छत्रपती संभाजीनगरः ओबीसी समूहाचे अधिकार व हक्क हिरावून घेण्याचे षडयंत्र आखले जात आहे. यामुळे आपल्या हक्कासाठी एकत्र येणे, प्रसंगी दलित, आदिवासी समूह व संघटनाना सोबत घेऊन लढा उभारण्याची गरज असल्याची भावना दिल्ली विद्यापीठाचे प्रा. डॉ. सुरज मंडल यांनी व्यक्त केली. रविवारी (दि. ९) शहरात पार पडलेल्या ओबीसी अधिकारी, कर्मचारी संघाच्या राज्यस्तरीय चिंतन शिबीरात ते बोलत होते.
याप्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील शेळके, सत्यशोधक शिक्षक सभेचे सचिव मंडळ सदस्य डॉ. प्रभाकर गायकवाड यांच्यासह राज्यातील पदाधिकारी, सभासद बहुसंख्येने उपस्थित होते. पुढे बोलतांना डॉ. मंडल म्हणाले, विविध कारणांमुळे ओबीसी समूहाचे हक्क व अधिकार धोक्यात आले असून यासाठी सर्वांनी जागृत राहून ऐक्याची वज्रमूठ बांधने काळाची गरज आहे. समूहावरील सर्वकष अन्यायाविरुद्ध सामूहिक लढा दिला नाही तर येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही, असा चिंतनास भाग पाडणारा इशाराही त्यांनी दिला.
जातिनिहाय जनगणना न होणे, ईव्हीएम मशीन, समूह ऐवजी जात म्हणून समाजात वावरणे या समूहासमोरील मुख्य अडचणी असल्याचे मंडल यावेळी म्हणाले. घातक प्रभाकर गायकवाड यांनी देशातील सध्याचे चित्र निराशाजनक असल्याचे सांगून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ओबीसींसाठी असल्याचे प्रतिपादन केले. यामुळे भविष्यात शिक्षण मूठभर लोकांची मक्तेदारी ठरेल, असा धोका त्यांनी बोलून दाखविला. देशातील १० कोटी ओबीसी शिक्षणापासून वंचित असल्याची धक्कादायक माहिती त्यांनी यावेळी दिली. ओबीसी समोरील सर्वकष आव्हानांचा त्यांनी उहापोह केला. संचलन राज्य सल्लागार डॉ. शिवशंकर गोरे यांनी केले. आभार संजय खांडवे यांनी मानले. दुपारच्या सत्रात संवाद, सामूहिक चर्चा, शंका निरसन, प्रश्नोत्तर कार्यक्रम पार पडले. राज्यातील जिल्हा निहाय प्रभारींची नियुक्ती करण्यात आली.
ओबीसी स्वतःची ओबीसी म्हणुन ओळख करून देत नाही, ही मोठी अडचण असल्याचे स्वागताध्यक्ष सुनील शेळके म्हणाले. ओबीसींचे हक्क, अधिकार, आरक्षण अबाधित राहण्यासाठी लढणे हा संघटनेचा उद्देश आहे. उच्चशिक्षित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ज्ञानाचा ओबीसी मधील सर्व जातींना लाभ व्हावा, त्यांचे मार्गदर्शन मिळावे हा पूरक उद्देश आहे. संघटनेने काही तत्कालीन व दीर्घकालीन उद्दीष्टे निर्धारित केल्याचे ते म्हणाले. बी. पी. मंडल यांच्या ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक करून त्यांच्यामुळेच समूहाला २७ टक्के आरक्षण मिळाले. संघटनेची कामगिरी आणि ओबीसींच्या समस्यांचा धावता आढावा त्यांनी घेतला. संघटनेचे पहिले अधिवेशन डिसेंबर महिन्यात घेण्याची घोषणा त्यांनी केली . अंतिम सत्रात संघटनेच्या पुढील ध्येय धोरणावर त्यांनी मार्गदर्शन केले.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan