चित्रपट माध्यम : तोडणारे की जोडणारे ?

लेखक - प्रेमकुमार बोके

    सध्या देशात "दि केरला स्टोरी" या चित्रपटावरुन मोठे वादळ सुरू आहे.काल्पनिक कथेला सत्य कथा आहे असे खोटे सांगून देशात धार्मिक व राजकीय धृवीकरण करण्याचा घाणेरडा प्रयत्न सुरू आहे.चित्रपट हे आपल्या कलेचे प्रदर्शन करून लोकांचे मनोरंजन करण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचे माध्यम आहे.भारतीय चित्रपट सृष्टीने अनेक चांगल्या प्रकारच्या कलाकृती देशाला दिलेल्या आहेत.त्या माध्यमातून देशाची मान निश्चितच जगात उंचावल्या गेलेली आहे.चित्रप्रसृष्टीतील अनेक कलाकारांनी सामाजिक क्षेत्रात सुद्धा चांगल्या प्रकारे आपले योगदान दिलेले आहे आणि समाजामधे जातीय-धार्मिक सलोखा निर्माण करण्यासाठी भारतीय चित्रपट सृष्टी अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण माध्यम आहे.परंतु मागील काही वर्षात आपल्या देशामधे धार्मिक उन्माद आणि द्वेष निर्माण करणारी एक मोठी यंत्रणा कार्यरत झालेली आहे.या यंत्रणेच्या माध्यमातून सर्व साधनांचा वापर करून देशात जातीय धार्मिक तणाव निर्माण करण्याचे सातत्याने प्रयत्न सुरू असतात. त्यासाठी मीडियाचा सर्रास वापर केला जातो.अनेकदा धर्माचा वापर केला जातो आणि आता मागील काही वर्षांपासून चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात देशात धार्मिक वातावरण गढूळ करण्याचे काम नियोजनपूर्वक सुरू आहे.त्यासाठी चित्रपट सृष्टीतील काही लोकांचा वापर सुरू आहे.

Breaking or connecting film media - The Kerala Story

    सध्या "दि केरला स्टोरी" या चित्रपटाने देशात धुमाकूळ घातलेला आहे.दोन समाजामधे धार्मिक विद्वेष निर्माण करण्यासाठी या चित्रपटाचा जोरदार उपयोग सुरू आहे. तसेच तरुण मुला-मुलींच्या डोक्यात धर्मांधतेचे विष घालून त्यांना कट्टरतावादी बनवण्यासाठी या चित्रपटाचा उपयोग सुरू आहे.तीन मुलींच्या धर्मांतर आणि इसिसला जॉईन होण्याचा आकडा ३२ हजारावर नेऊन चित्रपट निर्मात्याने सपशेल खोटारडेपणा केलेला आहे.सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेल्यानंतर पोस्टरवर सत्यकथा आहे असे लिहिणारा निर्माता,दिग्दर्शक कोर्टात मात्र ही काल्पनिक कथा आहे असे सांगतो आणि ३२ हजार मुलींचा आकडा तीन वर आणतो.हा आकडा सुद्धा खरा असल्याचा पुरावा उपलब्ध नाही.मात्र चित्रपटातील ३२ हजार मुलींची स्टोरी देशात वनव्यासारखी पसरली आणि सर्वत्र चुकीचा संदेश जावून देशाचे फार मोठे नुकसान झाले.याचाच अर्थ चित्रपट निर्मात्याला दोन समाजामध्ये जाणूनबुजून संबंध खराब करायचे होते आणि त्याचा फायदा संबंधित राजकीय पक्षाला करून द्यायचा होता हे स्पष्टपणे लक्षात येते."वर्ल्ड पाॕप्युलेशन रिव्ह्यूच्या" जगभरातील आकड्यावरून माहीत होते की,ज्या देशातून मोठ्या संख्येने लोक इसिसमधे सामील झाले आहे त्यामध्ये इराक,अफगाणिस्तान,रशिया,जॉर्डन, सौदी अरब,तुर्की आणि फ्रांसचे युवक आहेत.सगळ्यात अधिक भरती मध्यपूर्वेच्या देशातून झाली आणि विशेष म्हणजे सामील झालेल्यात भारतीयांची संख्या अत्यंत कमी आहे. केरळमधील धर्मांतरित महिलांचे इसिसमधे सामील होण्यासंबंधीचे दावे सुद्धा चुकीचे आहेत.

     कर्नाटकातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले आणि राजकीय फायद्यासाठी या चित्रपटातील खोट्या कथेचा खूप वापर करण्यात आला.भारतीय मतदारांनी मात्र सुज्ञ बुद्धीने विचार करून देशाचे वातावरण खराब करणाऱ्या धर्मांध लोकांना त्या ठिकाणी चांगली चपराक दिली.परंतु अशा चित्रपटामुळे देशाचा जातीय- धार्मिक सलोखा धोक्यात येतो.सखोल वाचन व माहिती न घेणाऱ्या लोकांच्या मनामधे संभ्रम निर्माण होतो आणि एक दुसऱ्यांविषयी द्वेष निर्माण होऊन आपसातील दरी आणि दुरी वाढत जाते.चित्रपट हे जातीधर्मांना जोडणारे माध्यम आहे.ते तोडणारे माध्यम नाही. भारतीय चित्रपट सृष्टी हे धार्मिक सलोख्याचे अतिशय सुंदर उदाहरण आहे.भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये आंतरधर्मीय विवाह झाल्याचे शेकडो उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात.परंतु सध्या काही लोकांना हाच धार्मिक सलोखा नष्ट करायचा असल्यामुळे चित्रपटाचा गैरवापर करून लोकांचे मेंदू खराब करण्यासाठी चित्रपटासारख्या चांगल्या माध्यमाचा गैरवापर सुरू आहे. कुठलीही आकडेवारी उपलब्ध नसताना काल्पनिक आकडेवारी देऊन आणि तिखट मसाला लावून भडक कथानकाच्या माध्यमातून लोकांची माथी भडकवण्यासाठीचे हे प्रयत्न अत्यंत घृणास्पद आहे.हा देश तोडण्याचा प्रकार असून देशाची सर्वधर्मसमभावाची उज्वल परंपरा उध्वस्त करण्यासाठीचे काही लोकांचे हे षडयंत्र आहे.भारतीय संविधान देशाला एकसंघ ठेवण्यासाठी निर्माण झालेले असताना विनाकारण खोटी प्रकरणे उकरुन काढून व जनतेच्या मुख्य प्रश्नाकडे दुर्लक्ष करून त्यांना जाती-धर्माच्या वनव्यामध्ये सतत पेटवत ठेवण्यासाठी काही कट्टरतावादी धर्मांध लोकांचा हा विकृत प्रयत्न आहे. काल्पनिक कथा असलेल्या "दि केरला स्टोरीने" देशाचे वातावरण खराब करणाऱ्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे.

    सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच एका निर्णयामध्ये म्हटले आहे की,घृणा पसरविणाऱ्या भाषणांची सरकारने स्वतःहून दखल घेतली पाहिजे.ते जर दखल घेत नसतील तर तो न्यायालयाचा अवमान समजला जाईल.आता सर्वोच्च न्यायालयाने आणखी एक निर्णय घ्यावा की, कलेच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली दोन समाजामधे तेढ व द्वेष निर्माण करणाऱ्या व दुष्प्रचार करणाऱ्या चित्रपटावरही प्रतिबंध लावावे व सेंसर बोर्डाने अशा चित्रपटांची माहिती सुप्रीम कोर्टाला द्यावी आणि त्या निर्माता व दिग्दर्शकाला दंड व्हावा.तरच पैसा कमावण्यासाठी आणि राजकीय हेतू साध्य करण्यासाठी निर्माण होत असलेल्या अशा फुटीरतावादी व देशविरोधी चित्रपटांना रोखणे शक्य होईल.अन्यथा असे धर्मांध चित्रपट भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेला धक्का पोहोचविल्याशिवाय राहणार नाही.

प्रेमकुमार बोके - अंजनगाव सुर्जी

Satyashodhak, obc, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209