लेखकः प्रा. श्रावण देवरे
ओबीसी किंवा एस.ई.बी.सी. हे काहीसे समानार्थी शब्द असून त्यांचे संवैधानिक नामकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे. तत्पुर्वी या जातींना किंवा समाजघटकांना वेगवेगळ्या काळात वेगवेगळी संबोधने होती. तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांच्या काळात आजचे ओबीसी सत्यशोधक म्हणून ओळखले गेलेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मावळे व वारकरी, महामानव बुद्धाच्या काळात पूग (उत्पादक) व श्रेणी (श्रेष्ठी), आणी त्याही आधी सिंधू संस्कृतीच्या काळात सिंधूजन म्हणून ते ओळखले जातात. या सर्व समाजघटकात फक्त आजचे ओबीसीच होते, असे नाही, इतरही होते. मात्र आजचा ओबीसी ज्याला आपण म्हणतो तो मोठ्या संख्येने या सर्व समाजघटकात असल्याने त्याची ओळख त्या त्या नावाने केली जाऊ शकते. आणखी महत्वाची बाब अशी की, या ओबीसी समाजघटकाने आपला ‘ब्राह्मणविरोधी, जातिव्यवस्थाविरोधी’ गुणधर्म प्रत्येक काळात चिवटपणे टिकवून ठेवला आहे. हा मुद्दा येथे विस्ताराने मांडण्याची ही जागा नाही. ज्यांना हा मुद्दा विस्ताराने समजून घ्यायचा असेल त्यांनी फुलेआंबेडकर जयंतीनिमित्ताने झालेल्या दौर्यातील माझे राजूरा (जि. चंद्रपूर) येथील दि. 13 एप्रिल 2023 रोजीचे व्याख्यान ऐकावे. फोन करा, लिंक पाठवतो.
आजच्या ओबीसी समाजघटकाने प्रत्येक काळात झालेल्या ब्राह्मणवादविरोधी क्रांतीत सिंहाचा वाटा उचलला आहे. त्याचा हा गुणधर्म पाहता प्रतिक्रांती करण्यासाठी ब्राह्मणांना नाईलाजास्तव ओबीसीचाच आधार घ्यावा लागतो, असेही इतिहास सांगतो. क्रांती करण्यासाठी ओबीसीच पुढे असतो व प्रतिक्रांतीसाठी ओबीसीचाच मुखवटा वापरला जातो. सिंधूसंस्कृतीच्या काळात बळीराजाच्या नेतृत्वाखाली आर्य-ब्राह्मणांच्या विरोधातील मैदानी लढाईत लढणारा तत्कालीन ओबीसीच मोठ्याप्रमाणात होता. बौद्ध काळात महामानव बुद्दांच्या खाद्याला-खांदा लावून लढणारे तत्कालीन उपालीसारखे (नाभिक) असंख्य ओबीसी होते. उत्पादक ‘पूग’ व व्यापारी ‘श्रेणी’ या समाजघटकात सुतार, कुंभार, लोहार, सोनार, शिंपी हे व्यवसाय करणारेच अधिक होते व त्यांनीच बौद्ध क्रांतीचा आर्थिक कणा मजबूत केला होता. ब्राह्मणवादविरोधी वारकरी पंथात नामदेव ते गाडगे महाराज परंपरेत सावता, जगनाडे, तुकाराम हे ओबीसी संतच अधिक दिसतात. मुस्लीम राजकीय सत्ता व ब्राह्मणी सामाजिक-सांस्कृतिक सत्तेविरुध्द छत्रपती शिवाजी पासून ते जीवाजी महालेंपर्यंतचे लढवैय्ये मोठ्याप्रमाणात ओबीसीच होते. आधूनिक काळातील ब्राह्मणवादविरोधातील सर्वात मोठा लढा सत्यशोधकी होता व त्यातील लढवैय्ये ओबीसीच होते.
ओबीसीतील ब्राह्मणविरोधी सामाजिक-सांस्कृतिक चिवटता पाहून केवळ एक डावपेंच म्हणून ब्राह्मणांना प्रतिक्रांतीसाठी ओबीसी मुखवटाच प्रातिनिधिक म्हणून वापरावा लागलेला आहे. बौद्ध राजा महानंदाविरोधातील प्रतिक्रांतीसाठी ब्राह्मण चाणक्याने चंद्रगुप्त मौर्य नावाचा ओबीसी मुखवटा वापरला. आज 2014 साली झालेल्या ब्राह्मणी प्रतिक्रांतीत कल्याणसिंग, उमा भारती, मुंडे-भुजबळ, नरेंद्र मोदी आदी ओबीसी मुखवटे संघ-भाजपाला वापरावे लागले आहेत.
1980 पर्यंत संघ-भाजपाला ओबीसी-बहुजन नेत्यांची गरज भासत नव्हती. कारण ब्राह्मणवादविरोधी क्रांतीकारी ओबीसी शक्तीला नियंत्रित व निकामी करण्याचे काम कॉंग्रेस यशस्वीपणे करीत होती. 1977 ची आणीबाणी उठेपर्यंत संघ-जनसंघ उघडपणे कॉंग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. मग असे काय घडले की, संघ-जनसंघाला 1980 साली आपले नाव, स्वरूप, धोरणे व डावपेंच बदलावे लागलेत?
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सत्ताधारी कॉंग्रेसने 1947 सालापासूनच ओबीसींविरोधी षडयंत्रे सुरू केली होती. पहिल्या नेहरू मंत्रीमंडळाचा पहिला निर्णय होता जातनिहाय जनगणना बंद करण्याचा! त्यामुळे ओबीसी जातींची जनगणना आपोआप बंद पडली. 1953 सालचा ओबीसी हिताचा कालेलकर आयोग बासनात गुंडाळून कायमचा गाडून टाकला. परंतू तरीही यावर मात करीत क्रांतिकारी ओबीसी नेत्यांनी 1967 साली तामीळनाडूमध्ये ब्राह्मणवाद कायमचा गाडून टाकला. 1967 साली एकाचवेळी तामीळनाडू, बिहार व उत्तरप्रदेश या मोठ्या कळीच्या राज्यांमध्ये आपल्या स्वतःच्या बळावर ओबीसी मुख्यमंत्री झालेत, परिणामी दुबळ्या झालेल्या कॉंग्रेसमध्ये 1969 साली उभी फुट पडली. कॉंग्रेसचे राज्यस्तरावर डांबून ठेवलेले चरणसिंग, देवराज अर्स, कामराज सारखे ओबीसी-बहुजन नेते कॉंग्रेस फोडून बाहेर पडले व त्यांनी स्वतंत्रपणे पक्ष स्थापन केलेत.
या सर्व राज्यस्तरावरील ओबीसी-बहुजन पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्ष स्थापन केला व कॉंग्रेसला 1977 च्या लोकसभा निवडणूकीत भुईसपाट केलं. परंतू या जनता पक्षावर जयप्रकाश नारायण या ब्राह्मण समाजवाद्याची एकतर्फी हुकुमत असल्याने त्यांनी जनता पक्षात ब्राह्मणवादी संघ-जनसंघाला मोठा स्पेस निर्माण करून दिला. लोकसभेत 1957 साली जनसंघाचे फक्त 4 खासदार होते. साडेतीन टक्के लोकसंख्या असलेल्या ब्राह्मण-बनियाच्या जनसंघाचे 1977 सालच्या निवडणूकीत सर्वाधिक 75 खासदार निवडून आले होते. हा चमत्कार केवळ जयप्रकाश नारायण यांनी जनसंघाला झुकते माप दिल्यामुळे झाला. त्यामुळे मंडल आयोगाचा अहवाल लोकसभेत सादर करण्यापूर्वीच जनता पक्षाचे सरकार पाडणे ब्राह्मणवाद्यांना शक्य झाले.
ओबीसींच्या क्रांतिकारी शक्तीला दडपण्यासाठी ब्राह्मणवाद्यांना अनेकवेळा केंद्र व राज्य सरकारे पाडावी लागलीत. ब्राह्मणांच्या हितांचे ओबीसींपासून संरक्षण करण्यासाठी आता दुबळ्या कॉंग्रेसवर अवलंबून राहता येणार नाही, याची जाणीव संघ-जनसंघाला 1980 साली झाली, आणी त्यांनी आपली धोरणे बदललीत. सर्वप्रथम त्यांनी आपल्या पक्षाचे नाव बदलले. ‘ब्राह्मण-बनियांचा पक्ष’ असा शिका असलेले ‘जनसंघ’ हे नाव टाकून देउन ‘भारतीय जनता पक्ष’ हे व्यापक नाव धारण केले. परंतू केवळ नाव व्यापक असून चालत नाही, जमिनीवर पक्षही व्यापक झाला पाहिजे, म्हणून त्यांना ओबीसी नेते निर्माण करण्याची गरज भासू लागली! ओबीसी नेतच का पाहिजेत? कारण जनतेच्या चळवळीतून भक्कमपणे पुढे आलेले कर्पूरी ठाकूर, करूणानिधी, लालू प्रसाद यादव, मुलायमसिंग यादव, देवराज अर्स यासारख्या दिग्गज ओबीसी नेत्यांना रोखणे सोपे नव्हते. हे सर्व ओबीसी नेते जनतेतून म्हणजे ‘खालून वर’ या प्रक्रियेतून तयार झालेले होते. ‘खालून वर’ या प्रक्रियेतून नेते निर्माण करण्याचे काम संघ-भाजपा करूच शकत नाही, कारण ब्राह्मणांकडे जनचळवळीची परंपराच नाही. सातत्याने षडयंत्रे, फोडाफोडी, तोडातोडी, खून-दरवडे, खोटे रेटणे, भाकडकथा, कान-कुजबुज यासारखी अनैतिक कामे करूनच त्यांना आपले ब्राह्मणी वर्चस्व टिकविता आलेले आहे. त्यामुळे त्यांना भाजपात ओबीसी नेत्यांची निर्मिती ‘वरून खाली’ या प्रक्रियेतूनच करावी लागली. ब्राह्मणी मिडियाच्या मदतीने त्यांनी देशभर अनेक ओबीसी नेते निर्माण केलेत व त्यांना त्या त्या जातींवर लादलेत.
भाजपच्या ओबीसी नेत्यांमध्ये गोपीनाथ मुंडे हे असे एकमेव बंडखोर निघालेत, त्यांनी ओबीसी जनगननेसाठी संघ-भाजपाच्या ब्राह्मणवादाला लाथ घालत संसदेत तासभर घणाघाती भाषण केले. त्यांना रोखण्यासाठी शेवटी संघ-भाजपाला त्यांची हत्त्याच करावी लागली. दुसरे बंडखोर नेते छगन भुजबळ! यांनी ब्राह्मणी शिवसेनेला लाथ मारीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस जवळ केली. 2010-11 साली ओबीसी जनगणनेसाठी भुजबळसाहेबांनी देशभर रान उठविले. परंतू मराठा-ब्राह्मण युतीने त्यांना जेलमध्ये टाकून रोखले व थेट संघ-भाजपाच्या हागणदरीत नेले. वास्तविक पाहता भुजबळांच्यासमोर लालू प्रसाद यादवांचा फार मोठा आदर्श होता. कालेलकर, मंडल आयोगासाठी जीवाचे रान करीत लालूजींनी आयुष्य वेचले, रामरथ यात्रा रोखून कमंडलचे षडयंत्र मोडून काढण्याचा प्रयत्न केला. ओबीसींचा पक्ष स्थापन करून बिहारमधून कॉंग्रेस व भाजपा रसातळाला पोहचवली. लालू प्रसाद यांना रोखण्यासाठी कॉंग्रेस-संघ-भाजपाने अनेकवेळा जेलमध्ये टाकले. पण ते डगमगले नाहीत. तुरूंगवासात त्यांचा छळ करून त्यांचे शरीर जर्जर केले. परिणामी आज ते मरणाला टेकलेले असूनसुद्धा संघ-भाजपासमोर झुकलेले नाहीत. आजही लालू प्रसाद यादव स्वाभिमानाने एका योद्ध्यासारखे संघ-भाजपाशी लढत आहेत.
लालूजींसारखा एवढा मोठा आदर्श ओबीसी चळवळीत असतांना भुजबळांनी संघ-भाजपाच्या चरणी लीन होऊन स्वाभिमान गहाण ठेवावा, ही बाब केवळ ओबीसींसाठी शरमेची नाही, तर संपूर्ण देशासाठी लाज आणणारी आहे. तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांनी पंचपक्वान्नाचे जेवण दिलेले असतांना, संघ-भाजपच्या हागणदरीत जावून जेवण करण्याचा हा इतिहास निश्चितच काळ्या अक्षरात लिहिला जाईल, यात शंका नाही.
प्रा. श्रावण देवरे
संपर्क मोबाईल- 94 227 88 546
ईमेल- s.deore2012@gmail.com