लेखकः प्रा. श्रावण देवरे
राज्याच्या विविध भागात 5 ओबीसी गोलमेज परिषदा घेऊन ओबीसी राजकीय आघाडीची स्थापना करण्यात आली. तसेच पुण्यात पत्रकार परीषद घेऊन पुणे लोकसभा पोटनिवडणूक ओबीसी राजकीय आघाडीतर्फे लढण्याचे जाहीर करण्यात आले. प्रामाणिक ओबीसी कार्यकर्ते तसेच विविध प्रस्थापित पक्षात नाईलाजास्तव काम करणार्या ओबीसींनी याचे स्वागत केले. परंतू अपवाद म्हणून दोन जणांनी या निर्णयाला विरोधही केला. त्यात साप्ताहिक विचारपीठाचे संपादक गौतम गेडाम यांची प्रतिक्रिया प्रातिनिधिक समजली पाहिजे. त्यांनी मला फोन करून आपली नापसंती व्यक्त केली.
गौतम गेडाम यांनी माझे अनेक लेख त्यांच्या विचारपीठात पुनर्प्रकाशित केले आहेत. त्यामुळे त्यांनी माझ्यावर व्यक्त केलेली नाराजी द्वेषभावनेतून नाही तर मैत्रभावनेतून व्यक्त केलेली आहे, हे निश्चित! फोनवरील चर्चेचा घोषवारा
पुढीलप्रमाणे-
गौतम गेडाम यांनी फोनवर ‘‘जय ओबीसी’’ करून बोलण्यास सुरूवात केली.
‘‘तुम्ही निवडणूकीत स्वतंत्र ओबीसी उमेदवार उभे करणार म्हणजे भाजपलाच मदत करणार, हो की नाही? बाळासाहेब प्रकाश आंबेडकर, ओवेसी व के.सी.आर. सारखे भाजपची ‘बी’ टिम बनून काम करणार का? कृपया भाजपाला पराभुत करण्यासाठी कॉंग्रेसला साथ द्या!’’
गेडाम यांचे बोलणे झाल्यावर मी त्यांना एक प्रश्न विचारला की, ‘‘ओबीसी समाजघटक हा सर्वात जास्त मतदान कोणाला करतो?’’ त्यावर गेडाम म्हणाले, ‘‘ओबीसी हा भाजपलाच मोठ्याप्रमाणात मतदान करतो.’’ मी दुसरा प्रश्न विचारला, ‘‘दलित कोणाला मतदान करतात?’’ गेडाम म्हणाले, ‘‘कॉंग्रेला’’ मी तिसरा प्रश्न विचारला की, ‘‘मुस्लीम कोणाला मतदान करतात? ते म्हणाले, ‘‘कॉंग्रेसला’’
मी स्पष्टिकरण देत पुढे म्हणालो की, ‘‘बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांनी जर उमेदवार उभे केलेत तर कॉंग्रेसची दलित मते कमी होतात व त्याचा फायदा डायरेक्ट भाजपाला होतो. ओवेसींनी मुस्लीम उमेदवार उभा केला तर कॉंग्रेसची मुस्लीम मते कमी होतात व त्याचाही फायदा भाजपला होतो. परंतू आम्ही जर ओबीसी राजकीय आघाडीतर्फे ओबीसी उमेदवार उभा केला तर कोणाची मते कमी होतील? माझ्या या प्रश्नावर गौतमजी गोंधळले. मी म्हणालो, ‘‘गौतमजी मघाशी तुम्हीच म्हणाले की, ओबीसी मोठ्याप्रमाणात भाजपलाच मतदान करतो. तर मी पुन्हा प्रश्न विचारतो की, आम्ही जर ओबीसी उमेदवार उभा केला तर कोणाची मते कमी होतील? मुद्द्याला वेगळे वळण देण्यासाठी त्यांनी मला प्रश्न केला की, ‘‘हो, पण अशी किती मते तुम्हाला पडणार आहेत?’’ मी त्यावर म्हणालो की, ‘‘आम्ही भाजपची 10 मते जरी कमी करू शकलोत तरी आम्हाला त्यात समाधान आहे!’’ किमान आम्ही भाजपला पराभूत करण्यासाठी खारीचा वाटा उचलत आहोत. त्यासाठी तुम्ही आम्हाला या कामी मदत केली पाहिजे, किमान स्वागत तर केलेच पाहिजे. गौतमजी तुम्ही ओबीसी राजकीय आघाडीला विरोध करून एकप्रकारे भाजपसाठी ‘बी’ टिमचेच काम करीत आहात.’’ असे मी म्हटल्यानंतर गौतम यांनी ‘शुभेच्छा’ देत फोन खाली ठेवला. ओबीसी राजकीय आघाडीतर्फे निवडणूक लढवली तर भाजपची ओबीसी मते कमी होतील व कॉंग्रेसलाच त्याचा फायदा होईल. यासाठी मी एक उदाहरण देतो. कारण आमच्या बहुजनांना उदाहरण दिल्याशिवाय समजतच नाही.
स्वतंत्रपणे ओबीसी उमेदवार केला तर भाजप पराभूत होते, याचे सर्वात मोठे उदाहरण चंद्रपूरचे आहे. 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणूकीत चंद्रपूर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीतर्फे एड. राजेंद्र महाडोळे हे माळी-ओबीसी उमेदवार उभे होते. महाडोळे यांचे माळी व ओबीसींमध्ये चांगले कार्य असल्याने ते कर्तृत्ववान म्हणून विदर्भात सुप्रसिद्ध आहेत. या एकमेव कारणास्तव महाडोळेंना एक लाख चाळीस हजार मते पडलीत. ही सर्व मते भाजपचीच होती. या निवडणूकीत भाजपा 50 हजार मतांनी पराभूत झाली व कॉंग्रेस निवडून आली. चंद्रपूर हा भाजपाचा बालेकिल्ला होता, हे लक्षात घ्या! 2019 साली महाराष्ट्रात कॉंग्रेसचा एकच खासदार निवडून आला आहे, आणी तो म्हणजे चंद्रपूरचा! केवळ स्वतंत्र ओबीसी उमेदवारामुळे कॉंग्रेसचा एकमेव खासदार निवडून आला. कर्तृत्ववान महाडोळे यांनी आणखी थोडा जोर लावला असता तर त्यांनी कॉंग्रेसच्याही उमेदवाराला पराभूत केले असते व स्वतः महाडोळेच निवडून आले असते. ओबीसी जनगणना बंद पाडणार्या, कालेलकर आयोग बासनात गुंडाळणार्या व मंडल आयोगाला उघडपणे लोकसभेत विरोध करणार्या जातीयवादी कॉग्रेसचा उमेदवार पराभूत करून एखादा फुलेशाहूआंबेडकरवादी ओबीसी उमेदवार निवडून आला तर तुमचं त्यात काही नुकसान होणार आहे काय?
ओबीसी जेव्हा मोठ्याप्रमाणात जागृत होतो, तेव्हा तो कॉंग्रेस-भाजपासकट संपूर्ण ब्राह्मणवादच उखडून फेकून देतो, हे तामीळनाडूच्या ओबीसींनी सिद्ध केलेले आहे. अर्थात त्यासाठी सॉमी पेरियार यांना 1925 पासून तात्यासाहेब महात्मा फुलेंनी सांगीतलेल्या अब्राह्मणी प्रबोधनाची लाट निर्माण करावी लागली. ओबीसींचे राम-कृष्णावरून ब्राह्मणी प्रबोधन केले तर भाजपा निवडून येते व याच ओबीसींचे तात्यासाहेबप्रणित अब्राह्मणी प्रबोधन केले तर कॉंग्रेस-भाजपासकट संघ-आर.एस.एस. खतम होतो. ओबीसीच भाजपाला मोठे करतो व ओबीसीच भाजपाला खतम करतो, हे अनेकवेळा सिद्ध झालेले आहे. म्हणून मी म्हणतो की, ‘‘भाजपा व ओबीसीः एक अतूट नाते’’
लेखाच्या तिसर्या भागात या नात्याची ऐतिहासिकता व वर्तमानता पाहाणार आहोत, तो पर्यंत जय जोती, जयभीम, सत्य की जय हो!
प्रा. श्रावण देवरे
संपर्क मोबाईल- 94 227 88 546
ईमेल- s.deore2012@gmail.com