विनोद पंजाबराव सदावर्ते, रा. आरेगांव ता. मेहकर,
महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये, शासकीय खर्चाने, मोठ्या जाहिराती करून पार पाडला. परंतु महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण समारंभामध्ये खरंच महाराष्ट्राचे भूषण वाढले की महाराष्ट्रात भीषण घडले हे बघणे आवश्यक आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरी पुरस्कार. हा पुरस्कार प्रदान करताना पुरस्कार सभारंभाला कोणतेही गालबोट लागणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राची मानहानी होय. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा निवडीपासूनच दरवर्षी वादग्रस्त असतो. एकीकडे नाव महाराष्ट्र भूषण देऊन दुसरीकडे मात्र हा पुरस्कार बहुतांश एकाच जातीत दिला जातो. महाराष्ट्र भुषण कुणाला दिला जातो याबद्दल बोलले तर जातिवाद होतो. परंतु एकाच जातीला दरवर्षी पुरस्कार दिल्याने जातिवाद होत नाही. अशी विषमतावादी व्यवस्था टिकवून ठेवण्याचे काम सरकार करत आहे. अर्थात हेच सरकार जातिवाद करून एकाच जातीच्या माणसाला महाराष्ट्र भूषण देतात असे मुळीच नाही १९९५ ला महाराष्ट्र भूषण ला सुरुवात झाली तेव्हापासून तर आजतागायत बहुतांश पुरस्कार एकाच जातीला मिळाले. स्वतःला पुरोगामी राज्य समजायचे आणि पुरस्कार मात्र एकाच जातीला द्यायचे, यामधून आपण पुरोगामी आहोत की ढोंगी आहोत हे सिद्ध होते. आणि जर महाराष्ट्र भूषण पुरस्कार दरवर्षी एकाच जातीला मिळत असेल तर यातून महाराष्ट्राचे भूषण होईल का ? किंवा जेथे आपण म्हणतो जातिवाद संपलेला आहे तर एकाच जातीला पुरस्कार देऊन सरकारला नेमके काय साध्य करायचे आहे? महाराष्ट्र भूषण पुरस्कार देताना कोणतेही जनमत न घेता विज्ञान, तर्क व समाजामध्ये जनजागृती करणाऱ्या इतर जातीतील लोकांना पुरस्कार न देता आजही सरकार सामाजिक अन्याय करत आहे.
पुरस्काराच्या माध्यमातून आपण जर एक नजर ज्या ठिकाणी आरक्षण नाही अशा ठिकाणावर टाकली तर आपल्या लक्षात येईल ज्या ठिकाणी आरक्षण नाही त्या ठिकाणी एकाच जातीचे वर्चस्व आजही कायम दिसते. याचाच अर्थ आजही सामाजिक समता, सामाजिक न्याय देण्याची नैतिक जबाबदारी तर कर पार पाडत नसून आजही विषमता टिकवून ठेवली जाते अशा अनेक बाबी आहेत की ज्या बाबी महाराष्ट्रासाठी भूषणीय नाहीत. तरीही त्या घडल्या जातात. अंधश्रद्धा, पाखंड आणि अध्यात्मिक कामे करणाऱ्यांना महाराष्ट्र भूषण देऊन धर्मनिरपेक्षता व लोकशाहीची हत्या केली जाते. हे उघड सत्य असतानाही लोकांना धर्माच्या नावाखाली मानसिक गुलाम बनवल्याने लोकांना या बाबीची आकलन होत नाही.
यावर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रम महाराष्ट्रासाठी भूषण आहे की भीषण आहे, हे मनाचा प्रामाणिकपणा उघडा ठेऊन बघणे आवश्यक आहे. २०२४ ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या नावाखाली शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला. म्हणजेच सध्याच्या परिस्थितीचे राजकारण किती खालच्या स्तराला जाऊन, सत्तेची पोळी भाजून घेण्यासाठी काय काय करतील याची काही शाश्वती नाही. आणि हाच प्रकार महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमांमध्ये दिसून आला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पंधरा कोटी रुपयांच्या वर पैसा खर्च करून त्यामध्ये २५ लाख रुपये रोख पुरस्कारची सन्मान निधी बाजूला काढला तर, उर्वरित रक्कम नेमकी खर्च तरी कुठे झाली ?
लाखो लोक कार्यक्रम ला येणार याची माहिती असताना देखील, आणि उन्हाळा सुरू असून ४० डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान जात आहे याची माहिती असून सुद्धा लोकांना राजकीय पोळी भाजण्यासाठी उन्हामध्ये बसून ठेवले जाते. लोकांच्या डोक्यावर सावलीसाठी छत बनवले जात नाही. आणि नेत्यांना मात्र एसी असतात. एकीकडे नेत्यांना ऐशोआराम आणि सर्वसामान्य जनतेला ४० डिग्री सेल्सिअस तापमानावरती उन्हामध्ये बसवल्या जाते. उन्हाळ्यामध्ये लोकांना उन्हामध्ये बसवायचं की त्यांच्या बसण्याची सोय करायची हे ज्यांना कळत नाही, त्या लोकांना खरंच सत्तेत राहण्याचा अधिकार आहे का? किंवा नेते एसीमध्ये, जनता ४०ओल तापमानामध्ये डोक्यावर कोणतीही सावली नसताना बसवून ठेवणे यातच महाराष्ट्राची भूषण आहे का ? दुसरी व महत्त्वाची गोष्ट जर महाराष्ट्र शासनाने या कार्यक्रमावरती खर्च केला नसता तर समजून शकलो असतो, कार्यक्रमाला अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी आल्याने गर्दी झाली, व घटना घडली. परंतु १५ कोटी पेक्षा जास्त पैसा खर्च करून लोकांना बसण्याची व्यवस्था निर्माण करू शकले नाही. तर मग पंधरा कोटी रुपये नेमकी गेले कुठे हा प्रश्न तर सर्वसामान्य जनता विचारणारच आहे. सरकारच्या या निष्काळजीपणामुळे राजकीय पोळी भाजण्याच्या उद्देशाने जमवलेल्या गर्दीतील शेकडो लोकांना उष्माघाताचा फटका बसून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले. यापैकी बरेचसे लोक मृत्युमुखी पडलेत. शासनाने आकडा जरी कमी दिलेला असला तरी मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या ही चिंताजनक आहे, हे मात्र नक्की. कारण ४० डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये चार-पाच तास लोकांना बसून ठेवणे, सावलीची कोणतीही सोय नसणे, आणि ५०० पेक्षा जास्त लोक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्याची कबुली सरकारने देणे, ही बाब महाराष्ट्रासाठी भूषणीय आहे की भीषण आहे? हे जनतेने ठरवावे. उष्माघाताने मृत झालेल्या लोकांना पाच लाख रुपयांची शासकीय मदत देऊन एका जीवाची किंमत सरकारने पाच लाख रुपये ठेवली. हे लोक उष्माघातामुळे नाही तर सरकारच्या नियोजन शून्य कारभारामुळे मृत्यूमुखी पडलेत. याची नैतिक जबाबदारी घेऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व केंद्रीय गृहमंत्री राजीनामा देतील का ? वीस पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होऊन ही गोष्ट इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून व अनेक प्रिंट मीडियाच्या माध्यमातून सुद्धा टाळली जाते. एवढा मोठा दबाव जर प्रसार माध्यमावर असेल तर हे तर हे महाराष्ट्राचे भूषण वाढवणारे आहे का ? सदर घटना उष्माघाताने मृत्यूची नव्हे तर राजकीय हत्येची आहे असे म्हणावे लागेल. किंवा लोकांना मारून लोकांचे हाल करून स्वतःची प्रसिद्धी मिळवने, हे निच राज्यकारणाचे लक्षण होय.
तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट महाराष्ट्र भूषण पुरस्कार राज्यातला सर्वोच्च पुरस्कार आहे. आणि हा पुरस्कार मुख्यमंत्री राज्यपाल यांच्या यांच्या हस्ते मिळायला पाहिजेत. परंतु महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्याचे जर आपण फोटो बघितलेत तर त्यामध्ये मुख्यमंत्री शोधावे लागतात. एकीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, तर दुसरीकडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. शिंदे साहेबांना फोटोमध्ये शोधावे लागते, अशा ठिकाणी ते आहेत. मुख्यमंत्र्यांना डावलू ना उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते पुरस्कार दिला जातो, ही बाब महाराष्ट्राचे भूषण वाढवणारी आहे? एकनाथ शिंदे यांना फक्त पद दिलेले आहे पोझिशन मात्र त्यांच्याकडे असल्याचे दिसत आहे. याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आलेले आहेत. आणि पुन्हा एकदा ते सत्य महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण समारंभामध्ये सुद्धा समोर आलेले आहे. मुख्यमंत्र्यालाच बाजूला सारून उपमुख्यमंत्री जर सर्वच कामे करत असेल तर ही बाब महाराष्ट्रासाठी भुषणीय आहे की भीषण आहे? हे बघणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमांमध्ये उष्माघाताचा फटका बसून मृत्यू झालेल्या लोकांची घटना विदारक आहे. विदारक व मन हे लावून टाकणाऱ्या आणि सरकारचा नाकर्ते पणा दाखवणाऱ्या घटनेवर कोणीही चर्चा कोणतीही बातमी होत नाही. आणि तरीही महाराष्ट्र भूषण मोठ्या गौरव आणि दिला जातो. महाराष्ट्र भूषण कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्र्यांना डावलले जाते, लोकांना बसण्याची सोय केली जात नाही, मृत्त झालेल्या लोकांना पाच लाख रुपये देऊन बोळवणी केली जाते, या सगळ्या बाबी जर बघितल्या तर यामध्ये सरकारचे अपयश आहे. हे सरकार फक्त स्टंटबाजी करून स्वतःची जाहिरात करण्याचा प्रयत्न करत आहे. २०२४ ची निवडणूक लढण्यासाठी वाटेल ते प्रयोग घडवून आणून फक्त पक्षाची व नेत्याची जाहिरात कशी होईल यावर लक्ष दिले जातआहे. आणि सदर बाब आदर्श राजकारणासाठी, राज्य कारभारासाठी आणि समाजाच्या विश्वासासाठी घातक आहे. परंतु सत्तेची मस्ती असणारे लोक सुन्न झालेले आहेत. लोकांच्या समस्या बाजूला ठेवून स्वतःच्या ऐश्वर्या कडे, बाब सत्तेच्या माध्यमातून चुकीचे कामे करण्याकडे, भर दिला जात आहे. हिच महाराष्ट्रासाठी चिंतेची आहे. म्हणून महाराष्ट्र भूषण की महाराष्ट्रात भिषण हे लोकांनी ठरवणे आवश्यक आहे.
विनोद पंजाबराव सदावर्ते, रा. आरेगांव ता. मेहकर, मो. ९१३०९७९३००
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan