मोपोदेशक आपल्या धर्माच श्रेष्ठत्व सांगत आहे. सर्वच धर्माच तत्वज्ञान जर मानव कल्याणाचे असेल तर धर्माच्या नावावर मानवी डोके का भडकतात? कोण करणार चिंतन ? खरे आस्तिक कोणाला म्हणावे?
प्रत्येक धर्माचे काही आहेत. त्याठिकाणचे दर्शन धार्मिक स्थळे घडल्यास मानवी जीवनाचे साफल्य होते. या जन्मात मुक्ती मिळते. पुढचा जन्म हा चांगल्या पशुयोनीचा मिळू शकतो. असे तत्वज्ञान कमी अधिक प्रमाणात सांगणारे प्रत्येक धर्मात मिळतात. संत कबीर स्वामी चक्रधर भगवान बसवेश्वर आस्तिक आणि नास्तिक याचा भंडाफोड आपल्या साहित्यातून परखड शब्दात मांडला आहे. संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम या संतांच्या भागवत धर्माने जातीव्यवस्था आणि अंधश्रद्धा- अंधळ्यांचा कडाडून विरोध केला. त्याच वारकरी संतांचा नामोल्लेख आम्ही जातीवाचक शब्दांनी करतो. त्यांच्या नावे चमत्काराच्या कथा सांगतो. समाजाला कर्तव्याची जाणीव करून देण्यापेक्षा ईश्वरभक्ती केल्याने तुझे दुःख नष्ट होऊ शकते अशा प्रकारचे प्रबोधन करणाऱ्या किर्तनकार, प्रवचनकारांची संख्या समाजात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अध्यात्म कशाला म्हणतात याचा साधा अभ्यास नसणारे सोशल मीडीयावरून अध्यात्माचे डोज पाजत असतात. त्यांची धार्मिकता, त्यांचे अध्यात्म तपासण्याइतका समाज आजही शिक्षित झाला असावा दिसत नाही. जगतगुरू संत तुकाराम महाराज म्हणतात,
सत्य असत्याशी मन केले ग्वाही । माणीयले बहुमता ॥
आमच्यातील धार्मीकता, भाविकता जर वाढल्याचे मानवी गर्दीतून जाणवते तर मानवी दंगली जाती, धर्म, व्यक्तीद्वेषाच्या नावावर का उसळतात ? अशा दंगलीमध्ये कोणाचे कुटुंब परिवार उध्वस्थ होतात? याचे चिंतन कोण करणार? श्रमिक कुटुंबातला एक कर्ता संपला तर संपूर्ण कुटुंब रसत्यावर भिक मागतांना दिसते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्तव्याची जाणीव सोडून भाक्तिचे सोंग दाखविणाऱ्या आळशी लोकांना एका भजनातून फटकारतात-
आड नका येऊ चला फिरा माघारा ।
आळशी लोकांचा मला न लागो वारा ॥
नको तुमची पूजा, भक्तिचाहि पसारा!
काय होते करूनिया ढोंगधतूरा ॥
संताचे शब्दवान मन भेदणारे असतात. पण खोट्या बाता करणारे खोटी माणस आपल खोटपण लपवायसाठी अस बोलतांना दिसतात, 'अरे आपण संसारी माणस आहोत. संसार करतांना चुका होणारच. आपण दान- धर्म करून प्रायश्चित घेतो नां.' भ्रष्ट विचारांची संगत करणारे अशी पळवाट शोधतच असतात. पुढे राष्ट्रसंत याच भाजनात सांगतात-
भजन-कीर्तने मोठी भक्ति दाखवता ।
कामासाठी, सेवेसाठी दुरदुर पळता !
त्याग जरा अंगी नाही, भोगचि सारा!
आळशी लोकांचा न लागो वारा ॥
किर्तन, प्रवचनात बसून मान डोलवनारे खुप भक्त दिसतात. त्यांच्या भक्तिचा दिखावा खुप असतो. पण हे भक्त स्वतःच्या कर्तव्यात आळशी असतात. सेवेच्या वेळेस दुर पळतात. कोरोनाच्या महामारीत हे सर्व भक्त घराताच बसून देव देव करीत होते. स्वतःच्या कुटुंबातील वडिलधाऱ्यांशी त्यांची वागणूक दिखावा होता. देवाने भक्तांसाठी धावून यावे आणि भक्तांने जीवंत देवांसाठी थोडाही त्याग करू नये? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी
अशा प्रवृत्तीचां धीकारच केला आहे. पुढे ते लिहतात-
पैसे मागोनिया जसे बांधता देऊळ ।
तैसी गरीबांची मनी आहे का तळमळ ?
हेचि सांगते का गीता ? ग्रंथ हा सारा ।
आळशी लोकांचा मला न लागो वारा! ॥
मित्रानों भक्तिचे सोंग दाखविणाऱ्यांच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी किती बारकाव्यांनी निरिक्षण केले. लोकवर्गीणी करून गावात भव्य देवळाचे निर्माण करतां पण गावातले गरीब उपवाशी आहे. त्यांना राहण्यास धड घर नाही. गरीबाच्या मुलांच्या शिक्षणासाठी अत्याधुनिक शिक्षणाच्या सोयी नाही. गावात आरोग्याच्या सोयी नाही. महागड्या औषधी आणि उपचार गरीब रुग्णांना मृत्युच्या दारी पोहचवतो. काय करता गावी मंदिर बांधून? हेच सांगते का गीतेचे तत्वज्ञान असा प्रश्नच राष्ट्रसंतांनी केला.
नाकाहुनी शेंडीवरी चंदन लावावे ।
काळ्या बाजाराने सारे लोक ठगवावे ॥
दया नाही, माया नाही, स्वार्थची सारा।
आळशी लोकांचा मला न लागो वारा ॥
चंदनाचे टिळे लावून भस्माचे पट्टे लावुन जर आम्ही भक्तिचे, भाविकतेचे प्रदर्शन करीत भ्रष्टाचार करीत, वस्तूंचा काळाबाजार करीत, वस्तुंची मिलावट करून आम्ही धन कमवीत असू तर आमच्यात दया, माया कुठून राहणार? सारा स्वार्थाचा बाजार, आमच्या जीवनाच कल्यण कसे होईल ?
गावामध्ये फिरती सदा जसे गावगुंड ।
नाच- तमाशांचे सारे, जाहलेसे बंड !!
पुन्हा पाया, लागावया येता सामोरा!
आळशी लोकांचा मला न लागो वारा! ॥
अलिकडे धार्मिक-सामाजिक कार्यक्रमासाठी सर्वसामान्य लोकांकडून जबरन वर्गणी गोव्य करतात. प्रबोधन कार्यक्रमापेक्षा नाचगाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन मोठ्याप्रमाणात होतानां दिसतात. समाजातील लोककल्याणाचा विचार उत्सवातून व्हावा हा संतमहापुरूषांचा विचार आता मनोरंजनाच्या कोंदनात बंदीस्थ झाला आहे. अशीच उत्सवांचा तमाशा करणारी मंडळी समाजसेवेचे पुढारीपण करतांना दिसतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेवटी या पुढाऱ्यांना समज देतात.
आतातरी घ्या वचन, चारित्र्याने वागू !
सर्व गाव मिळोनीया, सुमार्गाला लागू !!
तुकड्यादास म्हणे, यारे! देश उद्धरा ।
आळशी लोकांचा मला न लागो वारा ॥
भक्तिचे सोंग दाखविणाऱ्यांनो आपल चारित्र्य आधी सांभाळा. स्वतःला चारित्र्यवान बनण्यासाठी वचनबद्ध व्हा. सर्व गावाने एकत्र येऊन गावकल्याणाचा मानवकल्याणाचा सुमार्ग स्वीकारू या. हा देश तुम्हाला आणि मलाच उद्धाराचा आहे. विदेशी हस्तकांच्या हातात आपला देश सुरक्षीत कसा
राहील? आळस सोडा देशाच्या प्रगतीसाठी पुढे यां.
संत-महापुरुषांनी मानव कल्याणाचा विचार देतांना तुम्ही भक्तिच करीत बसा अस कुठेच सांगीतले नाही. तर आळस सोडून राष्ट्रकार्यात योगदान द्या. तुम्ही नास्तिक असाल तरी चालते. कार्य प्रेरक असणे गरजेचे आहे.
लेखक - ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक, मो. 9823966282
Satyashodhak, obc, Bahujan