महाराष्ट्र भूषणला उष्माघाताचा झटका ..!

- भूपेंद गणवीर

     दासबोध व आध्यात्मिक प्रचार करणारे आप्पासाहेब धर्माधिकारी. सत्ताधाऱ्यांच्या वैचारिकतेला मानवणारे व्यक्तिमत्व. त्यांच्या कार्याला समाजसेवेचा मुलामा देण्यात आला. कोकणात त्यांचे प्रस्थ. त्यांचे लाखों अनुयायी श्रीसेवक. त्या  मतपेटीवर राजकारण्यांचा डोळा. त्यातून महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली.  उरलेली कसर पुरस्काराची तिथी व वेळ ठरवून काढली. राजकारणात शहकाटशह चालते. त्याची बाधा या पुरस्कारला झाली. महाविकास आघाडीची 16 एप्रिलला नागपुरात वज्रमूठ सभा होती.  तिला शह देण्याचं ठरलं. मग  तोच दिवस पुरस्कार वितरणाचा ठरविला. अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. वेळ ठरली दुपारची. दीड-दोन वाजेपर्यंत पुरस्कार सोहळा संपेल. वीस लाखाची गर्दी दिसेल. तिच्यापुढे वज्रमूठ सभा फिकी पडेल. खेळी यशस्वी होईल. चर्चा होईल महाराष्ट्र भूषण सोहळ्याची.  त्या दिवशी लिड बनेल. ती अनेक दिवस चालेल. त्यानूसार गोट्या सरकल्या. हे समयचक्राला मान्य नव्हते. इथंच घात झाला. त्या दिवशी नेमकं उलटं घडलं. अन्  उष्माघातात एकावेळी 13 लोकांचा जीव गेला. अनाधिकृत आकडा आणखी जास्त असेल. या नोंदी  कळमपूरी व वाशीतील रूग्णालयांतील आहेत . हे  दोन्ही रूग्णालय 15 किलोमीटर परिसरातील.  अन्य दवाखान्यात दाखल झालेल्यांचे काय झालं. हे कोणाला कळलंच  नाही. ते आकडे पुढे येतील. तेव्हा मृत्यूचा नेमका आकडा पुढे येईल. तयारी 20 लाख लोक येणार म्हणून होती. बहुतेक श्रीसेवक असणार असं सांगण्यात आलं. त्या व्यवस्थेसाठी सुमारे 13 कोटी 62 लाख 51 हजार रूपये खर्चाचा बजेट करण्यात आला. तरी व्यवस्था कोलमडली. पिण्याचे पाणी अपुरं पडलं.  आरोग्य सेवा मिळाली नाही. अन् लोकांचा बळी गेला. अनेक श्रीसेवक रात्रीच कार्यक्रम स्थळी पोहचले होते. ते उपासीतापाशी होते. तसाच त्यांनी कार्यक्रमात भाग घेतला. कडकडत्या ऊनाचे चटके बसले. तिनशेवर लोकांना दवाखान्यात दाखल करावे लागले.अन् महाराष्ट्र भूषणला गालबोट लागलं.

Maharashtra Bhushan Award to Dr Appasaheb Dharmadhikari and common people Death to heat stroke    धर्माधिकारी कुटुंबीय मुळचे रेवदंडा गावचे . हे कोकणातले. त्यांचे मुळ आडनाव शेन्डे. ज्योतिषी व पौरिहित्य हा त्यांचा मुळ व्यवसाय. पुढे शाडिल्य आडनावाने ओळखले जावू लागले. त्यांची आता ओळख धर्माधिकारी. आप्पासाहेब उर्फ दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी यांचे वडिल नानासाहेब धर्माधिकारी यांनी सुध्दा प्रारंभी हाच व्यवसाय केला. मग दासबोधावर निरूपन करू लागले. धर्माधिकारी कुटुंबियांनी श्री समर्थ प्रसादित अध्यात्मिक सेवा समिती स्थापन केली .त्या माध्यमातून आध्यात्मिक कार्याला सुरूवात केली. तेव्हापासून त्याचे बस्थान वाढले. श्रीबैठकीत दत्त अधिष्ठान, सत्यदत्तपूजा, अंतरात्मा, पंचमहामृत, उपासना चालते. श्रवण चालते ,सदगुरू संबोधले जाते. असे अनेक नवे शब्द व अर्थ रूढ केले. निरूपम करणे म्हणजे वाद्यांशिवाय कीर्तन, गादीवर बसणे म्हणजे मनाचे श्लोक व ओव्याचे वाचन करणे. अशा भारी शब्दांनी अनेकांना भुरळ घातली. या मार्गे सामान्य लोकांना आकृष्ट केलं गेलं. यातून संसारात सुख मिळेल असं मनावर ठासविलं . ट्रस्ट श्रीमंत आहे. वाड्या आहेत. बंगले आहेत. आणखी बरचं काही आहे. श्रीसेवक गरीब आहेत. त्यांना फुकट राबविले जातं. असा हा निरूपनाचा धंदा जोरात आहे. व्यवस्थेची साथ आहे. सोबतीला फुकटचे श्रीसेवक आहेत. याच कारणाने संभाजी ब्रिगेडने आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाला विरोध केला होता. धर्माधिकारी धार्मिक गुलामी लादतात. खोटा इतिहास सांगतात.अंधश्रध्देला खतपाणी घालतात.वर्णव्यवस्थेचा पुरस्कार करतात असाआरोप केला होता. त्याकडे कानाडोळा केला. रामदासी परिवाराचे यावरच भर दिला. शिवाय श्रीसेवकांचे संख्याबळ लक्षात घेतले. याच कारणाने आतापर्यंत त्यांना राजकीय पाठबळ मिळत गेले. पुढे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान बनले. तेव्हापासून धर्माधिकारी कुटुंबियांना सुगीचे दिवस आले. आता प्रतिष्ठानाचे वारसदार म्हणून सचिन धर्माधिकारी यांना घोषित करण्यात आले. भाजपवाले  घराणेशाहीवर टिका करतात. पुरस्कार देताना घराणेशाही विसरतात. त्यामुळेच धर्माधिकारी  कुटुंबात दुसऱ्यादा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा निर्णय वादग्रस्त बनला. या   प्रतिष्ठानाच्या शाऴा , कॉलेज नाहीत. आरोग्य, रक्तदान व वृक्षारोपनाचे  दिखावी शिबीरं चालतात.  दर आठवड्याला श्रीबैठकांचा सपाटा असतो.  लोकांना अध्यात्माच्या आधारे संमोहित करण्याचा प्रकार चालतो. त्याच्या आहारी गोरगरीब, मध्यमवर्गीय गेले.  तेच अशा कार्यक्रमांना हजेरी लावतात.  त्यांनाच उष्माघाताचा फटका बसला. आता सावरासावर सुरू आहे. भर ऊन्हात सभा घेण्याचे नियोजन कोणाचे..!त्याचा शोध घ्यावा. त्या विरूध्द सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल व्हावा.13 कोटी रूपये खर्चाचाही हिशेब व्हावा. महाराष्ट्र भूषण  कार्यक्रम राजभवन सोडून मैदानात नेणे. त्याला राज्यपाल हजर नसणे .अशा अनेक गोष्टींचा शोध घेण्याची गरज आहे.

   महाराष्ट्रात उष्माघाताने इतकी माणसं एकाचवेळी दगावली. आतापर्यंतच्या इतिहासातील ही पहिली घटना होय. या अगोदरची अशी नोंद नाही. ही घटना घडली. ते स्थळ मुंबईपासून जवळ. नवी मुंबई खारघरात चॅनेलच्या सर्वाधिक पत्रकारांची वस्ती. कार्यक्रमाला झाडून सर्वांनी हजेरी लावली. घटना दुपारी घडली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत कोणत्याही चॅनेलवर उष्माघाताने मृत्यूची बातमी नव्हती. मुंबईतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रूग्णालयात पोहचले. त्यांनी पहिल्यादा सात-आठ लोक दगावल्याचे चॅनेलवाल्यांसमोर सांगितले.  त्यानंतर चॅनेलवर बातम्या झळकल्या. तोपर्यंत एकानेही बातमी दिली नाही. मुख्यमंत्र्यांच्या हवाल्याने आलेल्या बातम्यांनी खळबळ माजली. तोपर्यंत नागपुरातील महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा सुरू झाली होती. पुरस्कार सोहळ्यात काय घडलं. कोणाला कानोकान खबर नव्हती. माध्यमांनी सुध्दा आपली भूमिका पार पाडली नाही. उष्माघात बळींच्या बातमीला प्राधान्य  दिलं नाही.असं कां व्हावं. हा चिंतेचा विषय आहे. जागृत पत्रकारितेचा अभाव लोकशाहीला घातक असतं असं म्हणतात. त्याची प्रचिती उष्माघात घटनेतील वृत्त संकलन उदासितेने पुन्हा एकदा समोर आली.

- भूपेंद गणवीर

Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209