- प्रेमकुमार बोके
सध्या आपल्या देशात पंचतारांकित हाय प्रोफाईल जीवन जगणाऱ्या तथाकथित बाबांची संख्या खूप वाढलेली आहे.देशाच्या कानाकोपऱ्यात या बाबांच्या प्रवचनांना लोकांची जोरदार गर्दी होत आहे.ही गर्दी खेचून आणण्याचे तंत्र सुद्धा या बाबांच्या प्रायोजक मंडळींनी चांगल्या प्रकारे अवगत केलेले आहे. मोठमोठे व्यापारी,उद्योगपती "माल लगाओ- माल कमावो" या व्यावसायिक हेतूने ठिकठिकाणी या बाबांची प्रवचने आयोजित करीत आहे.पाच-सहा दिवसाचे लाखो रुपये घेणारे ही बाबा मंडळी आणि त्या कार्यक्रमातून कोट्यावधीची कमाई करणारे आयोजक,प्रायोजक असा हा व्यवसाय पध्दतशीरपणे सुरू आहे.या या बाबांची लॉन्चिंग सुद्धा अतिशय नियोजनपूर्वक केली जाते.दरवर्षी नवनवीन बाबांना प्रोजेक्ट केले जाते आणि त्या वर्षात त्याच महाराजांना प्रचंड फोकस केले जाते.सर्वसामान्य माणसे मात्र या मोहजाळाला बळी पडून त्यामध्ये फसत जातात. अध्यात्माच्या नावाखाली कोट्यावधींचा व्यवहार चालतो हे मात्र आमच्या साध्याभोळ्या भाविकांच्या लक्षातही येत नाही.शेकडो एकर परिसरात पसरलेला वातानुकूलित मंडप,सर्वोच्च दर्जाची साऊंड सिस्टिम, पंचपक्वान्नाचे भोजन,कार्यक्रम स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी दूरदुरुन केली जाणारी वाहनांची व्यवस्था,त्या ठिकाणी असलेला लाईटचा झगमगाट या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर स्वतःच्या मेंदूने विचार करणाऱ्या कोणत्याही माणसाला सहज प्रश्न पडेल की हेच का खरे अध्यात्म ? आमच्या महान संतांनी अशाच प्रकारे समाजाची प्रबोधन केले होते का ? अशाच प्रकारे पंचतारांकित जीवन जगून लोकांना ज्ञानाचे डोज पाजले होते का ? हीच का ईश्वराची खरी भक्ती ? अशा भक्तीने ईश्वर खरोखर प्रसन्न होतो का ? असे अनेक प्रश्न विचारी माणसाला पडल्याशिवाय राहत नाही.
त्यामुळे अध्यात्माच्या नावाखाली कोट्यावधीचा चुराडा करणारे आणि स्वतः अब्जाधीश बनणारे हे बाबा,महाराज,बापू देशासाठी फार घातक आहे.एकेका बाबा,बापू,अम्मा दीदी यांची संपत्ती शेकडो-हजारो कोटींमध्ये आहे.अध्यात्मामध्ये खरोखर इतका पैसा मिळू शकतो का ? की पैसा मिळवण्यासाठी हे केवळ पाखंड आहे यावर सुद्धा विचार होणे आवश्यक आहे.अध्यात्म सांगणारा माणूस हा त्यागी असतो.निस्पृह,निस्वार्थी वृत्तीचा असतो.मोह,माया,व्यापार या गोष्टींपासून कोसो दूर असतो.तो केवळ लोकांना जीवन जगण्याचा सत्वशील आणि सत्यशील मार्ग सांगत असतो. त्यासाठी तो त्याचा उदरनिर्वाह होईल एवढाच पैसा दान म्हणून घेत असतो आणि त्यात काही वावगेही नाही. त्याच्या कुटुंबाची वाताहत होऊ नये यासाठी ते अत्यंत गरजेचे आहे.परंतु पाच दिवसाच्या प्रवचनाचे जर पन्नास लाख एखादा बाबा घेत असेल तर हे मात्र खरे अध्यात्म नसून अध्यात्माच्या नावावर चाललेली सामान्य जनतेची शुद्ध फसवणूक आणि लुबाडणूक आहे.या देशातील खऱ्या संत परंपरेने सांगितलेले ईश्वर भक्तीचे साधे,सोपे, सरळ मार्ग न सांगता लोकांना भ्रामक संकल्पनेत गुंतवून त्यांच्याकडून पैसे लुबाडण्याची व्यवस्थित मांडणी या बाबांच्या प्रवचनात केली जाते.एखादा बाबा रुद्राक्ष देऊन तुमच्या जीवनाचे कल्याण करणारी खोटी आश्वासने देतो. त्यासाठी नाव मात्र अध्यात्माचे वापरले जाते आणि देवाचा आधार घेतला जातो.एखाद्या बेलपत्राने किंवा महादेवाच्या पिंडीवर एक लोटा पाणी टाकल्याने मनुष्य जीवनातील सर्व समस्या एका क्षणात संपुष्टात येतात अशा प्रकारे धादांत खोटी मांडणी करून लोकांना फसवणारे हे बुवा,बापू म्हणजे भारताच्या प्रगतीच्या आड येणारे देशाचे खरे शत्रू आहेत.
हे बाबा मंडळी कधीही गोरगरिबांच्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन मोठमोठ्या पदांवर जावे हे सांगत नाही.अभ्यास करावा,पुस्तके वाचावी यावर बोलत नाही,शेतकऱ्यांच्या समस्या मांडत नाही,महिलांच्या अडचणी समजून घेत नाही,बेरोजगारांचे प्रश्न मांडत नाही,आमच्या संत महापुरुषांचा अनेकदा अपमान होतो त्यावर हे कधी तोंड उघडत नाही.उलट त्यांच्याच कडून अनेकदा आमच्या महापुरुषांचा अपमान होतो.त्यामुळे यांची प्रवचने, सत्संग म्हणजे केवळ बाजार असतो. या बाजारात भक्त हा गिऱ्हाईक असतो आणि बाबा हा व्यापारी असतो. व्यापारी हा कधीही घाट्याचा सौदा करीत नाही.त्यामुळे हे व्यापारी या अध्यात्मरुपी सत्संगातून आपल्या भक्तरुपी ग्राहकांना खोट्या गोष्टी सांगून त्यांना फसवितात आणि त्यांच्याकडून प्रचंड पैसा कमावतात. त्यामुळे ही आधुनिक बाबांची जी नवीन जमात आपल्या देशात निर्माण झालेली आहे,त्यावर कुठेतरी निर्बंध घालणे आवश्यक आहे.कारण या बाबा जमाती मधील अनेक बाबांनी कित्येक स्त्रियांवर बलात्कार करून, त्यांचे शोषण करून अध्यात्माला कलंकित केले आहे व आज अनेक बाबा,बापू तुरुंगात आहे.
बाबा लोकांची ही नवी जमात काही राजकारणी लोकांसाठी प्रचाराचे सुद्धा काम करतात,त्यामुळे त्यांना फार मोठे राजकीय अभय असते आणि त्या बळावर ही बाबा मंडळी अनेकदा फार विषारी आणि विखारी वक्तव्ये करतात. संविधान बदलण्याचे जाहीरपणे आपल्या प्रवचनातून सांगतात. अंधश्रद्धेचा खुलेआम प्रचार प्रसार करतात.लोकांच्या भावनेचा गैरफायदा घेऊन अनेक अवैज्ञानिक गोष्टींना हे बुवा बापू सतत चालना देत असतात. त्यामुळे आमची येणारी नवी पिढी दिवसेंदिवस अंधश्रद्धाळू बनत असून विज्ञानवादी विचारांपासून ती दूर चाललेली आहे.शाळा,कॉलेजमध्ये जरी ती विज्ञान विषय शिकत असली तरी प्रत्यक्ष त्यांच्या आचरणात मात्र कुठेही विज्ञान आपल्याला दिसत नाही.उलट विज्ञानाच्या विरोधात त्यांचे वागणे बोलणे असते आणि विज्ञानवादी लोकांच्या ते सतत विरोधात असतात.ही जी भ्रामक परिस्थिती या देशात निर्माण झालेली आहे ती परिस्थिती या ढोंगी बुवा बापूंनीच निर्माण केलेली आहे.त्यामुळे त्यांना वठणीवर आणणे व देशात संविधानाला अभिप्रेत असलेले न्याय, स्वातंत्र्य,समता आणि बंधुता यांचे राज्य निर्माण करणे ही काळाची गरज आहे.अन्यथा ही कार्पोरेट बुवा,बापू,महाराजांची फौज येणाऱ्या काळात देशामधे बेबंदशाही निर्माण केल्याशिवाय राहणार नाही.
प्रेमकुमार बोके, अंजनगाव सुर्जी, १५ एप्रिल २०२३
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan