लेखकः प्रा. श्रावण देवरे
ओबीसी राजकीय आघाडीची पुणे जिल्हा शाखा स्थापन करून पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढणार असल्याची घोषणा ओबीसी परिषदेत व नंतर घेतलेल्या पत्रकार परीषदेत करण्यात आली. तेव्हा पुण्यातलं राजकारण ढवळून निघाले. या घोषणेचा पहिला परिणाम असा झाला की, पुण्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्यांवर ‘पोट निवडणूक रद्द करण्यासाठी’ दबाव आणायला सुरूवात केली. वास्तविक 8 दिवस आधीच भाजपाचे अध्यक्ष बावनकुळे यांनी पुण्यात कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन ‘पोटनिवडणूक लवकरच लागेल, कामाला लागा’ असा आदेश देउन गेले होते. त्याप्रमाणे भाजपाचे कार्यकर्ते पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या कामाला लागलेही होते. परंतू आपल्या ओबीसी राजकीय आघाडीच्या निवडणूक लढविण्याच्या घोषणेमुळे वारं फिरलं.
दुसरा परिणाम असा झाला की, ओबीसी परिषदेत व नंतर झालेल्या पत्रकार परीषदेत जे ओबीसी नेते माझ्या आजूबाजूला बसले होते, त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या व भाजपाच्या पुण्यातील नेत्यांकडून फोन यायला लागलेत. त्यापैकी एकाला 20 हजार रूपये देऊन स्वतंत्र ओबीसी कार्यक्रम घ्यायला सांगीतला गेला. त्यामुळे ओबीसी राजकीय आघाडीत फाटाफूट होईल, अशी त्यांना अपेक्षा होती. लातूरला भाजपातर्फे आयोजित एका कार्यक्रमात आमच्या आघाडीच्या दुसर्या एका नेत्याला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले. असे सगळे प्रयत्न करून झाल्यावरही आज पुण्यातील ओबीसी राजकीय आघाडी अभेद्य आहे. परिणामी पुणे लोकसभेची पोटनिवडणूक त्यांना रद्द करावी लागत आहे.
अर्थात हा काही पहिलाच अनुभव आहे, असे नाही. फेब्रुवारी-2023 मध्ये कसबा विधानसभेच्या पोटनिवडणूकीत आम्हाला हाच अनुभव आला. कसबा पोटनिवडणूक जाहीर होण्याआधी 23 जानेवारी 2023 रोजी सपना माळी नावाची झुंजार ओबीसी कार्यकर्ती ओबीसी जनगणनेच्या मुद्द्यावर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसली होती. तीला पाठींबा देण्यासाठी मी या उपोषण आंदोलनात दिवसभर सहभागी झालो. या उपोषणाच्या मंडपात भाषण करतांना मुख्यतः एकाच मुद्द्यावर भर देत मी म्हणालो की, ‘‘बस्स! खूप झालेत आता आंदोलने, मोर्चे, मेळावे आणी भाषणे! सगळेच प्रस्थापित पक्ष आलटून-पालटून सत्तेवर येत असतात परंतू ओबीसींची एकही मागणी कधीच पूर्ण केली जात नाही. पाच वर्षे आपण ओबीसींनी आंदोलने करीत राहायची आणी निवडणूक आली की याच प्रस्थापित पक्षांना मते देऊन त्यांना सत्तेत बसवायचे! त्यामुळे ओबीसींकडून जर फुकटात सत्ता मिळत असेल तर आम्ही सत्तेत आल्यावर ओबीसींची कामे का म्हणून करायची? असे या प्रस्थापित पक्षांचे म्हणणे आहे. आपण जोपर्यंत संघटितपणे यांच्या वोटबँकेवर घाव घालत नाहीत, तो पर्यंत हे पक्ष ओबीसींना गांभिर्याने घेणार नाहीत. म्हणून आम्ही आता ओबीसी जनगणणेच्या मुद्यावर निवडणूक लढविण्यासाठी ओबीसी उमेदवार स्वतंत्रपणे उभे करणार आहोत. त्याची सुरूवात कसबा विधानसभा पोटनिवडणूकपासून करीत आहोत. लवकरच कसबा पोटनिवडणूक जाहिर होणार आहे. कामाला लागा!’’ सपना माळी हिनेच या पोटनिवडणूकीत उभे राहावे, असेही भाषणात सुचविले.
या माझ्या भाषणाचा परिणाम काय झाल बघा- गेल्या 28 वर्षांपासून संघ-भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या कसबापेठ मतदारसंघातून फक्त गिरीश बापटांसारखे संघी ब्राह्मण उमेदवारच निवडून येत असतांना आता या पोटनिवडणूकीत ब्राह्मण उमेदवाराला वगळून ओबीसी उमेदवार भाजपाने का दिला? भाजपाने ओबीसी उमेदवार दिला म्हणून कॉंग्रेसनेही ओबीसी उमेदवार दिला. हा चमत्कार कसा झाला? अर्थातच ओबीसी जनगणनेच्या मुद्द्यावर कॉंग्रेस-भाजपाचे नाक नक्टे असल्याने आम्ही केलेल्या घोषणेचा हा परिणाम आहे. ओबीसी जनगणनेच्या मुद्द्यावर स्वतंत्र ओबीसी उमेदवार राहीला तर आपला ब्राह्मण/मराठा उमेदवार पराभूत होऊ शकतो, या भीतीपोटी दोन्ही प्रस्थापित पक्षांनी ओबीसी उमेदवार नाईलाजास्तव दिला.
ओबीसी राजकीय आघाडीच्या स्थापनेची प्रक्रिया दोन-अडिच वर्षांपासून सुरू आहे. ओबीसींचे स्वतंत्र राजकारण उभे केल्याशिवाय प्रस्थापित पक्ष तुम्हाला गंभीरपणे घेणार नाहीत. म्हणून प्रस्थापित पक्षांच्या व्होटबँकेवरच घाव घातला पाहिजे, या उद्देशाने ओबीसी राजकीय आघाडीची स्थापना करण्याचे ठरले. त्यासाठी 5 मार्च 2022 रोजी पहिली ओबीसी गोलमेज परीषद यवतमाळ येथे घेतली. दुसरी परिषद 20 मार्च 2022 रोजी जत, जि. सांगली येथे, तिसरी परिषद 9 एप्रिल 2022 रोजी धूळ्याला व चौथी परिषद 6 जून 2023 रोजी पुण्याला घेतली. आता प्रत्येक जिल्ह्यातून आमंत्रणे येत आहेत. लवकरच महाराष्ट्राचा दौरा सुरू होईल.
ओबीसींच्या हालचालीप्रमाणे भाजपाचे निर्णय कसे बदलतात, भाजपा हा ओबीसींच्या बोटावर कसा नाचतो हे मी काही उदाहरणे देउन सिद्ध केले. ओबीसी व भाजपाच्या अतूट नात्यातील चढ-उतार लेखाच्या या भागात सांगीतला. आता नात्यातील ट्विस्ट पुढच्या भागात सांगेन! तो पर्यंत जयजोती, जयभीम, सत्य की जय हो!
प्रा. श्रावण देवरे
संपर्क मोबाईल- 94 227 88 546
ईमेल- s.deore2012@gmail.com