छत्रपती संभाजी महाराजांचा स्त्रीविषयक दृष्टीकोन  

अनिल भुसारी

    छत्रपती संभाजी महाराज म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र, औरंगजेबा विरुद्ध लढणारे आणि स्वराज्याकरिता बलिदान देणारे, ही जशी त्यांची ओळख आपल्याला आहे. त्यापेक्षा अधिक शंभूराजेंचे कार्यकर्तृत्व आहे. चारशे वर्षा पासून इथल्या मनुवादी मानसिकतेने ग्रासलेल्या साहित्यिकांनी, इतिहासकारांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे अनेक पैलू दडवून ठेवले आहेत. उलट त्यांची बदनामी करणारे साहित्य इथल्या अनैतिकवादी इतिहासकारांनी लिहून ठेवलेले आहे. जसं कोंबड्याला जरी झाकून ठेवले तरी दिवस उजाडायच थांबत नाही, तसंच कोणाचं कार्यकर्तृत्व कितीही दडविण्याचा प्रयत्न केला तरी ते लोकसागरातून समोर येत असते. संभाजी महाराज जसे लढवय्ये होते तसेच ते महान लेखक, पितृ - मातृभक्त, पराक्रमी, चारित्र्यसंपन्न, न्यायी आणि स्वाभिमानी राजे होते. हा वारसा त्यांना भोसले कुळातून मालोजीराजे, शहाजीराजे, शिवाजी महाराज, जिजाऊ यांच्याकडून प्राप्त झाला होता. तसेच स्त्रीकडे मातेसमान बघण्याचा दृष्टिकोन हा आजी जिजाऊ आणि वडील शिवाजी महाराजांकडूनच नव्हे तर मातृ वंशक भोसले कुळाकडून्ही प्राप्त झाला होता.

    मल्हारराव चिटणिसाने बखरींना जन्म, फक्त संभाजी महाराजांची बदनामी कारण्याकरिताच दिला असावं असं बखरीचा अभ्यास केल्यावर वाटतो. खोट्या कथा, काल्पनिक पात्रांची निर्मिती करुन संभाजी महाराजांना स्त्रीविरोधी, बदफैली, व्यसनी, दुराचारी दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. चिटणीसांच्या बखरीमुळे संभाजी महाराजांचे कार्यकर्तृत्व, शौर्य, राज्यप्रशासन, साहित्य, काव्य, त्यांचा प्रेमळपणा, स्त्रीविषयक सन्मानजनक दृष्टिकोन समोर आणण्याकरिता प्रयत्न मराठा सेवा संघ सारख्या संघटनांना समोर यावं लागलं.  

    शिवराय जिजाऊंचे संस्कार :-  छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा अपमान, बेअब्रू करणार्यांना जबर शिक्षा दिलेल्या आहेत. रांझाच्या पाटलाने स्त्रीची बेअब्रू केली म्हणून त्याचे डोळे काढून हात कलम केलेत. लढाईमध्ये सापडलेल्या एका मुस्लिम सरदाराच्या सुनेचा साडी चोळी देवून आईचा दर्जा देवून, सन्मानाने तिची पाठवणी केली. सावित्रीबाई गायकवाड या स्त्री सरदाराचा जिंकलेला प्रदेश त्यांना परत करुन बहिणीचा दर्जा शिवाजी महाराजांनी दिला. ही चारित्र्यसंपन्नता, नैतिकता महाराजांना मिळाली होती आऊसाहेब जिजाऊ कडून, जिजाऊंच्या संस्कारातून. अशा चारित्र्यसंपन्न राजाचा मुलगा म्हणजे संभाजी महाराज. संभूराजे बालपणापासून शिवाजी महाराजांची नैतिकता, कार्यकर्तृत्व व चारित्र्यसंपन्नता बघत होते. ते संस्कार संभूराजेंवर होत होते. तसेच ज्या जिजाऊने शिवाजी महाराजांवर संस्कार केले होते, त्या जिजाऊंच्या संस्काराच्या सानिध्यात वयाच्या दोन वर्षांपासून वयाच्या 17 वर्षा पर्यंत घडत होते. म्हणजे ज्या जिजाऊने शिवाजी महाराजांवर संस्कार केलेत त्यांनीच संभाजी राजेंवर संस्कार केलेत. भोसले कुळ म्हणजे मातृवंशीय कुळ. या मातृवंशीय कुळाचा इतिहास जिजाऊंनी ज्या संभाजी राजेंना दिला ते संभाजी राजे व्यसनी, स्त्रीलंपट कसे होवू शकणार?  हा साधा विचार मल्हार चिटणिसाला व त्याच्या नंतरच्या मनुवादी विचारसरणीच्या पिलावळीने करू नये. यातूनच बहुजन महानायकाच्या विषयी किती द्वेष व तिरस्कार इथल्या तथाकथित पुरोहितांच्या मानत आहे हे दिसून येतो. 

Chhatrapati Sambhaji Maharajs perspective on women

   पत्नी येसूराणीचा सन्मान :-  स्वराज्याच्या पहिल्या कुलमुखत्यार जिजाऊंच्या मृत्यू नंतर शिवाजी महाराजांनी कुलमुखत्यार पद त्यांच्या थोरल्या सून आणि शंभूराजेंची पत्नी येसूराणी यांना दिले. (कुलमुखत्यार पद म्हणजे आजचे राष्ट्रपती पद)  म्हणजे भोसले कुळात स्त्रियांना राज्यकारभाराचे अधिकार होते. स्त्रियांचा सन्मान केल्या जात होता. अशा मातृवंशीय कुळात शंभूराजेचा जन्म झाला होता. भोसले कुळाचा हा वारसा संभाजी राजेंनी पुढे नेल्याचे दिसून येते. संभाजीराजे छत्रपती झाल्यावर 'कुलमुखत्यार पद' येसूराणी कडेच ठेवून त्यांच्या अधिकाराची व्याप्ती वाढवली. काळाच्या पुढे पाऊल टाकत, ज्या काळात स्त्रियांना हिन, गुलामीची वागणूक दिली जात होती, अनेक लग्न केल्या जात होते त्या काळात शंभूराजेनी एकच लग्न करुन 'पत्नीव्रत' घेतल्याचे दिसून येते. संभाजी महाराजांनी पत्नी येसूराणीला 'श्री सखी राज्ञी जयती' हे पद बहाल करून त्या नावाची राजमुद्रा त्यांना बहाल करतात. श्री म्हणजे महान, सखी म्हणजे सोबती, राज्ञी म्हणजे राणी, जयती म्हणजे जय हो. म्हणजे "महान अशा माझ्या सोबती असणाऱ्या येसूराणी साहेबांचा विजय असो". या  अर्थाची राजमुद्रा संभाजीराजेंनी पत्नी येसूराणींना दिली. म्हणजे पतीने पत्नीच्या अधिकारा करिता, अस्तित्वा करिता कसं वागावं?  व पत्नीला कसं वागवायचं? याचा आदर्शच निर्माण करून दिला. स्त्रियांनी रामाचा आदर्श समोर ठेवायचं की नाही तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु पत्नीशी एकनिष्ठ आणि पत्नीला अधिकार देवून तिच्यावर प्रेम करणाऱ्या संभाजी महाराजांचे चरीत्र स्त्रियांनी आपल्या नवऱ्याला अवश्य वाचायला द्यावे. 

    मातृभक्त :-  छत्रपती संभाजी महाराज जसे प्रजाहित दक्ष राजे होते, तसेच ते मातृभक्त होते. संभाजी राजेंची जन्मदात्री आई सईराणी होत. शंभूराजे दोन वर्षाचे असतांना सईराणीचा मृत्यू झाला. त्यांना आजी जिजाऊ प्रमाणे सात सावत्र मातेंचे प्रेम मिळालं होत. नव्हे त्यांना सावत्रपणा जाणवलाच नाही. शंभूराजेनी सुद्धा आपल्या सर्व मातेंना कधीही अंतर दिल नाही. सर्वांची आयुष्यभर काळजी घेतली. त्यांची ख्याली - खुशाली ठेवली. संभाजी महाराजांना मातृभक्तीची प्रेरणा मिळाली ती वडीलांकडून आणि शाक्त पंथातून. संभाजी महाराज मातृसत्ताक असलेल्या 'शाक्त धर्माचे' पुरस्कर्ते होते. ज्या धर्माने स्त्रियांना शूद्र समजून जनावरापेक्षाही हिन वागणूक दिली होती त्या धर्माला ठोकर मारून मातृत्वाला प्रेरणा मानणाऱ्या शाक्त धर्माचा स्वीकार केला होता. अष्टप्रधान मंडळातील अण्णाजी पंत, राहुजी सोमनाथ, मोरोपंत, बाळाजी पंत, प्रल्हाद पंत या सर्व पंतानी संभाजी महाराजांच्या सावत्र आई सोयराराणी यांची दिशाभूल करून त्यांना संभाजी राजे विरुद्ध भूमिका घेण्यास भाग पाडले होते. राजेंना हे जेव्हा कळाले की आपल्या मातोश्रीची कारभाऱ्यांनी दिशाभूल केली, तेव्हा राजेंनी सोयराराणीची भेट घेऊन स्वराज्याचा शिव विचार पटवून दिला आणि सोयराराणी मातोश्रींविषयी उदगार काढले, "माझ्या सोयरा मातोश्री स्पटीका प्रमाणे निर्मळ मनाच्या आहेत. " हा संभाजी महाराजांचा मातृभक्तीचा विचार आजच्या पिढीला आम्ही थोडा जरी दिला तर वृद्धाश्रमाची गरज पडणार नाही. 

    गुप्तहेर खाते :-  शिवाजी महाराजानी स्थापन केलेल्या स्वराज्याचे कान आणि डोळा म्हणजे गुप्तहेर खाते.  गुप्तहेरांच्या बातमीच्या आधारावरच शिवाजी महाराज नियोजन करुन धोरण आखत असत. शिवाजी महाराजांप्रमाणे संभाजी राजेंनी सुद्धा आपले स्वतंत्र गुप्तहेर खाते निर्माण केले होते. जीवावर उदार होवून, शत्रूच्या गोटात जावून माहिती आणण्याचे काम हेरांना करावे लागते. या गुप्तहेर खात्यात तेव्हाही आणि आताही पुरुषांचीच मक्तेदारी आहे. अशा खात्यात संभाजी महाराजांनी स्त्रियांची नियुक्ती करुन त्यांच्या क्षमतेचा आणि बुद्धिमतेचा सन्मान केला होता. पात्रतेनुसार संधी देतांना कधी स्त्री - पुरुष असा भेद केला नाही. स्त्रियांच्या बाबतीत समतावादी दृष्टीकोन ठेवणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज होत. 

    गोदावरी - तुळसा - कमळा :-  ब्राम्हणी व्यवस्थेला जेव्हा बहुजन महानायकांचे कर्तृत्व संपविता येत नाही तेव्हा त्यांचे चारित्र्याl बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. हा इतिहास आहे. यातून या पुरोहितशाहीने संभाजी महाराजांना सुद्धा सोडलं नाही. संभाजी राजेंच्या चरित्रात चिटणीस, कवी बी, राम गणेश गडकरी, आत्माराम पठारे, वसंत कानेटकर यांनी गोदावरी - तुळसा - कमळा या काल्पनिक पात्रांची निर्मिती करून त्यांना शंभु चरित्रात त्यांची प्रियेसी म्हणून दाखविण्याचे पाप एकाच जातीतील इतिहासकारांनी केले आहे. जे जिजाऊ - शिवरायांच्या संस्कारात घडले. वयाच्या आठव्या वर्षापासून स्वराज्य रक्षणाकरिता कार्यरत राहिले. 32 वर्षांच्या आयुष्यात शंभुराजेंनी, जगाने दखल घ्यावे अशा साहित्याचे वयाच्या चौदाव्या वर्षा पासून लेखन केले. एकाच वेळी इंग्रज, फ्रेंच, डच, मोगल, आदिलशाही, निजामशाही, सिद्धी या बलाढ्य शत्रुंना परास्त करणाऱ्या संभाजी राजेंना चैनीचं जीवन जगण्याकरिता वेळ कसा मिळणार?  हा साधा प्रश्न त्यांच्या मनात येऊ नये. इतिहासकारांनी इतिहास लिहितांना संभाजी राजे कोण होते?  याचे भान न ठेवतता, फक्त सूड भावनेने काल्पनिक कथांना जन्म देवून, ज्यांच्या कार्यकर्तृत्वाला जो काळिमा फासण्याचा प्रयत्न मल्हार चिटणीससा पासून ते आताच्या बाबा पुरंदरे, भावे, बेडेकर, पर्यंत सुरूच आहे. याचे कारण म्हणजे बहुजन द्वेष. हा बहुजन द्वेष आजही ठासून भरल्याचे आरक्षण, ओबीसीं जनगणना, पदोन्नती, राजकीय संधी, धार्मिक अधिकार, सांस्कृतिक आणि प्रचार - प्रसार माध्यमाच्या बाबतीत बहुजनांना विरोध करतांना दिसून येतो. 

    मित्रांनो, लोकशाही शासन व्यवस्थेतितील सरकारांनी जिजाऊ- शिवाजी- संभाजी महाराजांच्या स्त्रीविषयक दृष्टिकोनाचा अभ्यास करून त्याचे अनुकरण केले असते तर भारतातील जागतिक दर्जाच्या महिला खेळाडूंना स्त्री शोषण, विनयभंग करणाऱ्या कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष - खासदार असणाऱ्या ब्रिजभूषण यादव वर गुन्हे दाखल करून अटक करा म्हणून आंदोलन करण्याची गरज पडली नसती. हजारो वर्षापासून ब्रिजभुषण सारख्यांचे समर्थन करणारेच बहुजन महामांनवांची वारंवार बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

    संभाजी महाराजांची स्त्री विषयक बदनामी करण्याचा प्रयत्न इथल्या मनुवादी साहित्यिक, लेखक, वक्त्यांनी केलेला असला तरी सुद्धा रयतेच्या मनातले, पराक्रमी, स्वाभिमानी, चारित्र्यसंपन्न, बुद्धिवान, साहित्यिक, मातृभक्त, स्त्रियांचा सन्मान करणारे छत्रपती संभाजी महाराज मात्र पुसता आले नाही. संभाजी महाराजांचे चारित्र्य अत्यंत निर्मळ होते. मातृभक्तीचे प्रतिक असणाऱ्या जिजाऊचे विचार आणि संस्कार त्यांना लाभले होते. म्हणूनच त्यांनी स्त्रीचा अपमान करणाऱ्या धर्म व्यवस्थेला नाकारून स्त्रीसत्ताक पद्धतीचा पुरस्कार करणाऱ्या शाक्त धर्माचा स्वीकार केला होता. आज आपण हे धारिष्ट्य करण्यास कितपत तयार आहोत....?  स्त्रीत्ववादी दृष्टीकोन ठेवणारे, मातृभक्त असणाऱ्या संभाजी महाराजांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन. (14 मे 1657)

अनिल भुसारी,  8999843978

Satyashodhak, obc, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209